अधिक मास

   हिंदू पंचांगानुसार ज्या चांद्र महिन्यात एकही सूर्य संक्रमण येत नाही त्याला ‘असंक्रांती मास’ म्हणतात.  हा मास अंदाजे सत्तावीस  ते पस्तीस महिन्यांनी एकदा येतो . बहुतेक वेळा साडे बत्तीस महिन्यांनी हा मास येतो.  दर तीन वर्षांनी येणाऱ्या तेराव्या महिन्याला ‘अधिकमास, मलमास, पुरुषोत्तम मास ,खरमास, मलिम्लुच मास’ अशी अनेक नावे आहेत.  

   2020 साल बऱ्याच गोष्टींमुळे वेगळे ठरले . करोना कहर ,निसर्ग वादळ ,टोळधाड इत्यादी संकटांनी अक्षरश: जग ढवळून काढले.  त्यातच यावर्षी लीप वर्ष असूनही अधिक मास देखील आला आहे.  हा सुद्धा एक दुर्मिळ योग 165 वर्षानंतर जुळून आला आहे . यापूर्वी अशी स्थिती म्हणजेच लीप वर्ष आणि अधिक महिना १८६० साली आले होते आणि अश्विन अधिक मास एकोणीस वर्षानंतर आला आहे.  भारतामध्ये अनेक धर्म असून प्रत्येकाची कालगणना स्वतंत्र आहे व्यवहारांमध्ये सुसूत्रता राखण्यासाठी सर्वत्र इंग्रजी म्हणजेच ग्रेगरियन कॅलेंडर वापरले जाते.  यामधील सौर  वर्षाचे दिवस 365 असतात परंतु हिंदू चांद्रमासाचे वर्ष 354 दिवसांचे असते म्हणून दरवर्षी सौरवर्ष आणि चांद्रवर्ष यामध्ये अकरा दिवसांचा फरक पडतो. 

   तसे तर मुस्लिम देखील चांद्र महिने कालगणनेसाठी वापरतात त्यामुळे त्यांच्या येणाऱ्या काही महत्त्वाच्या सणांमध्ये हे विशिष्ट ऋतूचे पालन होताना दिसत नाही.  मोहरम सारखे उत्सव कालगणनेप्रमाणे येत राहतात त्याला फक्त विशिष्ट एखाद्या ऋतूचे बंधन राहत नाही.  परंतु हिंदू मध्ये हे जरी चांद्र महिन्याप्रमाणे कालगणना होत असली तरी विशिष्ट ऋतूंमध्ये विशिष्ट सण येतातच फार तर काही दिवस मागेपुढे होतात.  त्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे सौर आणि चंद्र वर्षात दरवर्षी पडणारा अकरा दिवसांचा फरक दर तीन वर्षांनी अधिक मासाच्या गणनेने भरून काढला जातो आणि हिंदूंच्या चांद्रवर्ष सौरवर्ष शी जुळवून घेतले जाते. सौरवर्ष आणि चंद्र वर्षातील अनुशेष दर तीन वर्षांनी भरून काढल्यामुळे कालगणनेत सुसूत्रता येते. 

   अधिक मासाची परंपरा वेदकालीन असून त्याला ‘अधिक मास’ असे स्पष्ट नाव नसले तरी संकल्पना मात्र तीच आहे ऋग्वेदा मधील वरुण सूक्तामध्ये 

वेदमासो धृतव्रतो द्वादश प्रजावतः | वेदाय  उपजायते 

   असा उल्लेख आहे. म्हणजेच पुत्र रुपी बारा महिन्यांना जोडला जातो त्या महिन्याला ही वरूण  जाणतो.  येथे अधिक हा शब्द न वापरता ‘जोडला जाणारा ‘असे म्हटले आहे. अशाच जोड मसाला नंतर ‘संसर्प मास’ असे म्हटले गेले . ऐतरेयब्राह्मण, तैत्तरीय संहिता, ऋग्वेद, अथर्ववेद यामध्ये हे अधिक मासाचा उल्लेख आढळतो.  वाजसेनीय संहितेमध्ये ‘मलिम्लुच अंहसस्पति’ असा उल्लेख आढळतो . ऋग्वेदानुसार अंहस म्हणजे पाप आणि मलि म्हणजे पाप चोरणारा होय . पृथ्वीला फार होऊ लागला तेव्हा हा सर्व मासांनी आपला काही भाग टाकून दिला व त्या सर्व टाकून दिलेल्या भागांचा हा महिना तयार झाला म्हणून हा’ मलमास’.  या मासाला कायमच दुय्यमत्व ,कमीपणाचे धनी व्हावे लागले तेव्हा तो व्यथित होऊन कृष्णाकडे गेला त्यावेळी कृष्णाने आपले सर्व थोरपण त्याला बहाल केले आणि इथून पुढे तुझा उल्लेख माझ्या नावाने म्हणजेच ‘पुरुषोत्तम मास’ होईल असा आशीर्वाद दिला. तेव्हापासून या महिन्याचा स्वामी पुरुषोत्तम श्रीकृष्ण मानला जातो. 

   सौर आधारित पंचांग पाळणाऱ्या राज्यांमध्ये (आसाम, ओरिसा, पश्चिम बंगाल, केरळ, तमिळनाडू )अधिक मास येत नाही.  परंतु चांद्रमास वापरणाऱ्या( महाराष्ट्र ,गुजरात ,आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश ) या ठिकाणी अधिक मास दर तीन वर्षांनी येतो. ज्या वर्षी अधिक मास येतो तेव्हा एकाच नावाने दोन चांद्र महिने येतात. पहिला अधिक तर दुसरा निज. अधिक म्हणून येणारे महिने चैत्र ते आश्विन पर्यंत कोणतातरी एक असतो अगदी क्वचित कार्तिक अथवा फाल्गुन हे मास अधिक म्हणून येतात . माघ  महिना मात्र कधीही अधिक म्हणून येत नाही.  एखादा महिना अधिक म्हणून आल्यानंतर जवळपास १९ वर्षांनी पुन्हा हा तोच महिना अधिक म्हणून येतो.

   ज्या वर्षी अधिक मास श्रावण ,भाद्रपद, आश्विन महिन्यात येतो त्यावर्षी चातुर्मास पाच महिने असतो.  हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाची असणारी एकादशी ही तिथी . अधिक मासामध्ये शुक्ल पक्षातील एकादशीला’ पद्मिनी एकादशी’ तर वद्य पक्षातील एकादशीला ‘परमा एकादशी’ असे म्हणतात.  बृहद नारदीय पुराणात पुरुषोत्तम मासाचे महात्म्य वर्णन केले असून त्याची स्वतंत्र पोथी आहे.  तिचे वाचन अधिक महिन्यात केले जाते.  हिंदू नववर्ष चैत्र महिन्यापासून चालू होते आणि गुढीपाडवा हा नववर्ष दिनाचा प्रथम दिवस असतो ज्यावेळी चैत्र महिना अधिक मास येतो तेव्हा या महिन्याच्या पहिल्या दिवशी संवत्सर बदलते परंतु या महिन्याचा पहिला दिवस गुढीपाडवा नसतो गुढीपाडवा नंतरच्या (निज) चैत्र मासाच्या प्रथम दिवशी साजरा केला जातो.  हिंदू चंद्र मासाची नावे हे त्या महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या नक्षत्रावरून ठेवली आहेत म्हणजेच चैत्र मासाच्या पौर्णिमेला चैत्र चंद्र चित्रा नक्षत्रात असतो.  वैशाख माणसाच्या पौर्णिमेला चंद्र विशाखा नक्षत्रात असतो. 

   याप्रमाणे मलमास म्हणजे मलीन मास या मलमासाची ची उत्पत्ती ‘मलीसन म्लोचति ,गच्छ्तीति मलिम्लुच : म्हणजेच मलीन असूनही पुढे पुढे सरकत राहणारा मास यावरून आली आहे. ज्या वर्षी आषाढ हा महिना अधिक म्हणून येतो तेव्हा कुमारी चांगल्या वर प्राप्तीसाठी तर विवाहित स्त्रिया सौभाग्य पृथ्वीसाठी’ कोकिळा व्रत’ करतात.  कोकिळा रूपी गौरीचे पूजन करतात, व्रत कथेचे वाचन ,उपवास करून दररोज संध्याकाळी उपवास सोडताना कोकिळेचा आवाज ऐकतात . अधिक मासा च्या शेवटच्या दिवशी दान पूजा करून उद्यापन केले जाते . 

   याच अधिक मासाला खूप ठिकाणी ‘धोंड्याचा महिना’ म्हणतात.  महाराष्ट्रामध्ये अगदी कमी लायकीच्या व्यक्तीला दगड्या , धोंड्या असे म्हटले जाते त्याच पार्श्वभूमीवर हा मलमास ! खूप सारे शुभकार्य या महिन्यात वर्ज्य असतात.  कधीतरी एखाद्या हौशी गृहिणीने खरच धोंडे बनवले ते पण पुरण  घालून ,त्याचा पुरुषोत्तम श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवला, आणि तेव्हापासून लक्ष्मीनारायण स्वरूप लेक जावयाला घरी बोलावून त्यांचा सन्मान करून त्यांना धोंड्याचे जेवण करून घालण्याची प्रथा उदयास आली . आज ही प्रथा सर्वत्र बोकाळली आहे . या अधिक मासात जावयाला चांदीच्या तबकात 33 अनारसे  आणि त्यावर तांब्याचे दीपदान ठेवून दान म्हणून देण्याची प्रथा आहे.  आज कालअनारश्या  ऐवजी बत्तासे, घेवर ,मैसुरपाक असे सच्छिद्र पदार्थदेखील दानामध्ये देतात तसेच नारळ, केळी, सुपारी अशासारख्या शुभ फळांचे देखील दान केले जाते.  मुरलीधर श्रीकृष्ण स्वामी असणाऱ्या या महिन्यात श्रीकृष्णाची उपासना केली जाते.  काही व्रते ,नियम आवर्जून या महिन्यात केले जातात . आवळीच्या झाडाखाली स्नान करण्याला या महिन्यात विशेष महत्त्व आहे. 

   मलमास  असल्याने या महिन्यात कोणतेही मंगल कार्ये  होत नाहीत. काम्य  व्रते वर्ज्य आहेत. परंतु भक्तीयुक्त अंतःकरणाने श्रद्धापूर्वक उपासना कर्मे, व्रते, तीर्थयात्रा, तीर्थस्नानें  गोष्टी केल्या जातात . देव प्रतिष्ठापना, नूतन वास्तू आरंभ, वास्तुशांत, विवाह, उपनयन किंवा यज्ञयागादि विशेष मंगल कार्य या महिन्यात करत नाहीत.  ढोबळ मानाने दर  तेहतीस महिन्यांनी येणाऱ्या या अधिक मासात 33 या आकड्याला विशेष महत्त्व आहे दान, जप या गोष्टी करताना तेहतीस अथवा त्याच्या पटीत करतात . बोली भाषेत बोलतानातेहतीस  न म्हणता तीस तीन  असा उल्लेख केला जातो . पुरुषोत्तम मासा संबंधी धर्मग्रंथांमध्ये

येह् नामर्चितो भक्त्या मासेस्मिन पुरुषोत्तमे |

धन पुत्र सुखं भुक्त्वा पश्चात  गोलोक वासभाक्  ||

असे म्हणले जाते. म्हणजेच जो कोणी अधिक मासामध्ये नामस्मरण ,अर्चन, पुरुषोत्तमाची भक्ती करतो त्याला धन, पुत्र ,सर्व सुखे आणि त्यानंतर गोलोक वास प्राप्त होतो .

   खरे पाहता अधिक मास ही एक पूर्ण भौगोलिक घटना . परंतु या घटनेचे संदर्भ आपल्याला पुराणकाळापासून  सापडतात. भौगोलिक तथ्ये, त्याला पुराणकथांची पार्श्वभूमी आणि या पार्श्वभूमीला अनुसरून असणाऱ्या लोकजीवनातील काही प्रथा, परंपरा यांच्या सुंदर विणीचा गोफ आपल्याला भारतीय संस्कृतीमध्ये पाहायला मिळतो. आपल्या रोजच्या जीवनात हे सण ,उत्सव रंग भरतात .

   हिंदूंच्या सण वार ,व्रत, वैकल्ये यामधून समृद्ध भारतीय संस्कृतीचे दर्शन तर घडतेच, परंतु हे सर्व म्हणजे केवळ धार्मिक कर्मकांड नसून यांद्वारे काही सामाजिक संदेश, पर्यावरणीय संदेश दिले जातात. या सर्व गोष्टीमागे एक पारमार्थिक,नैतिक अधिष्ठान असते. परमेश्वरावरील श्रद्धा बळकट करून ते आपले जीवन एक उच्च  पातळी गाठत असते.

   याच अधिक मासाच्या काही मनोरंजक उत्पत्ती कथा पाहूयात पुढील लेखात!!

Theme: Overlay by Kaira