अधिक मास उत्पत्ती कथा

adhik-maas-utpatti

   सध्या चालू असलेल्या अधिक मासाची नेमकी उत्पत्ती कधी झाली, कोणी केली , त्याला ‘मलमास’ का म्हणतात? तसेच मलमासाचे नाव ‘पुरुषोत्तम मास’ कसे झाले या आणि आणि अशा अधिक मासाविषयी काही मनोरंजक कथा !!

   एकदा नारदांनी नारायण ऋषींना तीन वर्षांनी येणाऱ्या तेराव्या मासाची म्हणजेच ‘अधिक मासाची’ उत्पत्ती विचारली. त्यावेळी नारायण ऋषींनी नारदाला सांगितलेली अधिक मासाची कथा अशी- सृष्टीमध्ये एकदा पापांचा भार खूप वाढला. लोक दुष्कृत्य करण्यास जास्तीत जास्त प्रवृत्त होऊ लागले आणि या दुष्कृत्यांमुळे निर्माण होणारा पापाचा भार आता आपण सहन करू शकत नाही अशी तक्रार बाराही महिने करू लागले. शेवटी बाराही महिन्यांना पाप भार अत्यंत असह्य झाला आणि प्रत्येक महिन्याने आपल्या पोटातील पापाचा तिसरा भाग बाहेर टाकला. या सर्व बाहेर टाकलेल्या भागापासून एक संपूर्ण महिना तयार झाला. बारा महिन्यांनी टाकलेल्या पापापासून निर्माण झालेला हा महिना ‘मलीन मास’, ‘मलीन महिना’ म्हणून ओळखू जाऊ लागला. या पापमय मलीन महिन्याचे नाव ‘मलिम्लुच’.

   असा हा मलीन महिना, सर्वजण त्याची निर्भत्सना करू लागले, त्याला हीन मानू लागले , त्याचा तिरस्कार करू लागले. निराधार ,निराश्रित अवस्थेत हा कोणी स्वामी नसलेला महिना अत्यंत दुःखी आणि व्यथित झाला. तसेच मलीन असल्यामुळे त्याला अशुभ मानले गेले. कोणतीही धर्मकार्ये या महिन्यांमध्ये होईनात. या सर्व गोष्टींमुळे हा महिना विष्णूकडे गेला आणि आपल्यावरील हा कलंक दूर करावा अशी विनंती या मलमासाने श्री विष्णूंना केली. तेव्हा श्री विष्णू त्याला घेऊन गोलोकी श्रीकृष्णांकडे गेले.

   श्रीकृष्णांनी अधिकमासाला अभय दिले आणि स्वतःचे सर्व गुण त्याला प्रदान केले. यापुढे लोक तुला माझ्या नावाने ओळखतील असे वचन दिले . श्रीविष्णूने देखील लोक आता अधिक मासात जास्तीत जास्त धर्मकार्य तसेच दानविधि करतील असा आशीर्वाद दिला. तेव्हापासून ‘मलमास’ बनला ‘पुरुषोत्तम मास’ आणि या मासाचा स्वामी झाला ‘श्रीकृष्ण पुरुषोत्तम’. याच कारणामुळे या महिन्यात केली जाणारी व्रते कृष्णाची तसेच विष्णूची आराधना सांगणारी आहेत .तसेच पुरुषोत्तम व्रताचा भोक्ता, अधिष्ठाता, फलदाता आता आपणच आहोत असे कृष्णाने स्वतः सांगितल्याचे भविष्य पुराणकारांनी लिहून ठेवले आहे.

   दुसरी कथा सुदेव आणि आणि गौतमी या विष्णुभक्त पती-पत्नींची सांगितले जाते . या जोडप्याचा एकुलता एक मुलगा अचानक मृत झाल्याने ते शोकग्रस्त झाले. मुलाचे दहन झाल्यानंतर शोकाकुल अवस्थेत ते बसून राहिले, न खाण्यापिण्याचे भान न देहभान. खूप पाऊस सुरू झाला तर उठून जाण्याचे भान देखील त्यांना राहिले नाही. त्यामुळे ते पावसात पूर्ण भिजले. तशातच कडकडीत उपवास देखील घडला. हे सर्व घडले तेव्हा अधिक मासाचा पर्वकाल चालू होता. दिवसभराचा उपवास ,पुत्र शोकाने विव्हल अवस्था आणि पर्जन्याने घातलेले स्नान या सर्व पुण्याचा संगम एकत्र झाला आणि त्यांचा पुत्र जिवंत झाला .नकळत का होईना त्यांच्याकडून पुण्य घडले आणि त्यांना पुढील जन्म राजाराणीचा प्राप्त झाला. नूतन जन्मामध्ये सुदेव राजा दृढधन्वा झाला आणि गौतमी राणी गुणसुंदरी बनली. नकळत घडलेल्या अधिक मासातील पुण्याने त्यांचे आयुष्य सुखी आणि समाधानी झाले.

   याच प्रकारची अजून एक कथा सांगितली जाते मणिग्रीव व आणि त्याची पत्नी हे जन्मजात दरिद्री. तेव्हा उग्रदेव मुनींनी त्यांना अधिक मास व्रत आणि दीपदान करण्यास सांगितले. त्यांनी मुनींचे सांगणे तंतोतंत पाळले . त्यामुळे पुढील जन्मात यांना राजा चित्रांगद आणि राणी चंद्रकलेचा जन्म प्राप्त झाला.

   हिरण्यकश्यपू आणि नरसिंहाची गोष्ट आपल्या सर्वांनाच माहीत आहे. परंतु या कथेला अधिक मासाचा एक धागा जोडलेला आहे हे किती जणांना माहित आहे? भागवत पुराण सहावा स्कंद पहिलया पाच अध्यायामध्ये आपण ही कथा पाहू शकतो. एकदा हिरण्यकश्यपूने घोर तपस्या करून ब्रह्माला प्रसन्न करून घेतले. प्रसन्न झाल्यानंतर ब्रह्माने हिरण्यकश्यपूला वर मागण्यास सांगितले. तेव्हा हिरण्यकश्यपूने वर मागितला की मला घराच्या आत/ घराच्या बाहेर, दिवसा/रात्र, शस्त्राने/आयुधाने , मनुष्याच्या अथवा प्राण्याचा हातून बाराही महिने मृत्यू येऊ नये . ब्रह्मदेवाने तथास्तु म्हणताच हिरण्यकश्यपूला स्वर्ग दोन बोटे उरला. स्वतः अमरत्व प्राप्त केले असा त्याचा समज झाला आणि मग त्याचा अंदाधुंद कारभार चालू झाला. अनाचार वाढल्यानंतर मात्र विष्णूने नरसिंह अवतार घेऊन उंबर्‍यावर बसून आपल्या तीक्ष्ण नखानी नरसिंहाचा संध्याकाळी वध केला आणि त्या वेळी अधिक महिना म्हणजेच तेरावा महिना चालू होता. अशा पद्धतीने हिरण्यकश्यपूचा शब्द पाळून देखील श्रीविष्णूने त्याचा वध केला आणि पृथ्वीला संकट मुक्त केले.

   या काही अधिक मासासंबंधी पुराणातील कथा, काही अतर्क्य ,अविश्वसनीय भाग नक्कीच त्यात आहे. पण पूर्वीच्या काळी सुशिक्षित वर्ग फार कमी होता. स्त्रियांना तर शिक्षणाचा देखील अधिकार नाकारण्यात आला होता. कोणतीही गोष्ट जनमानसामध्ये रुजवायची तर मौखिक परंपरा जास्त प्रभावशाली असणे जरुरीचे असते. तसेच या कथा अगदीच नीरस वाटू नयेत यासाठी काही रंजक भाग त्यामध्ये टाकलेला दिसतो. पुराणातील कथा जर शब्दश : खऱ्या मानायच्या ठरविल्या तर अपेक्षाभंग आणि नको त्या गोष्टींचा जास्त पगडा लोकांवर बसला असता. म्हणूनच अशा कथा पुराणातील वानगी (उदाहरण) म्हणून लक्षात ठेवाव्या. इथे देखील सरसकट वानगी च्या ऐवजी (वांगी ) म्हणणारे आहेत. शेवटी नीरक्षीरविवेक बुद्धी वापरून काय घ्यावे आणि काय टाकावे हे जाणण्याइतके लोक सुज्ञ आहेतच. फोलपट ,कचरा टाकून देऊन आपल्या समृद्ध भारतीय संस्कृतीचा गाभा आपणच सुरक्षित ठेवला पाहिजे.

   पुढील भागात पाहूया अधिकमासानिमित्त करावयाची दाने आणि व्रते. वाचायला विसरू नका ,’अधिकस्य अधिकं फ़लम् ‘.

Theme: Overlay by Kaira