आम्ही अंबेचे गोंधळी

   महाराष्ट्रामध्ये कोणत्याही मंगल कार्याची सांगता गोंधळ घालून केली जाते. हा गोंधळ घालणारे गोंधळी लोक गायक असतात. ते अष्टपैलू कलावंत असतात. गोंधळ घालताना देवीची गाणी, स्तवने ते सादर करतात. ही गाणी पारंपरिक असून मौखिक परंपरेने ते ही गाणी जतन करतात. यांची गायन शैली वैशिष्ट्यपूर्ण असते. आणि सादरीकरणामध्ये गायन, वादन, नृत्य, नाट्य असा चौफेर अविष्कार असतो. गण -दल अर्थातच लोक समूहाने सादर करण्यात येणारा नृत्यनाट्य प्रकार! या गण- दलाचे नंतर गोंधळ असे सुटसुटीत नाव पडले. गोंधळ घालणारे ते गोंधळी!

   हे लोक महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश या भागांमधून प्रामुख्याने आढळून येतात. कीर्तन, तमाशा या लोकगीत सादरीकरणानंतर तिसरा महत्त्वाचा मानला गेलेला, आजही उर्जितावस्थेत असलेला काळाच्या गतीने आपली पावले टाकणारा हा उपासना प्रकार. या गोंधळ प्रथेच्या उत्पत्तीच्या काही रंजक कथा सांगितल्या जातात. त्याचा उगम खूप प्राचीन आहे असे सांगतात. अगदी पहिला गोंधळ आदिमाया शक्तीला जागृत करण्यासाठी घातला गेला. त्यानंतर दशावताराच्या दहाही अवतारांमध्ये एकेक गोंधळ घातला गेला मस्त्य अवतारात हंकाराचा, वराह अवतारात ब्रह्माचा, नरसिंह अवतारात ब्राह्मण रूपाचा म्हणजेच माया स्वरूपाचा तर परशुराम अवतारात त्रिभुवनाचा गोंधळ घालण्यात आला. ही वर्णने पाहताना विश्वनिर्मितीच्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर गोंधळ घालण्यात आला असेही लक्षात येते.

   सध्याच्या गोंधळाचे स्वरूप मात्र परशुरामांनी केलेल्या मातृवंदना येथून प्रस्थापित झाले आहे. परशुरामाने बेटासूर नावाच्या दैत्याचा वध करून त्याचे शीर कापले. त्याच्या नसा कापून त्यांना त्याच्या कवटीचा रंध्रातून त्याच्या डोक्याच्या रंध्रात ओवून ‘तितृण तितृण‘ असा आवाज करीत माता रेणुकेजवळ येऊन तिला वंदन केले. या वंदनातून पुढे सद्यकालीन गोंधळाचा उगम झाला. त्या वाद्यास तुणतुणे म्हणूनआजही गोंधळ विधीत महत्त्वाचे स्थान आहे. गोंधळाच्या उत्पत्तीमागे एक बाल गोंधळीची कथा देखील प्रसिद्ध आहे. एकदा एका लहानशा बालकाने माता भवानीची मनोभावे भक्ती ,उपासना केली. त्याच्या अपार भक्तीने भवानी त्याच्यावर प्रसन्न झाली. त्याच्यासारखीच भक्ती त्याने इतर जनांच्या मनात निर्माण करावी म्हणून तू माझे गाणे गात फिर आणि ऐकणार्‍याच्या मनात माझी भक्ती निर्माण कर. त्या बदल्यात भक्त तुला दान देतील, तुला कधीही काहीही कमी पडणार नाही असा आशीर्वाद दिला. त्याने देखील देवीचे गाणे गाऊन तिचा प्रसार सुरू केला. हा आद्य गोंधळी मानला जातो. तेव्हापासून भक्ती निर्माण करण्यासाठी देवीने आपल्यालाही भटक्याचे, भिक्षेकऱ्याचे जीवन दिले असल्याची गोंधळ्यांची गाढ श्रद्धा आहे.

   प्रभू रामचंद्रांनी सीतेचा शोध घेण्याआधी बालेघाटी येथे गोंधळ घातल्याचा देखील उल्लेख आहे. संत एकनाथांच्या अभंगात देखील गोंधळ आढळतो. या कलेला राजाश्रय प्राप्त झाला आणि गोंधळी परंपरा कला म्हणून विस्तार पावली. छत्रपती शिवाजी महाराज निस्सीम देवी भक्त होते. तुळजापूरची भवानी त्यांचे कुलदैवत होते. महाराजांनी नवरात्रात अनेकदा दरबारात गोंधळ घालण्याचा विधी संपन्न केल्याचे साहित्यात दिसून येते. कदंब राजघराणे देखील तुळजाभवानीला आपली कुलदेवता मानत असल्याने कदंब-कदम-कदमराव-कदमराई हे तुळजाभवानीचे गोंधळी मानले जातात. त्यांच्या गोंधळाला ‘हरदासी गोंधळ’ असेही म्हटले जाते. एका हातात जळता पोत धरून एका हाताने संबळ वाजवत ते गोंधळ सादर करतात. त्यांनाच भुत्ये देखील म्हणतात. राजदरबारी गोंधळ घालण्याचा यांना मान होता.

   रेणराई हे दुसरे गोंधळी. विधि नाट्याचे वेळी देवतेसमोर दिवटी पेटवून ठेवतात. हे गोंधळी माहूरच्या रेणुका देवीचे गोंधळी असतात. सादरकर्त्यांच्या संख्येवरून गोंधळाचे उत्तम, मध्यम, कनिष्ठ असे तीन प्रकार पडतात. उत्तम वृंदात बत्तीस लोक, मध्यमवृंदात सोळा लोक आणि कनिष्ठ वृंदात आठ लोक असतात. तसेच ‘संबळ्या गोंधळ’ आणि ‘ काकड्या गोंधळ’ हे दोन मुख्य प्रकार देखील मानले जातात. काकड्या गोंधळात हातात काकडा घेऊन देवीची गाणी म्हणतात.

   ‘भळंदाचा गोंधळ’ हा एक विशिष्ट गोंधळाचा प्रकार असून, मातीची छोटी घागर फोडून अर्धी केली जाते. अर्ध्या तळाकडील भागात हिरवा खण ठेवून त्यावर सरकी टाकून त्यावर सरकीचे तेल टाकतात आणि ते पेटवतात. हे पेटलेले भळंदे आधी देवी भोवती ओवाळले जाते आणि नंतर वृंदा पैकी एक मानकरी ते भळंदे हातात घेऊन खेळतो. या वेळी त्याच्या अंगात संचार झालेला असतो असे म्हणतात. असे पेटते भळंदे खेळून झाल्यानंतर आरती होते नंतर दुधाने ते शांत केले जाते. विशेष म्हणजे शेवटी त्या मातीच्या घागरीच्या तळाशी ठेवलेला हिरवा खण जसाच्या तसा निघतो. इतक्या सर्व धगीचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. कुलाचार पूर्तीचा एक महत्त्वाचा विधी शास्त्रोक्त तरी रंजक पद्धतीने मांडणाऱ्या गोंधळी समाजाने आपली प्रतिष्ठा टिकवून ठेवली आहे. कालानुरूप गोंधळ या विधिनाट्यास वेगळे रूप देत एकवैशिष्ट्यपूर्ण आकृतिबंध निर्माण केला आहे. विविध आख्याने रचली .लौकिक आख्यानांची रचना करून सादरीकरणाची पद्धती निश्‍चित केली. आपल्या स्वतःची अशी नाचण्याची, गाण्याची वैशिष्ट्यपूर्ण लकब निर्माण केली. पोशाख, अलंकार, अंगावर बाळगण्याची देवीची

   चिन्हे, वाद्ये यामध्ये नेमकेपणा आणला आणि त्यांनी ही परंपरा प्रवाही ठेवली.

   आज ही परंपरा कुलाचार, उपासना म्हणून तर पाळली जाताना दिसतेच परंतु याचे कला म्हणून रंगमंचावर देखील सादरीकरण होतांना दिसते. गोंधळ या विधिनाट्याची मांडणी, गोंधळी लोकांचा पोशाख आणि इतर नाविन्यपूर्ण माहिती पुढील लेखात!!

Theme: Overlay by Kaira