भोंडला

   भोंडला, भुलाबाई, हादगा अशा वेगवेगळ्या नावांनी महाराष्ट्रातील विविध भागात एकच परंपरा जतन केलेली दिसून येते. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात हादगा म्हणून ओळखली जाणारी ही परंपरा महाराष्ट्रात भोंडला म्हणून प्रसिद्ध आहे. हीच परंपरा विदर्भामध्ये ‘भुलाबाई’या नावाने ओळखली जाते. भिल्लीणीचे रूप घेऊन शंकराला भुलवणारी ती भुलाबाई आणि अर्थातच शंकर बनतो ‘भुलोजी’. कैलासावर सारीपाट खेळताना शंकर पार्वती कडून हरतात आणि रुसून कैलास सोडून निघून जातात. त्यांना परत आणण्यासाठी पार्वती भिल्लीणीचे रूप वेळेस घेते अशी कथा यामागे सांगितली जाते.

               bhondla

   अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते आणि त्यानंतर संध्याकाळपासून पुढचे सोळा दिवस हा भोंडला महाराष्ट्रात निरनिराळ्या ठिकाणी खेळला जातो. या काळात सूर्य हस्त नक्षत्रातून प्रवास करत असतो तसेच पावसाचा देखील परतीचा प्रवास चालू होतो. आपल्याजवळील सर्वकाही जमिनीला दान देऊन शेवटी शेवटी तर मुक्तहस्ताने उदंड पाऊस उधळत पर्जन्यराज परततात . हादगा (भोंडला) ही हत्ती या मेघाचे प्रतीक असलेल्या चिन्हाभोवती गुंफलेली सांकेतिक पूजा आहे. महाराष्ट्रामध्ये मेघ-पूजनाची परंपरा खूप जुनी आहे. यामध्ये हत्ती हा समृद्धी, वर्ष,नाचे प्रतीक मानला जातो तसेच तो जलतत्वाचे देखील प्रतिनिधित्व करतो. यामधील लक्ष्मी, गौरी ही धरणीचे प्रतीक मानली जाते. पावसामुळे धरती सुजलाम-सुफलाम होते, तिची कुस उजवते . याचकाळात रब्बी हंगामाची पिके तरारून आलेली असतात. हे एक पर्जन्य विधीचे व्रत देखील मानले जाते. ‘हस्तग’ म्हणजे सूर्य, हा सूर्य जेव्हा हस्त नक्षत्रात जातो तो या विधीचा काळ. हस्त नक्षत्रात हत्ती पाण्यात बुडेल इतके पाणी बरसावे अशी समजूत त्यामागे आहे. गुजरात मधील गरब्याचे मुळ भोंडल्या मध्ये आहे असे मानले जाते.

   अंगणात लाकडी पाट मांडून त्यावर हत्तीचे चित्र काढतात. दोन हत्ती सोंडेत हार घेऊन एकमेकांसमोर सोंड उंचावलेल्या स्थितीत असतात. हे चित्र खडूने काढतात किंवा रांगोळीने काढतात. काही ठिकाणी मूर्ती देखील ठेवतात. काही ठिकाणी पाच गोटे घेऊन त्यांची पाना-फुलांनी पूजा केली जाते, तर काही ठिकाणी अगस्त्याच्या (हादग्याच्या) झाडाची फांदी मधोमध रोवून तिच्याभोवती फेर धरला जातो. विदर्भामध्ये शंकर-पार्वती (भुलाबाई- भुलोजी) यांच्या मूर्तीची स्थापना करून त्याभोवती फेर धरून गाणी म्हटली जातात. या दिवसात मिळणाऱ्या फळ, फुल आणि धान्याने हत्तीची पूजा केली जाते. परिसरातील सर्व बायका मुली एकत्र येऊन पाटाभोवती फेर धरून भोंडल्याची पारंपरिक गाणी म्हणतात.

   ज्येष्ठ लोकसंस्कृती अभ्यासक डॉ. प्रभाकर मांडे यांनी आपल्या लोकपरंपरेतील खेळ या पुस्तकात’गाण्यांचे खेळ’ ह्यामध्ये भोंडला, हादगा, भुलाबाई याचा समावेश केला आहे. दुर्गाबाई भागवतांच्या मतानुसार भोंडल्याचे गाणे हा अस्सल लोकगीताचा नमुना आहे. अत्यंत साध्या चाली आणि मौखिक परंपरा! अर्थातच मौखिक परंपरेने चालत आल्यामुळे या गाण्याचे मूळ स्वरूप जरा बदलते. काही चरणे, काही शब्द काळाच्या ओघात लुप्त होताना दिसतात. काही शब्द प्रदेशानुसार बदलतात. मूळ हादग्याची गाणी हिंदुस्थानात परंपरेने रूढ असणार्‍या इतर व्रतांशी आणि गाण्यांशी जोडले जाऊन सरमिसळ देखील झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

   हस्त नक्षत्र आणि या उत्सवाचा अगदी जवळचा संबंध आहे.

हस्त हा दिनयाचा राजा

तयासी नमस्कार माझा

नमस्कारा सरशी आला वारा

आधी पडल्याने मेघधारा

मागून पडलेल्या मुसळधारा !

   हस्त नक्षत्र ची पूजा करून त्याला नमस्कार केल्यावर मुसळधार पाऊस अर्थातच हत्तीचा पाऊस येतो असे मानले जाते. या भोंडल्यांमध्ये गाणे म्हणून झाल्यानंतर सर्वांना प्रसाद वाटतात परंतु त्याला म्हणायचे ‘खिरापत’आणि ही खिरापत काय आहे हे ओळखून दाखवावे लागते मगच वाटली जाते . पहिल्या दिवशी एक खिरापत दुसऱ्याशी दोन खिरापती असा रोज चढता क्रम असतो. कर्नाटकामधील जामखिंडी येथील मुरगोड केंगेरी येथे एक महान शिवयोगी होऊन गेले ‘चिदंबर दीक्षित महागुरू स्वामी गळ’ यांचा तेथे मोठा आश्रम आहे. हे शिवयोगी केवळ आठ वर्षाचे असताना त्यांनी पहिला चमत्कार केला असे सांगितले जाते आणि हा चमत्कार म्हणजे भोंडल्या मधील पाटावर काढलेलेल्या हत्तीच्या चित्राजवळ जाऊन त्यांनी प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हटला आणि तो हत्ती सजीव झाला असे सांगितले जाते.

   काही ठिकाणी हादगा हे व्रत म्हणून देखील केले जाते. हे व्रत नारदांनी गांधारीला सांगितले होते आणि गांधारीने विधिवत पूजा केल्यानंतर सर्व गावात ती वाणे वाटण्यासाठी गेली. अर्थातच कुंतीकडे पण ती गेली. गरिबीत दिवस काढणार्‍या कुंतीकडे वाणाचे सर्व जिन्नस जरा जास्तच घेऊन गेली.परंतु स्वाभिमानी कुंतीने “मी दान देते, घेत नाही” असे बाणेदार उत्तर दिले. चोख उत्तर जरी दिले तरी मनातून मात्र कुंती व्यथित झाली. अर्जुन, भीम यांनी पुढच्या वर्षी तुला ऐरावत आणून देतो असे वचन दिले. अर्जुनाने इंद्राला बाणाद्वारे संदेश पाठवला आणि इंद्राने ऐरावत पाठवला. कुंतीचे मन प्रसन्न झाले . तिने समाधानाने पूजा केली आणि सगळीकडे समृद्धी आली , अशी यामागे एक कथा सांगितली जाते.

वाजे चौघडा रुण झुण, आला ग हादगा पावना

दारी तुळस दवणा , जाई जुई शेवंती सुपारी

हादगा गांधारी पूजिते, सख्यांना बोलाविते

आमच्या नृत्यगीते झंकारते अंगण !!

हे गाणे गांधारीने हे व्रत केल्याचे पुरावाच देते.

   भोंडल्याची गाणी खूप वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यांचा बराचसा क्रम देखील ठरलेला आहे. मधल्या गाण्यांचा क्रम बदलला तरी ‘ऐलमा पैलमा’ हे सुरुवातीचे गाणे आणि ‘आड बाई आडोणी’ हे शेवटचे गाणे हमखास असते ,यात बदल नसतो . रुसून बसलेली सासुरवाशीण माहेरचे गोडवे गाताना सासरला द्वाड म्हणते. परंतु या सासरचे मोठेपण कायम सोन्या चांदीच्या वस्तू तोलते. हा रुसवा देखील पती राजांच्या प्रेमाने जातो. अर्थातच कोणत्याही भौतिक सुखापेक्षा पतीचे प्रेम त्याच्या राणीला महत्त्वाचे वाटते. कारल्याच्या वेलीच्या गाण्यातून आज्ञाधारक सोशिक सून दिसते, तर वेड्याच्या गाण्यात वेड्याचे चाळे दिसतात . श्रीकृष्णाच्या बाल रुपाची मोहिनी पडली नाही अशी स्त्री विरळाच. बाळकृष्णाच्या या बालकृष्णाचे विचित्र जगावेगळे हट्ट आणि ते कसे पुरवायचे या विवंचनेत असणारी यशोदा माता यांचे मनोहारी दर्शन घडते . शिवाजी आमुचा राजा या गाण्याने हिंदुत्वा बद्दलचा अभिमान जागृत होतो .परंतु एकंदरीत ही हादग्याची परंपरेने चालत आलेली गाणी वरवर साधी सोपी वाटली तरी दुर्बोध आहेत. अभ्यासक त्या गाण्यांचा आपापल्या परीने अर्थ लावण्याचा आजही प्रयत्न करत आहेत .अशी ही संपूर्णतया महिलाप्रधान असणारी परंपरा, नवरात्रात म्हणजेच शक्तीच्या महाउत्सवात आजही खूप ठिकाणी पाळली जाते. आणि भोंडला म्हणजे फक्त फेर धरून गोल फिरणे नव्हे तर त्यातून स्त्री मनाचा आविष्कार प्रगट होतो.

   पूर्वीच्या काळातील सासुरवाशीण स्त्रीचे जीवन कष्टाने भरलेले तसेच यातनामय होते.’तोंड दाबून बुक्क्यांचा मार‘ अशी परिस्थिती. जे आहे ते निमूटपणे सोसताना भावनांचा कोंडमारा होत असे . या सर्वातून थोडे तरी बाजूला होऊन रोजच्या जीवनातील सुखदुःखे वाटून घेण्यासाठी महिलांनी नवीन पाऊल रोवले, आणि स्वतःचे निराळे असे काव्य विश्व निर्माण केले. यामध्ये सर्वेसर्वा महिलाच आहेत. काव्यरचना करणे, ती संगीतबद्ध करणे, सादर करणे सर्व काही महिलांची निर्मिती .या काव्या मधून महिलांची दुःखे , असहाय्यता, कुचंबणा, निर्णय स्वातंत्र्याचा अभाव या सर्व गोष्टी समोर येतात. विशेष म्हणजे या त्रासाचे सार्वत्रिकीकरण होते त्यामुळे त्यातील व्यक्तीगत भावना ही नाहीशी तर होते पण त्याचबरोबर मनातील किंतु किल्मिष दूर होऊन मन मोकळे होऊन स्वच्छ निर्झराप्रमाणे खळखळू लागते. भावनिक कोंडमारा झाल्याने उद्भवणाऱ्या मानसिक विकृती निर्माण होत नाहीत . पूर्वीच्या काळी जात्य तील ओव्यांमधून हाच भाव प्रकट झाला आहे.

   काळ बदलला, स्त्री रूपे बदलली , वरकरणी समाज बदलला असे थोडे वाटते ,परंतु तळाशी जाऊन पाहिले तर स्त्री मनाची कुचंबणा ,मानसिक घालमेल ,भावनांचा कोंडमारा आजही आहे . कारणं वेगळी असतील ,गरज आहे ती अशा परंपरा जपून ठेवण्याची आणि या माध्यमातून नवी ऊर्जा घेऊन पुन्हा भरारी घेण्याची!!

Theme: Overlay by Kaira