अधिकस्य अधिकं फलम्

   अधिक मासाची उत्पत्ती कथा तसेच त्याची इतर माहिती आपण पाहिली. अधिक मासाचे प्रथम ‘मलमास’ म्हणून असणारे स्वरुप आणि नंतर श्रीकृष्णाने त्याला दिलेले ‘पुरुषोत्तम मास’ हे नाव , या दोन कारणांमुळे या महिन्यात केल्या जाणाऱ्या धार्मिक कर्माची आणि व्रतांची गुंफण दुपेडी असल्याचे आपल्या लक्षात येते . जेव्हा अधिक मासाचा मलमास म्हणून विचार होतो तेव्हा एखादी अशुभ, अप्रिय घटना निवारण्यासाठी काही धार्मिक कार्ये केली जातात, अशा काही कार्यांचा समावेश होतो तर नंतर जेव्हा ‘पुरुषोत्तम मास’ असे नाव त्याला देण्यात आले तेव्हा पुरुषोत्तम श्रीकृष्णाची उपासना आणि त्याच्याशी निगडीत व्रते अशा गोष्टींची रेलचेल दिसून येते.

   एखादा जास्तीचा येणारा परंतु पवित्र मानला जाणारा महिना म्हणजे मलमास . ही अपवित्रता नाहीशी करण्यासाठी दान, यात्रा, तीर्थसस्नान , जपजाप्य अशा गोष्टी केल्या जातात. तर हा पवित्र मास असल्याने कोणत्याही शुभारंभाची तसेच मंगल कार्यांची कामे या महिन्यात केली जात नाहीत. आवळा बहुऔषधी असणारी वनस्पती, या अधिक मासात आवळीच्या झाडाखाली केल्या जाणाऱ्या स्नानाला विशेष महत्व आहे . अधिक मास म्हटला आणि अनारश्याची आठवण झाली नाही असे होत नाही. या वर्षाचे अधिक तीन या पटीत दान केले जाते. विशेषतः ज्यांना विवाहित मुलगी आहे ते लेक जावयास लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणून अधिक मासाचे वाण देतात. या महिन्यात लेकीने आईची ओटी भरावी असा देखील प्रघात आहे.अनारश्याना संस्कृत मध्ये अपूप असे नाव आहे आणि त्याची उत्पत्ती ‘न पूयते’, म्हणजेच जो शिळा होत नाही, कुजत नाही असा. तसेच या अपूपाला त्याचा वाटोळे आणि लाल स्वरूप यामुळे सूर्याचे प्रतीक मानले गेलेआहे. लेकीचा संसार कायम ताजा रावा त्याला शिळेपणा येऊ नये म्हणून हे अपूपदान.अपूप ज्या तांदुळापासून बनतात त्या तांदूळ या धान्याला देखील विशेष महत्त्व आहे . सर्वात प्राचीन आणि क्षते न पडणारे म्हणजेच अक्षत असणारे हे धान्य. यापासून अपूप तयार होतात.

   उत्पत्ती, स्थिती आणि लय या चक्रात स्थिती टिकवून ठेवणे हे विष्णूचे कार्य मानले जाते .आपल्या पृथ्वी पुरता विचार केला असता स्थिती टिकून ठेवण्याचे कार्य सूर्य करतो , म्हणून सूर्याला विष्णू मानून त्याच्या प्रतीकाचे दान केले जाते. वैष्णवांच्या पूजेमध्ये विष्णू -सूर्य अभेद आहेत असेच मानले जाते. विष्णू रूप सूर्य देवतेचे पूजन अधिक महिन्यात व्रत म्हणून केले जाते. अगस्ती ऋषींच्या शापाने पृथ्वीवर सर्प होऊन पडलेल्या भरत वंशीय नहुष राजाला शाप मुक्त होण्यासाठी व्यासमुनीने सांगितलेले व्रत ते हेच. त्याने हे व्रत केल्यानंतर तो शापमुक्त झाला असे सांगितले जाते .अपूपदान करताना खालील मंत्र म्हणतात,

विष्णुरुप् सहस्रन्शु सर्व पाप प्रणाशनः |

अपूपान्न दानेन ,मम पापं व्यपोहस्तु ||

   याच सूर्याचे पृथ्वीवरील तेजस्वी प्रतीक म्हणजे दिवा. या दीपाचे देखील अधिक मासात महत्त्व आहे .सूर्याचे प्रतीक म्हणून दीपदान देखील केले जाते. या काळात प्रत्येक जण आपापल्या शक्तीनुसार, कुवतीनुसार उपासना, दानधर्म करतात. स्त्रियांची बरीच व्रते सौभाग्यवर्धक असतात तसेच श्रीकृष्ण उपासनेची असतात. गाईला नियमित खाऊ घालणे , तांबूल दान करणे, महिनाभर देवासमोर तुपाचे निरांजन लावून शेवटच्या दिवशी तो दिवा ब्राह्मणांना दान देणे अशी अनेक व्रते या मासात केली जातात. पुरणाचे धोंडे अगर दुसरे काही सच्छिद्र पदार्थ यांचेही दान केले जाते. अधिक मास पोथीचे वाचन केले जाते . अधिक मासात शुक्ल आणि कृष्ण पक्षात वेगवेगळी दाने केली जातात . शुकल पक्षामध्ये मालपुवा, खिरीचे पात्र, दही सुती, रेशमी वस्त्र, गरम कपडे, तिळगुळ, तांदूळ, गहू, दूध, साखर, मध, तांब्याचे पात्र ,चांदीचा नंदी अशी दाने करतात. तर कृष्णपक्षात तूपाने भरलेले चांदीचे निरंजन, सोन्याचे अथवा काशाचे भांडे, हरभरा, खारीक, तूरडाळ, लाल चंदन, कापूरअथवा केवडा अगरबत्ती ,केशर, कस्तुरी, गोरोचन, शंख, घंटी , मोती ,हिरा, पाचू हे देखील दान करतात.

   अन्य काही करणे शक्य नसेल तर साधुसंतांचे मनोभावे पूजन आणि सेवा केले जाते थोडक्यात काय तर ‘सत्य संकल्पाचा दाता परमेश्वर’ असतो काळानुसार दानाचे स्वरूप बदलणे देखील आवश्यक असते. गरजू आणि सत्पात्री व्यक्तींना योग्य ते दान देणे काळानुसार बदलावे देखील. तीस अधिक तीन च्या पटीत अनाथाश्रमात अथवा वृद्धाश्रमात फळांचे दान, तेहतीस विद्यार्थ्यांना गणवेशाचे किंवा तेहतीसच्या पटीत गरजूंना वह्यांचे दान, पुस्तकांचे दान ही देखील व्रतेच आहेत . ज्या समाजात आपण वावरतो त्या समाजाच्या ऋणातून या पद्धतीने थोडे तरी उतराई होऊ शकतो.

   सध्याच्या दिवसात मात्र अधिक मासाला सरसकट धोंड्याचा महिना म्हणण्याचा प्रघात पडलेला दिसतो आणि धोंड्याचा महिना म्हणजे लेकी जावयांना बोलावून त्यांना धोंड्याचे जेवण घेऊन त्यांचा मानसन्मान करणे .या प्रथेला विकृत स्वरूप येताना दिसत आहे. धोंड्याच्या महिन्यात सोने-चांदी स्वरूपात जणू प्रति हुंडा दिला जात आहे . खोट्या प्रतिष्ठेपायी काही समाजातील लोक या प्रथेला वेगळे वळण लावताना दिसत आहेत. आणि त्यांचे अनुकरण करताना ज्यांची ऐपत नाही असे लोक देखील प्रसंगी कर्ज काढून ही वेळ साजरी करत आहेत. लोकपरंपरा अभ्यासक आणि ज्येष्ठ लेखिका डॉक्टर तारा भवाळकर देखील या संदर्भात आपले मत व्यक्त करताना सांगतात पूर्वीच्या काळी पुण्यासारख्या सनातनी शहरात केळीच्या पानावर अथवा पत्रावळीवर ठेवून तेहतीसअनारश्याचे वाण त्या वाणावर दीप तेववून दीपदान म्हणून दिले जायचे . लेकीला खणाचे कापड दिले जात असे. आज काल वाणाचे प्रस्थ फारच वाढले असून जेवणावळी ,सोन्या -चांदीच्या, वस्तू कपडालत्ता असे स्वरूप आले आहे. जणू काही हा छुपा हुंडाच!

   या सर्व गोष्टी अधिक मासानिमित्त कराव्यात असे धर्म सांगत नाही. काही तरी अनिष्ट प्रथा पाडून त्या मासाच्या मूळ गाभ्याला धक्का लागतो आहे शिवाय कर्मकांडे असतात असा डांगोरा पिटला जातो तर वेगळेच . पंचमहाभूतांपासून बनलेल्या आपल्या शरीराला व्रत ,नियम, जप करून वळण लावणे आणि त्यांचा बिघडलेला तोल सावरणे हे महत्त्वाचे. सर्वात जास्त गरज आहे ती या व्रतां कडे त्रयस्थ वृत्तीने पाहण्याची ,गरजू आणि सत्पात्री लोकांना आवश्यक त्या वस्तूंचे निर्विकल्प मनाने दान देण्याची आणि नरातील नारायण तृप्त करण्याची!!

Theme: Overlay by Kaira