भित्रा चिंकू

Sasaa

   सकाळ झाली. सुंदर बनात मस्त ऊन पसरलं आणि झाडांच्या मधून कवडशांचे गोल नाच करू लागले. “चिंकू अरे उठ बाळा, तुला आज खेळायला जायचे नाही का?” चिंकू सशाची आई त्याला उठवत होती. आळोखे पिळोखे देत चिंकू उठला. जीभेने सर्व अंग स्वच्छ केले. आईने बिळात आणून ठेवलेल्या कोवळ्या शेंगांवर ताव मारला आणि चिंकोबाची स्वारी तयार झाली. “आई जातो गं मी खेळायला. आज त्या मोठ्या गवताच्या मैदानावर आम्हा मित्रांची अंगत पंगत आहे. त्यामुळे मी जेवूनच येईन.” खिशात गाजर कोंबून चिंकू उड्या मारत निघाला.

   वर पाहिलं तर मिंटी खारुताई शेंगा खात बसली होती. “ए मिंटी, येतेस का खेळायला? आज मैदानात अंगत पंगत पण आहे.” चिंकूने तिला विचारले. तशी ती सुळकन झाडावरून उतरली आणि चिंकूबरोबर निघाली. दोघे मस्त चालले होते. तोच किमु वानर दिसले. मैदानावरील अंगतपंगतचा बेत ऐकून किमु पण त्यांच्यासोबत त्याच्याजवळील केळी, मक्याची कणसे घेऊन निघाले. आता त्या तिघांना भेटले बिरू अस्वल. एवढी सर्व गॅंग एकत्र पाहून त्याला काहीतरी विशेष असल्याचा सुगावा लागलाच. अंगत पंगत म्हणल्यावर तो पण त्याच्याकडील मधाचे मडके घेऊन यांना सामील झाला.

   एवढ्या सगळ्यांना एकत्र जाताना सुंदर हरिणीने पहिले आणि ती देखील यांच्या मागे लागली. “थांबा थांबा! मला पण तुमच्याबरोबर येऊ द्या.” तिने तिच्यासोबत छान छान फळे आणि मऊ मऊ गवत घेतले. भरपूर खाऊ आणि सर्व मित्रमंडळी एकत्र जमल्याने सगळे आनंदात, दंगा मस्ती करत, हसत खेळत मैदानाकडे चालले. मध्येच एक तळे लागले. तिथे सर्वांचे पाणी पिऊन झाले. एकमेकांच्या अंगावर पाणी उडवून खेळून झाले. आता मात्र सगळ्यांना कडकडून भूक लागली होती. सर्वजण भरभर मैदानाकडे निघाले. मैदानात पोहोचल्यावर छान गोल करून बसले. प्रत्येकाने आपला खाऊ मध्ये ठेवला आणि सर्वजण त्यावर ताव मारू लागले. खाऊ संपला, सगळ्यांची पोटे भरली. मग जरा बैठे खेळ खेळून झाले. लपाछपी सुद्धा झाली. 

   आणि… आणि हे काय! अचानक झाडाची पाने जोरात हलायला लागली, फांद्या डोलू लागल्या, सुं सुं आवाज करत वारा वाहू लागला. आकाश काळे होऊ लागले. ढगांचा गडगडाट सुरु झाला. तसा चिंकू ससा एकदम घाबरला. त्याचं छोटंसं काळीज धडधड करू लागलं. मुटकुळं करून तो झाडाच्या ढोलीत लपायचा प्रयत्न करू लागला. बाकीचे प्राणीदेखील झाडाखाली येऊन थांबले. अचानक एक मोठे पान चिंकूच्या अंगावर पडले आणि तो इतका घाबरला की ढोलीत अर्धवट शिरलेला तसाच बाहेर आला. त्याला वाटले या सर्व वादळात आभाळ फाटले आणि आपल्या अंगावर पडले!

   तसा तो जीव घेऊन पळू लागला. “पळा पळा, आभाळ फाटलं, आत्ता माझ्या अंगावर त्याचा तुकडा पडला!” झालं, चिंकूच्या मागे मिंटी, तिच्या मागे  किमु, बिरू, सुंदर सगळेच सैरावैरा धावत सुटले. त्यांना समजेना या आभाळापासून स्वतःला वाचवावे तरी कसे. कारण कोठेही जाऊन वर पाहिले तर आभाळ आहेच. आता मात्र ते सर्व फारच घाबरले! पळून पळून पळणार तरी किती? परत तोंडाने सर्वांचा आभाळ फाटलं,आभाळ फाटलं असा जप चालूच! सुंदर बन नुसते दणाणून गेले.

   एवढे सांगेल झाले तरी गजू हत्तीला मात्र कशाचाच पत्ता नाही! इतक्यात त्याला सुंदर हरिणी पळताना दिसली. “काय झालं गं?” त्याने विचारलं. “पळ पळ, आभाळ फाटलंय” अस सांगून ती झटक्यात निघून पण गेली. तिच्यामागून बाकीचे सगळेही ओरडत पळताना गजूला दिसले! हुशार गजूला मात्र काही हे पटत नव्हतं, आभाळ कसं पडेल?

   शेवटी त्याने चिंकू सशाला सोंडेने वर उचललं आणि विचारलं, “अरे नक्की काय झालं? तुम्ही का पळताय?” “अरे गजूदादा, काय सांगू, केवढा तरी आभाळाचा तुकडा माझ्या पाठीवर पडला. आभाळ फाटलंय अरे! पळ तू पण!” गजू बारीक डोळे करून चिंकूच्या भित्रेपणाला हसला. त्याला म्हणाला, “खरं की काय? दाखव बरं तो तुकडा मला? मला तर आभाळ फाटलेलेही दिसत नाही मग कुठून पडला तो तुकडा?” तसे गजूने हळूच वर पाहिले आणि काय! खरंच आभाळ कुठेच फाटलेले नव्हते! उलट आता तर मावळतीचे ऊन पण पडले होते!

   चिंकू मनातच आपल्या भित्रेपणाने खजील झाला. पुन्हा कशालाच इतकं घाबरायचं नाही असे त्याने पक्के ठरवले. स्वारी आरामात गजूच्या पाठीवर बसून डुलत डुलत घरी आली आणि रात्री आईच्या कुशीत झोपून गेली. 

   मुलांनो, आभाळ कोसळणे ही मराठीमधील म्हण आणि त्याचा अर्थ तुम्हाला माहित आहे का?

Theme: Overlay by Kaira