आखाजी – खानदेशी दिवाळी

Akhaji

   अक्षय्यतृतीया खानदेशामध्ये ‘आखाजी’ म्हणून ओळखली जाते. अगदी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांना देखील ‘आखाजीची  सुट्टी’ असे म्हणतात. हा सण साजरा होऊन नंतर उन्हाळी सुट्ट्या चालू होतात. 

   उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांच्या सीमारेषेवरील खानदेश हा भाग. धुळे, जळगाव, नंदुरबार, मालेगाव जवळील काही भागाचा खानदेशात समावेश होतो. पूर्वी कान नावाच्या राजाचे राज्य असणारा असणारा हा ‘कानदेश ‘ म्हणून ओळखला जात असे. त्याचाच अपभ्रंश ‘खानदेश’. अहिराणी ही येथील अत्यंत गोड बोलीभाषा. भारतामध्ये इतर ठिकाणी कार्तिक महिन्यात दिवाळी साजरी होते. पण खानदेशात मात्र ‘आखाजी’लाच दिवाळीचे महत्त्व आहे. सर्व वार्षिक परंपरा, सालदार बलुतेदारांचे मान-पान आखाजीच्या शुभमुहूर्तावरच पार पडतात.  

   स्त्री वर्गाची माहेरची ओढ कालातीत आहे. मराठवाड्यात नागपंचमी, विदर्भात आखाडी तशी खानदेशात आखाजी! आखाजी साधून सासुरवाशिणी माहेरी येऊन विसावतात. बाहेर वैशाख वणवा पेटलेला असतो. 

“चैत्र वैशाखाचं उन्हं व माय

वैशाखाचं उन्हं

खडक तापून लाल झाले व माय

तापून झाले लाल”

   अशा या तापलेल्या लाल खडकातून सासुरवाशीण ‘मुराई’ बरोबर माहेरी येते आणि तिचे काळीज थंडावते. आखाजी आणि रोहिणी व कृत्तिका नक्षत्रे यांचा फार जवळचा संबंध आहे. 

   या आखाजीच्या सुट्टीच्या निमित्ताने सर्वजण एक प्रकारचे स्वातंत्र्य अनुभवतात. शेतकरी, शेतमजूर सुटी घेतात. सालदार म्हणून हातात पैसे खुळखुळत असतात. माहेरवाशिणी सासरचे व्याप-ताप विसरून माहेरी आलेल्या असतात. झोके, गाणी, झिम्मा, फुगड्या – मन प्रसन्नतेने भरून जात असते. इतर ठिकाणी संक्रांतीला उडविला जाणारा पतंग खानदेशात आखाजीला उडवतात. तसेच या दिवसात पुरुष लोक आवर्जून खुले आम जुगार खेळतात!

   गौराई आणि पितरांचा सण म्हणून आखाजी जास्त महत्त्वाची आहे. द्वितीयेच्या दिवशी गावातील स्त्री वर्ग मिरवणुकीने कुंभाराकडे जाऊन पार्वतीची छानशी मूर्ती वाजत गाजत घेऊन येतात.घरातील कोनाड्यात तिची प्रतिष्ठापना करतात. गावातून जात असताना त्या पुरुष वेषात सजवलेल्या मुलीला वाजत गाजत नेतात. त्याला ‘मोगल’ म्हणतात. मोगल ही मुलगी पॅन्ट, शर्ट, हॅट, डोळ्यावर गॉगल, हातात उघडे पुस्तक अशा थाटात चालत असते. तिच्या डोक्यावर छत्री धरलेली असते.

“अरे तू सुटबूटवाला मोगल, मना घर येजो रे

तुले टाकस चंदन पाट, मना घर येजो रे”

   गौराई बसवल्यानंतर तिला पुरणपोळी, आमरस, पुडाची पातोडी, घुण्या असा रीतसर नैवेद्य होतो आणि माहेरवाशिणी आंबराईकडे झोका, झिम्मा, फुगड्या खेळायला जातात. झोक्यावर बसून कथागीते गायली जातात. यांनाच आखाजीची गाणी म्हणतात. 

“अथाणी कैरी तथानी कैरी

कैरी झोका खाय व

कैरी तुटनी खडक फुटना 

झुयझुय  पानी ऱ्हाय व”

   आखाजीचा दुसरा दिवस गौरी विसर्जनाचा असतो. पाटावर आपापल्या घरातील गौराई घेऊन सामुदायिक गौराईची गाणी म्हणत नदीकाठी जातात. त्यावेळी नदीच्या दुसऱ्या काठावरील स्त्रिया देखील गौरी विसर्जनासाठी आलेल्या असतात. या दोन गावांमधील स्त्रियांमध्ये शिव्या देणे, गोटे मारणे अशा तऱ्हेची गौराई लढाई होते. सध्या ही प्रथा अस्तंगत होताना दिसत आहे. 

   गौराई विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी जड मनाने मुली सासरी जाण्यास निघतात तेव्हा आईला दिवाळीसाठी थोरल्या ‘मुराई’स पाठवण्यास बजावतात. 

“धाकला मुराई नको धाड जो 

मायबाई आंबानी आमराई 

राघो मैनाना जीव भ्याई “

   सासुरवाशीण सासरी निघताना पतीच्या रथाचे झोकदार वर्णन करते. 

“गडगड रथ चाले रामाचा 

नि बहुत लावण्याचा 

सोला साखल्या रथाला 

नि बावन्न खिडक्या त्याला “

   याच आखाजीच्या सणाची पितरांचे पूजन ही दुसरी बाजू. मोसमातील आंबा तसेच माठातील पाणी, वाळा अशा गोष्टी पितरांना अर्पण केल्याशिवाय घरात खात नाहीत. जलाने भरलेला घट या दिवशी आवर्जून दान करतात. खानदेशामध्ये पितरांची पूजा करताना दोन स्तरांवर केली जाते. पहिल्या वर्षीच्या श्राद्धासाठी डेरगं वापरतात तर एक वर्षापेक्षा जास्त काळ असतो तेव्हा घागर वापरतात. खरे तर डेरगं आणि घागर एकाच आकाराची मातीची भांडी असतात. फक्त डेरग्याला बाहेरून तैलरंग दिलेले असतात. 

   या डेरगं अथवा घागरीत पाणी भरून त्यावर पाण्याने भरलेले मातीचे घट ठेवतात. या मातीच्या घटांना कडांवर सुताचे पाच वेढे गुंडाळले जातात. आधीच उगवून ठेवलेल्या गव्हाच्या हिरव्या पिवळ्या रोपांचे जुडगे दोरा गुंडाळून त्यावर उभे करतात. घागर मातीच्या चार ढेकळांवर ठेवली जाते. या सर्वांच्या वर सांजोरी व इतर पदार्थांचे पान ठेवतात. याचदिवशी अग्नीला सुद्धा नैवेद्य अर्पण करतात. याला ‘आगरी टाकणे’ असे म्हणतात. 

   ‘विविधतेतील एकता’ हे भारतीय परंपरांचे मुख्य वैशिष्ट्य आहे. निरनिराळ्या प्रांतांत एकच परंपरा निरनिराळ्या पद्धतीने पुढे नेली जाते. परंतु या सर्व परंपरांच्या मुळाशी असणाऱ्या श्रद्धा आणि त्याचा गाभा सगळीकडे समान असल्याचेच दिसून येते. 

Theme: Overlay by Kaira