अक्षय्यतृतीया

    साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त मानली जाणारी तिथी म्हणजे अक्षय्यतृतीया. वैशाख शुद्ध तृतीयेस   ‘अक्षय्यतृतीया’ म्हणले जाते. ‘आखा-तीज’, ‘आखिदी’, ‘अकिदी’ ही याची बोलीभाषेतील नावे. 

    पुराणानुसार या दिवसापासून सत्ययुग, त्रेतायुगाचा प्रारंभ झाला असे मानले जाते. खूप महत्त्वाच्या घटना ज्या दिवशी घडून येतात तो शुभ दिवस, शुभ तिथी नक्कीच असते. उलटपक्षी असेही म्हणता येते की शुभ तिथी पाहूनच अनेक महत्त्वाच्या घटना घडतात! असेच अक्षय्यतृतीयेचा शुभ दिवस पाहून कित्येक महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत! अन्नपूर्णा जयंती, नर-नारायण  या जोडदेवाची जयंती, हयग्रीव जयंती, परशुराम जयंती अशा अनेक महान अवतारांनी  अक्षय्यतृतीयेच्या दिवशी जन्म घेतला. 

    याच दिवशी महर्षीव्यासांनीमहाभारत ग्रंथरचनेस प्रारंभ केला. ज्याचे लेखनिक म्हणून प्रत्यक्ष विद्येची अधिष्ठाती देवता ‘गणपती’ने काम केला! गणपती म्हणजे महर्षी व्यासांचा आद्य स्टेनोग्राफरच जणू! अक्षय्यतृतीयेचा शुभ मुहूर्त साधून सूर्यवंशातील भगीरथ राजाने गंगेला स्वर्गातून पृथ्वीवर अवतरीत केले आणि पृथ्वी पावन झाली. आजही गंगामाता अनेकांचे पापक्षालन आणि पालनपोषण करत आहे. 

    फक्त अक्षय्यतृतीयेच्याच दिवशी वृंदावन येथील ‘बांके बिहारी’ यांच्या श्रीविग्रहाचे चरणदर्शन घेता येते. बाकी पूर्ण वर्ष हे चरण झाकलेले असतात. तसेच या दिवशी  भारताच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायण मंदिराचे दार उघडले जाते. ‘कपाट उघडणे’ अशी संज्ञा यासाठी पूर्वीपासून वापरली जाते. 

    भारतामधील प्रत्येक सण कृषिसंस्कृती तसेच ऋतूंमधील बदल यांना अनुलक्षून साजरे होतात. अक्षय्यतृतीया या सणाच्या मागे हे दोन हेतू तर आहेतच, त्या व्यतिरिक्त दानाचे महत्त्व जनमानसावर ठसवणे तसेच पूर्वजांचे ऋण फेडणे हेदेखील उद्देश आहेत.

    अक्षय्यतृतीयेच्या दिवशी जगत्पालक विष्णु-लक्ष्मीची पूजा तर केली जातेच परंतु पूर्वजांचेदेखील श्राद्ध करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. प्रपंच मार्गावरून चालताना या विश्वाचे पालक आणि आपल्या पूर्वजांची पुण्याईच आपल्याला जाणवणाऱ्या ‘वैशाख-वणव्यातून’ वाचवू शकते ही गाढ श्रद्धा याच्यामागे असावी. अक्षय्यतृतीयेच्या दिवशी केलेले दान, होम-हवन पुण्याई वाढवते व ही पुण्याई अविनाशी असते. तिचा क्षय होत नाही असे स्वतः श्रीकृष्णांनी ‘मदनरत्न’ या ग्रंथात सांगितले आहे.

“अस्यां तिथौ क्षयमुपैति हुतं न दत्तं ।

ते नाक्षयेति कथिता मुनिभिस्तृतीया ।।”

    अनंत पुरणारा पुण्याचा साठा यादिवशी दान-तर्पण-पूजनाने  कमावता येतो.

    जैन धर्मानुसार ऋषभदेव यांनी वर्षभर तप करून पूर्णत्व प्राप्त केले. या काळात त्यांनी अन्नपाणी ग्रहण केले नव्हते. व्रतसमाप्तीनंतर ते हस्तिनापूर येथे आले असता तेथील राजाने त्यांना उसाचा रस पाजला व व्रताचे पारणे केले अशी कथा आहॆ. धर्म नावाच्या सद्गृहस्थास दुर्दैवाच्या फेऱ्याने दारिद्र्य प्राप्त झाले. अक्षय्यतृतीया माहात्म्य ऐकून त्याने यथाशक्ती दानधर्म चालू ठेवला. या पुण्याईवर तो पुढील जन्मी राजा झाला. त्याच्या दानशूर वृत्तीमुळे त्याची पुण्याई क्षय पावली नाही. त्याने खूप राज्यसुख भोगले अशी देखील कथा सांगितले जाते. 

    या दिवशी विष्णुप्रीत्यर्थ ‘वसंत-माधव’ पूजन केले जाते. आवर्जून सोनेखरेदी केली जाते. वैशाखातील दाहक उन्हापासून बचावासाठी छत्री, जोडा दान करण्यात येतो. नवीन पाणपोया सुरु करण्यात येतात. कृषिसंस्कृतीचे उपासक या दिवशी ‘हलधर बलरामाची’ पूजा करतात. मृग नक्षत्र आणि अक्षय्यतृतीया यांचा घनिष्ठ संबंध आहे. पुढे सुरु होणाऱ्या पावसाळ्यासाठी आवश्यक त्या शेतीकामांचा या मुहूर्तावर प्रारंभ करतात. 

    ओरिसा राज्यात या दिवशी पालेभाज्या व मांसाहार वर्ज्य करतात. लक्ष्मीचे पूजन करतात व नवीन धान्य पेरतात (मुठी चुहाणा) महाराष्ट्रात महिनाभर चाललेल्या चैत्रगौरी उत्सवाची सांगता या दिवशी होते. उत्तर भारतात परशुराम जयंती, गंगास्नान यज्ञ, दान करणे अशा गोष्टी या दिवशी केल्या जातात. दक्षिण भारतात महाविष्णु आणि लक्ष्मी कुबेर पूजन केले जाते. तर पश्चिम बंगालमध्ये ‘हालकटा’ या नावाने गणपती व विष्णुची विशेष पूजा करतात. नव्या हिशेबाच्या वह्या या दिवसापासून व्यापारी लोक वापरात आणतात. राजस्थानमध्ये हा दिवस ‘आखा-तीज’ म्हणून साजरा होतो. या दिवशी राजस्थानात आवर्जून विवाह लावले जातात!

    अक्षय्यतृतीयेच्या दिवशी पितरांच्या कृतज्ञतेपोटी तीळ अर्पण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो. या दिवसापासूनच अनेक ठिकाणी माठातील पाणी व आंबे खाण्यास सुरुवात करतात. हा मुहूर्त साधून बीज पेरले असता उदंड पीक येते असे मानले जाते. तर या दिवशी लावलेल्या फळबागा उत्तरोत्तर बहरतात असाही विश्वास आहे. त्यासाठी या मुहूर्तावर आवर्जून वृक्षारोपण केले जाते. या दिवशी लावण्यात आलेल्या आयुर्वेदिक वनस्पतीदेखील जास्त गुणकारी ठरतात व जोमाने वाढतात. म्हणून या दिवशी त्यांची लागवडदेखील केली जाते. 

    एकूणच काय मानवी देह नश्वर असला तरीही त्यांचा वंश अक्षय्य आहे. देह नष्ट झाला तरी चांगल्या कार्यरूपाने आपण चिरंतर राहावे व आपल्या वंशजांना चांगला वारसा द्यावा. गरजू लोकांना थोडा तरी दिलासा मिळावा म्हणून या ऋतूत आवश्यक गोष्टींचे दान करावे. हाच अक्षय्यतृतीयेचा संदेश!

Theme: Overlay by Kaira