अनंत व्रत कथा

            भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक प्रथा ,परंपरा किंवा व्रत यामागे एक कथा जोडलेली दिसून येते. या कथेमध्ये त्या व्रताचे माहात्म्य ,पूजेचा विधी तसेच ते केल्याने होणारे फायदे अथवा न केल्याने होणारे नुकसान असे सर्व मनोरंजक रित्या गुंफलेले असते.  प्रातिनिधिक स्वरूपात असणारी अशी कथा विशिष्ट व्रताचे परिणाम जनमानसात पक्के रुजवते. अनंत व्रत करण्यामागे देखील अशीच एक पौराणिक कथा आहे.

            सुमंत नावाचा एक वशिष्ठ गोत्री ब्राह्मण त्याची पत्नी दीक्षा आणि कन्या सुशीला यांच्यासोबत जीवन व्यतीत करीत होता. अचानक दीक्षाचा मृत्यू होतो त्यामुळे सुमंतु दुसरा विवाह करतो. त्याच्या दुसऱ्या पत्नीचे नाव ‘कर्कशा ‘ असते. ही  कर्कशा नावाप्रमाणेच आक्रस्ताळी ,मत्सरी आणि दुष्ट स्वभावाची असते. ती सुशीलेला सावत्रपणाचा जाच करू लागली. तिचा छळ करू लागली. लवकरच सुशीला उपवर झाली. कौंडिण्य नावाच्या ऋषीने तिला मागणी घातली. सुमंतूने सुशीलेचे लग्न आनंदाने कौंडिण्य ऋषीबरोबर लावून दिले. काही दिवस सुमंतुकडे राहिल्यानंतर कौंडिण्य पत्नीसह आपल्या गावी जाण्यासाठी निघाले.

            अशा वेळी सुशीलेला निरोप देऊन तिची व्यवस्थित पाठवणी करण्याच्या ऐवजी कर्कशा दार लावून बसली. सुशीलेला काही तहानलाडू. भूकलाडू  करून देण्याचे देखील तिने नाकारले. शेवटी सुमंतूने घरात असणारे थोडे गव्हाचे पीठ आपल्या कन्येसोबत देऊन भरल्या मनाने त्यांची पाठवणी केली.

          मार्गक्रमण करीत असताना संध्याकाळ होऊ लागली. कौंडिण्याने रथ थांबविला आणि स्नान संध्या करण्यासाठी तो नदीकाठी गेला. सुशीला खाण्यासाठी फळे,मुळे  शोधण्यासाठी शोधण्यासाठी जंगलात शिरली. तिथे तिला काही स्त्रिया कलश मांडून पूजा करताना दिसल्या. तिने त्यांना विचारले ,”तुम्ही कसली पूजा करीत आहात ?या पूजेचा विधी मला सांगाल का? ही पूजा केल्याने मला काय फळ प्राप्त होईल?” तिचे असे सर्व प्रश्न ऐकून त्या स्त्रियांनी तिला अनंत व्रताची सर्व माहिती सांगितली. तसेच या व्रतामुळे सुख, समृद्धी, गतवैभव प्राप्त होते असेही सांगितले. हे व्रत एकदा स्वीकारले की घराण्यात परंपरेने चालू ठेवावे, त्यात खंड पडू देऊ नये असेही सांगितले .पूजेचा विधी समजावून सांगितलं. एवढेच नव्हे तर आपल्याकडील अनंताचा धागा पूजेसाठी देऊन तिला आपल्यासोबत पूजेसाठी बसविले.

         सुशीलेने त्या स्त्रियांसोबत अनंताची मनोभावे पूजा केली. आपल्या गावी गेल्यानंतर दिवसेंदिवस त्यांची समृद्धी वाढू लागली. संपन्नता त्यांच्या घरी पाणी भरू लागली. सुशीलेचे व्रत आचरण नित्यनेमाने चालूच होते. अशातच कौंडिण्याला संपत्तीचा गर्व होऊ लागला. हे सर्व वैभव आपल्यामुळेच आहे असा त्याचा समज झाला. त्याला आपल्या तपोसामर्थ्याचा तसेच ज्ञानाचा गर्व झाला. त्या मस्तीमध्ये त्याने अनंताच्या दोरकाचा अपमान  करून तो दोरक अग्निमध्ये भिरकावून दिला.

         अनंताचा कोप झाला. त्यांचे दिवस पालटले. कौंडिण्यचे घर अग्निमध्ये भस्मसात झाले,सर्व संपत्तीचा ऱ्हास झाला. सुशीला खूप दुःखी झाली. प्रत्यक्ष अनंत नारायण भेटल्याशिवाय अन्नपाणी सेवन करणार नाही असा तिने पण केला. सुशीला आणि कौंडिण्य अनंत,अनंत असा धावा करीत रानावनातून भटकू लागले. कौंडिण्याला आपल्या वागणुकीचा पश्चात्ताप झाला. त्याचे गर्वहरण झाले. त्याचे डोळे उघडले.

          अनंताला त्याची दया आली. त्याने वृद्ध ब्राह्मणाच्या सावरूपात सुशीला आणि कौंडिण्याला दर्शन दिले. मीच तो अनंत म्हणून त्याने त्यांची खात्री पटविली. त्या दोघांचे सांत्वन करून तुमचे गेलेले वैभव परत मिळेल असा वर दिला. पुन्हा कधीही तुम्हाला दारिद्र्य येणार नाही असा आशीर्वाद दिला आणि घरी जाऊन अनंताचे व्रत परत सुरु करण्यास सांगितले. हे व्रत केल्यास या जन्मात तुला सर्व सुखे प्राप्त तर होतीलच परंतु मृत्यूनंतरदेखील तुला पुनर्वसू नक्षत्रात चिरकाल निवास मिळेल असेही सांगितले.

           हे सर्व ऐकून सुशीला आणि कौंडिण्य समाधानाने घरी परतली व दोघांनी मिळून अनंताचे व्रत केले.त्यानंतर त्यांना आयुष्यभर कशाचीही ददात पडली नाही. सर्व आयुष्य त्यांनी वैभवात आणि सुख समृद्धीत व्यतीत केले. अनंत वैभव त्यांना प्राप्त झाले इहलोकी तसेच परलोकीही या व्रताचे पुण्य त्यांना लाभले.

            आजच्या काळाचा विचार केला तर या कथेत बऱ्याच विसंगत, अतर्क्य गोष्टी असल्याचे जाणवते. परंतु मनुष्याने ठेवलेली गाढ श्रद्धा त्याला सर्व अडचणींमधून सुखरूप बाहेर काढते. याच श्रद्धेला पूर्वसुरींनी पुराणकथेचे मनोरंजक रूप दिले आणि जनमानसामध्ये अशा कथांचे स्थान अढळ बनविले.

Theme: Overlay by Kaira