भारतीय सण

    आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे. नाना जाती, धर्म, परंपरा, संस्कृती एकमेकांच्या हातात हात घालून राहताना दिसतात. तसेच भारत हा एक कृषिप्रधान देशदेखील आहे. निरनिराळ्या प्रांतांमध्ये निरनिराळी पिके जरी पिकत असली तरीही या कृषिकर्माचे महत्त्वाचे टप्पे सर्वांकडे एकदमच येतात. ऋतूंच्या बाबतीत देखील आपला देश समृद्ध आहे. भारतामध्ये सहा निरनिराळे ऋतू आहेत.

    महाकवी कालिदासाने ‘उत्सवप्रियः खलु मनुष्य:’ असे म्हणले आहे. म्हणजेच मनुष्याला उत्सव, सण साजरे करणे अतिशय प्रिय आहे. आनंदाचा एक सहजसुंदर क्षण सण देऊन जातो. प्रत्येक नवीन सण नवी आशा नवा उत्साह देऊन जातो. उत्सवप्रिय भारतामधील सणांचा विचार केला तर कृषीकर्मातील महत्त्वाचे टप्पे आणि ऋतुबदल अशा दोन अंगांनी ते जाताना दिसतात. बरेचसे सण चंद्र पूर्ण सोळा कलांनी तेजाळत असताना, मनाच्या उत्फुल्ल अवस्थेत ‘पौर्णिमेला’ साजरे होतात तर काही संक्रांतीसारखे सण सौरदिनमानावर अवलंबून असतात.

    कृषिसंस्कृतीमधील समृद्धीचा आनंद साजरा करणे आणि लोकजीवनाची ऋतुचक्राशी सांगड घालताना त्या त्या ऋतूशी संबंधित दिनचर्येत बदल करणे, संबंधित ऋतूमध्ये मिळणाऱ्या गोष्टींचा आहारात मुबलक वापर करणे या सर्व गोष्टी सणाच्या निमित्ताने आवर्जून केल्या जातात. प्राचीन भारतीय संस्कृतीचा अध्यात्म हा पाया असून सणांमुळे जीवनाला अध्यात्माची, भक्तिभावाची जोड मिळते. सणांच्या निमित्ताने जीवनात एखाद्या विशिष्ट देवतेचे अधिष्ठान निर्माण होते.

    क्षण या संस्कृत शब्दावरून सण या शब्दाची उत्पत्ती झाली आहे. क्षण -> छण -> सण. यादवांचा मुत्सद्दी कारभारी ‘हेमाद्री’ (हेमाडपंत) याने ‘चतुर्वर्गचिंतामणी’ या ग्रंथात वर्षातील ३६५ दिवस निरनिराळे सण  कसे साजरे करावेत याची सविस्तर माहिती दिली आहे. त्यातील मुख्य सण सध्या भारतात साजरे होताना आढळतात. प्रांतानुसार त्या सणांची नावे बदलली तरी तो सण साजरा करण्यामागील ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक पार्श्वभूमीमध्ये समान धागे दिसून येतात.

    भारतीय संस्कृतीमधील परंपरांच्या विविधतेत एकता राखणे, सणांच्या निमित्ताने प्रथा परंपरांचे ज्ञान पुढील पिढीस करून देणे, समाजामधील घटकांची भावनिक, सामाजिक एकात्मता साधने अशी अनेक उद्दिष्ट्ये सण साजरे करण्याच्या निमित्ताने पूर्ण होतात.

    काळानुसार सण साजरे करण्याच्या पद्धतींमध्ये बदल होत आहेत. आधुनिकतेची कास धरताना परंपरांचे जतन होणे आवश्यक आहे. सण उत्सव साजरे करताना त्यामागील नेमका उद्देश लक्षात ठेऊन त्याचा गाभा शास्त्रशुद्ध पद्धतीने जपला पाहिजे. सण उत्सव साजरे करताना निसर्गाचे, पर्यावरणाचे रक्षण झालेच पाहिजे. सण उत्सव साजरे करताना प्रत्येक व्यक्तीला निखळ आनंद, तणावमुक्तीचा अनुभव यावा.

    प्रत्येक सण साजरा करण्यामागे जो काही एक विशिष्ट उद्देश असतो तो त्या सणाच्या माध्यमातून समाजापर्यंत निकोपपणे पोहोचवणे हीच सणांची इतिकर्तव्यता!

    विविध भारतीय सणांविषयी, त्यांच्या इतिहासाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ‘भारतीय सण’ या विभागातील लेख नक्की वाचा.

One thought on “भारतीय सण

Comments are closed.

Theme: Overlay by Kaira