बहुरूपी

बहुरूपी म्हणजे लोकांच्या मनोरंजनासाठी निरनिराळी रूपे धारण करणारी व्यक्ती. ही एक भटकी भिक्षेकरी जमात असून ही महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा ,पूर्व विदर्भ अशा वेगवेगळ्या ठिकाणी आढळते . महाराष्ट्रामध्ये महार, मुसलमान, डवरी, मराठा इत्यादी बहुरुप्याचे पोट प्रकार आढळून येतात. बहुरुप्याना रायंदर( राईंदर )असे देखील म्हणतात. पूर्व विदर्भात यांना’ भिंगी’ या नावाने संबोधले जाते . बोहवीर ,भोरपी रायअनंत हीदेखील बहुरूप्यांची अन्य नावे आहेत . लोकांचे मनोरंजन करण्यासाठी यांना ठराविक क्षेत्रे नेमून दिलेली असतात. या क्षेत्रांमध्ये सामान्य लोकांसाठी निरनिराळी सोंगे घेऊन त्याचबरोबर काही संवाद ,काही गाणी म्हणून बहुरूपी सामान्य जनांचे मनोरंजन करतात. या मनोरंजन कार्यक्रमानंतर जमा झालेले लोक त्यांना पैसा स्वरूपात बिदागी देतात त्याला’ उकळपट्टी ‘असे विशिष्ट नाव आहे. बहु म्हणजे’ अनेक’ तर रूप म्हणजे ‘ठराविक भूमिकेत दृश्य स्वरुप ‘ म्हणजेच जेव्हा एखादी व्यक्ती अनेक रूपे बदलत आपल्या समोर दृश्य स्वरूपात येते तेव्हा ती बहुरूपी . सर्वसामान्य लोकांना बहुरुपी म्हटले की शिवाजी महाराजांचा काळ आठवतो त्यांचा बहुरूपी बहिर्जी नाईक हा एक उत्तम बहुरूपी तर होताच पण तो एक कुशाग्र हेर देखील होता. श्री.रामदास स्वामींच्या एका भारूडात ,

खेळतो एकटा बहुरूपी रे ।

पाहता अत्यंत साक्षेपी रे।।

सोंगे धरिता नानापरी रे।

बहुतांची कलाकुसरी रे।।

असे परमेश्वराचे वर्णन केलेले आहे. श्री विष्णूंनी दहा अवतार घेतले म्हणून त्यांना आदि बहुरूपी मानले जाते . ज्ञानेश्वरी मध्ये देखील बहुरूप्यांचा उल्लेख आढळतो.

लाघवी हरी मेखळे । लोकु जैसा ।।

        (अध्याय १५ ओवी २४२)
येथे लाघवी म्हणजे बहुरूपी, हरि म्हणजे हरण करतो, मेखळे म्हणजे सोंग घेऊन. अर्थातच बहुरूपी नाना रूपे घेऊन लोकांची दुःखे हरण करतो( करमणूक करतो). श्रीपती भट्टाच्या’ज्योतिष रत्नमाला’ या प्रसिद्ध ग्रंथात’ बोहपीरू’ या नावाने बहुरूप्यांचा उल्लेख आहे .कौटिलीय अर्थशास्त्रात राज्याला मानवी शरीराची उपमा देऊन राजाला शरीराचा आत्मा, प्रधान मंत्री-परिषदेला सेनापती असे संबोधले आहे. गुप्तचर हे राज्यातील कान व डोळे असे कौटिल्याने सांगितले आहे. हे डोळे व कान जेवढे जागरूक आणि तीक्ष्ण तेवढे राज्य सुरक्षित असे त्यांचे सांगणे होते. महाभारत काळापासून आजपर्यंत राज्यव्यवहाराबाबत जे काही सिद्धांत मांडले गेलेले आहेत त्यात गुप्तचरांचे महत्त्व वादातीत आहे.भारतामध्ये बहुरूपी वेगवेगळ्या राज्यांमध्ये आढळून येतात.पश्चिम बंगाल ,गुजरात ,मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांमध्ये हे बहुरुपी विशेषत्वाने आढळतात. गुजरात ,राजस्थान कडील बहुरूपी उंटांचा व्यवसाय देखील करतात.मराठा बहुरुप्याना’ घडशी रायरंद’असे देखील म्हणतात . मुसलमान बहुरूपी पूर्वीचे सोमवंशी व नंतर मुसलमानी राज्यात धर्मांतर झालेले आहेत असे सांगितले जाते.हे बहुरूपी मोहरमच्या वेळेस सोंग घेतात. आजकाल बऱ्याच बहुरूप्यानी बौद्ध धर्म स्वीकारला आहे. अस्वल, रेडा, यमराज, जटाधारी साधू ,तपस्वी, पोलीस ,व्यापारी, जराजर्जर म्हातारा अशी अनेक सोंगे घेण्यामध्ये बहुरूपी तरबेज असतात. ही रूपे तंतोतंत वठविण्यासाठी ते अक्षरशः त्या भूमिकेत शिरतात . असामान्य बुद्धिमत्ता असणारे हे बहुरूपी गायन, नर्तन, शीघ्र कवित्व तसेच नाट्य सादरीकरण लीलया सादर करतात. कोणतेही सादरीकरण करताना ‘तुंबडी ‘हे विशिष्ट वाद्य ते आवर्जून वापरतात .या तुंबडीला एक वाळलेला कोहळा असतो आणि त्याला वरून एक काठी लावून त्याला तार जोडून वर घुंगरू बांधलेले असते. कोणतेही सोंग सादर करताना बहुरूपी पायात घुंगरू बांधताततच. प्राणी, पक्षी, पुरुष पात्रांचे सादरीकरण तर हे बहुरूपी करतातच, त्याच सोबत श्यामशिंगी ,क्षमादायी,हाल्या, बाळांतीण , नंदी, वाघ, शंकर-पार्वती, तंट्या भिल्ल अशी सोंगे देखील हे बहुरूपी बेमालूम वठवितात. त्यांनी सादरीकरणाच्या वेळी म्हटलेली,

तुंबडी भरत देना। बाजीराव नाना।

घरांत नाही दाणा। हवालदार माना।

शशावानी ताना। नाव ठेवा नाना |

घवन की माल बोलो। परभणी को जाना।

राजा का घोडा बोले। बैठन को देना |

अशा बडबडगीते प्रकारात मोडणारी गाणी प्रसिद्ध आहेत. या गाण्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे लालित्य नसते. ‘लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला ‘हे देखील असेच एक बहुरुप्याचे प्रसिद्ध गीत आहे. सुरुवातीला बायका मंडळीना लग्नाचे आवतण जाते .या भगिनी मंडळाची लाडाई,गोडाई,चिपटी,आंधळी,मोडकी अशा विशेषणांनी चेष्टा करून झाली की मग लग्नाच्या जेवणाचा नामी बेत जाहीर होतो.

जेवायला केली चिखलाची कढी ।दगडाचे वडी।

मस्करी लोणचं ।।गाढवाचं भज ।

तरसाच्या पोळ्या। लांडग्याची खीर।

जेवायला चला, तुम्ही जेवायला चला ।

    एक एक पदार्थ ऐकता ऐकता श्रोतृवर्ग चे हसून हसून मुरकुंडी वळते .आणि काही क्षण सर्व दुःख,चिंता, काळज्या विसरून समोरचा माणूस या नाट्याला मनापासून दाद देतो. लोकांचे मनोरंजन करणाऱ्या बहुरूपी समाजाने करोना काळात करोना विषयी लोकांचे प्रबोधन देखील केले. असा हा भटका भिक्षेकरी समाज वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळे घेऊन वावरतो. यांच्या वेगवेगळ्या प्रांतातील समाजामध्ये आपापसात रोटी-बेटी व्यवहार होत नाही. जातपंचायत मध्ये स्त्रियांना बसता येत पण चर्चेत भाग घेता येत नाही. स्त्रियांना घटस्फोट मिळत नाही तसेच पुनर्विवाहास देखील बंदी आहे. पाचवीची पुजा सात दगड मांडून केले जाते. यांच्या विशिष्ट भाषेत’ पारसिक ‘भाषा असे म्हटले जाते. ही मराठी, हिंदी, उर्दू मिश्रित अशी पारसिक भाषा आहे. पाणी- निरमा,दारू- चिंगई ,मटन -नमाडी हे काही उदाहरणादाखल त्या भाषेतील शब्द . ‘मुर्दाडसिंगी’ नावाचा दगड वापरून केलेली रंगरंगोटी असो किंवा वारुळाची माती, चिंचोके ,कागदाचे रद्दी वापरून बनवलेला मुखवटा असो ,खरा बहुरूपी कधीच आपल्या समोर येत नाही. स्वतःचे दुःख स्वतःच्या अंतःकरणात लपवून ठेवून तो इतर लोकांची करमणूक करतच राहतो… करतच राहतो. याच बहुरुप्याच्या काही पारंपारिक गोष्टी छोट्या दोस्तांसाठी पुढच्या भागात—
Theme: Overlay by Kaira