ब्रह्मचारिणी

   ब्रह्मचारिणी हे नवदुर्गांमधील दुर्गेचे दुसरे रूप. ब्रह्म म्हणजे तपस्या आणि आचरिणी अर्थात आचरण करणारी. तपस्येचे, ब्रम्हाचे आचरण करणारी ती ब्रह्मचारिणी. तपश्चारिणी, उमा ही देखील हिचीच नावे. 

   तेजस्वी गौरवर्ण असणारी ही दुर्गा शांत स्वरूपाची आणि भव्य आहे. शुभ्र वस्त्र परिधान केलेली, उजव्या हातात जपमाला डाव्या हातात कमंडलू असे तिचे स्वरूप आहे. तप करीत असल्यामुळे तिची वृत्ती स्थिर आहे. त्यामुळे हिचे कोणतेही विशिष्ट वाहन नाही. स्वरूप शांत असल्यामुळे हातात कोणतेही अस्त्र वा शस्त्र नाही. ब्रम्ह ध्यान करीत असल्यामुळे जपमाला आणि कमंडलू हातात आहे. वेदस्तत्वं तपो ब्रम्ह म्हणजेच वेद, तत्व, तप यांचे आचरण करणारी आहे.

   ब्रह्मचारिणी देवीची उपासना केली असता स्वाधिष्ठान चक्र जागृत होते. या चक्रात मन स्थिर केले असता ब्रह्मचारिणीची कृपा प्राप्त होते.

   हिमालय कन्या म्हणून जन्म घेतल्यानंतर शंकराची पती म्हणून प्राप्ती होण्यासाठी हिने कठोर तपश्चर्या केली. ऊन-वारा-पाऊस कशाचीही पर्वा न करता अनेक वर्षे केवळ फळ आणि मुळे खाऊन उपासना केली. नंतर नंतर तर बेलाची जमिनीवर पडलेली पाने खाऊन उपजीविका केली. शेवटी तर पाने देखील खाणे सोडले म्हणून तिचे नाव झाले ‘अपर्णा’. 

   ब्रह्मचारिणी देवीच्या शांत मुखावर तपाचे तेज विलसत असते. संसारापासून विरक्त अशी तपस्येची मूर्तिमंत पुतळी म्हणजे ब्रह्मचारिणी! जीवनामध्ये आपले ध्येय साध्य करण्यासाठी नियुक्त आचरण करणे आवश्यक असते. ब्रह्मचारिणीच्या उपासनेमुळे सर्व नीतिनियम पालन करण्याची मनोधारणा दृढ होते तसेच ब्रह्मचर्याचे सामर्थ्य प्राप्त होते. आपल्यामधील ब्रह्मस्वरूप ज्योतीची जाणीव होते. स्वभावामध्ये शूरपणा, निडरपणा, पराक्रमी वृत्ती वाढीस लागतात. 

   ब्रह्मचारिणी देवीला पांढरे पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवले जातात. विशेष करून दूध व दुधाचे पदार्थ. तिला चमेली, कमळ ही पुष्पे प्रिय आहेत. या फुलांच्या माला तिला श्रद्धेने अर्पण केल्या जातात. शारदीय नवरात्राच्या दुसर्‍या दिवशी ब्रह्मचारिणीची उपासना करतात. त्या दिवशी कुमारी भोजन करण्याची प्रथा आहे. ज्या कुमारींच्या लग्न ठरले आहे परंतु अजून झाले नाही अशा कुमारिकांना या दिवशी बोलावून त्यांची पूजा करून भोजन घातले जाते.

दधाना करपदमाभ्याअक्षमाला कमंडलू |

देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुमत्तमा ।।

या मंत्राने देवीची उपासना केली असता आपल्याला सदाचार, वैराग्य, संयम यांची प्राप्ती होते.

   भौतिक सुखांच्या मागे धावून धावून दमलेल्या साधकास प्रज्ञादायिनी, मोक्षदायिनी असणारी अशी ही ब्रह्मचारिणी!! 

Theme: Overlay by Kaira