अनंत व्रत

Anant Vrat

            अनंत चतुर्दशी म्हटले की पटकन डोळ्यासमोर गणपती विसर्जन येते. पण हिंदू धर्मात या दिवसाला आणखी वेगळे महत्त्व आहे. याच दिवशी वैष्णव पंथीय लोक ‘अनंत व्रत’ करतात. अनंत याचा खरा अर्थच मुळी  अमर्याद, कधी ना संपणारा असा आहे. त्यामुळे हे व्रत केल्यामुळे त्याची लाभणारी फळे देखील चिरकाल टिकणारी आणि मनाला संतोष देणारी आहेत. अग्नी पुराणानुसार या दिवशी भगवान विष्णूची अनंत रूपात पूजा मंडळी जाते. अनंत हे विष्णूचे नाव तर आहेच, परंतु विष्णू ज्या शेषनागावर शयन करतात त्याचे नाव देखील अनंत आहे.

           या पूजेमध्ये प्राचीन सर्पपूजेची लक्षणे दिसतात. बहुधा प्राचीन काळी नागपूजक असणाऱ्या लोकांनी वैष्णव धर्म स्वीकारल्यानंतर या पूजेची सुरुवात झाली असावी. या पूजेचा एकंदर विधी पहिला असता कुठेतरी कालियामर्दन या घटनेची आठवण येते. आणि महत्त्वाचे साम्य म्हणजे कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण देखील विष्णूचेच रूप आहे.

         अनंत व्रत ‘हे एक कौटुंबिक, कामनिक व्रत असून कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने हे व्रत अंगिकारल्यास त्या कुटुंबातील व्यक्ती परंपरेने हे व्रत पुढे चालू ठेवतात. हरियाणात देखील या दिवशी लोक अनंताचे व्रत घेतात आणि हातात ‘अणत'(अनंत!) बांधतात. गतवैभव प्राप्त करण्यासाठी आणि सुखसमृद्धी लाभण्यासाठी हे अनंत व्रत केले जाते. या व्रताची कथा सत्यनारायण कथेशी मिळतीजुळती वाटते. परंतु सत्यनारायण व्रत अलीकडच्या काळातील असून अनंत व्रत मात्र प्राचीन आहे. असे असले तरीही या दोन्ही व्रताची प्रधान देवता मात्र विष्णूच आहे.

         महाभारतामध्ये जेव्हा पांडवद्युतात  सर्वस्व हरतात तेव्हा त्यांच्या नशिबी १२ वर्षे वनवास आणि १ वर्ष अज्ञातवास येतो. यामुळे द्रौपदी  दुःखी होते, त्यावेळी गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्रीकृष्ण पांडवांना आणि द्रौपदीला हे व्रत सांगतात.

            या पूजेमध्ये एक लाल रेशमी १४ धाग्यांचा दोरा घेऊन त्याला १४ गाठी बांधतात. ह्या दोऱ्याला हळद, कुंकू,केशर लावून रंगविले जाते. ह्या दोऱ्यासच अनंताचे रूप मानले जाते. अनंताच्या या धाग्याची पूजा विष्णू समजून या दिवशी केली जाते. हा अनंताचा धागा एकतर वंशपरंपरेने घराण्यात चालत आलेला असतो किंवा कोणाला तरी सापडलेला असतो अथवा कोणीतरी दिलेला असतो किंवा कोणी हे व्रत मागून घेतात म्हणजेच आपल्या घरात नसले तरीही ज्यांच्या घरात हे अनंताचे व्रत आहे त्यांच्याकडून ‘अनंताचा धागा’ मागून घेऊन त्याची पूजा करतात.

           या पूजेचा विधी खालीलप्रमाणे आहे :

           चौरंगावर सर्वतोभद्र मंडल मांडूनत्यावरत्यावर कलश ठेवला जातो.  गुलाल किंवा कुंकवाने अष्टदल काढले जाते.ह्या अष्टदलावर दर्भांकुरयुक्त सात फण्यांच्या शेषनागाची स्थापना केली जाते. त्याच्यापुढे अनंताच्या दोरकाची स्थापना केली जाते. या स्थापन केलेल्या कलशामधील पाण्यास यमुनेचे प्रतीक समजण्यात येते. कलश तांबे अथवा चांदीसारख्या धातूचा असावा, मृत्तिकाघट नाही. अनंताचा धागा विष्णूचे प्रतीक मानले जाते. कलशाला वस्त्राने वेष्टित केले जाते. नंतर यमुना, शेष यांची पूजा केली जाते, त्यानंतर अनंतरूपी विष्णूची साग्रसंगीत षोडशोपचारे पूजा केली जाते. अनंताची पूजा करताना १४ प्रकारची फुले,फळे धान्ये, नैवेद्य असे सर्व १४ संख्येने केले जाते. अनंताच्या धाग्याला अनंताचे फूल वाहिले जाते. हे व्रत किमान १४ वर्षे करावे असे सांगतात. परंतु काही लोक जन्मभर या व्रताचे पालन करतात. पूजाविधी झाल्यानंतर भोपळ्यावर घारगे आणि वडे यांचा नैवेद्य दाखविला जातो. त्यानंतर या धाग्याला १४ गाठी बांधण्यात येतात आणि हा धागा स्त्रियांच्या डाव्या हातात तर पुरुषांच्या उजव्या हातात बांधला जातो. जर धागा हातात धारण करण्यास काही अडचण असेल तर हा धागा डबीमध्ये देवघरात ठेवला जातो आणि त्याची रोज पूजा केली जाते. नवीन वर्षी नव्या धाग्याची पूजा करून त्याची प्रतिष्ठापना केल्यानंतर जुना  धागा विसर्जन केला जातो.

           अशा प्रकारे हे व्रत किमान १४ वर्षे केल्यानंतर १४ दाम्पत्यांना भोजन तसेच १४ अनारसे, लाडू, पेढे असे दान देऊन व्रताचे उद्यापन करतात. यातील १४ या आकड्याचा संबंध जगत्पालक विष्णूनिर्मित १४ लोकांशी आहे. म्हणजेच सप्तस्वर्ग भू, भूवा ,स्व,महा, जनः ,तप :, ब्रह्म: आणि सप्तपाताल  म्हणजेच अतल, वितल, सुतल, रसातल, तलातल, महातल, पाताल  या चौदा लोकांचे निदर्शक आहेत. कोणत्याही लोकांमध्ये या व्रताची पुण्याई तुमच्या गाठीशी असते हेच यातून सुचविले जाते.

             या अनंताच्या धाग्याला  चौदा गाठी बांधण्यात येतात.या चौदा गाठीचा संबंध मानवी देहात असणाऱ्या चौदा ग्रंथींशी आहे. मानवी देहातील चौदा ग्रंथीचे प्रतीक म्हणून या चौदा गाठी बांधल्या जातात. यातील प्रत्येक ग्रंथीची विशिष्ट देवता असून त्या देवतेचे या गाठीवर आवाहन केले जाते. त्यानंतर खालील मंत्र म्हणून अनंताची उपासना केली जाते –

अनंत संसार महासमुद्रे ।

मग्न समभ्युध्दर वासुदेव। 

अनंत रूपे विनियोज्यस्तवं ।

ह्यनंत सूत्राय नमो नमस्ते ।।

   त्यानंतर मनोभावे प्रार्थना करून हा धागा हातात बांधला जातो.

            संसार रुपी सागरात अनंतरूपी धागा धरून ठेवला की भवसागर तरुन  जातो . अगदी प्रलय काळात देखील स्वतःचे अस्तित्व पिंपळपानावर दर्शविणारा अनंत तुमचे जीवन सुखसमृध्दीने भरून टाकतो. जर वैभव तुम्हाला सोडून गेले असेल तर ते वैभव तुम्हाला पुन्हा मिळवून देतो. असे आचरण्यास सोपे असणारे आणि अनंत काळापर्यंत अनंत फळ देणारे हे व्रत आजही अनेक विष्णू उपासक नित्यनेमाने आचरीत  आहेत. ज्या घरामध्ये हे व्रत चालू आहे  ती घरे अनंताची कृपा आणि सुख समृद्धी  उपभोगीत आहेत.

             याच अनंतव्रताची पुराणकथा पाहूया पुढील भागात !!!

Theme: Overlay by Kaira