चैत्रगौरी

Image of Chaitragouri

               चैत्र शुद्ध तृतीया, ‘गौरीतीज’. संपूर्ण महाराष्ट्रात विशेषत्वाने ब्राह्मण समाजात यादिवशी चैत्रगौरीची स्थापना केली जाते. चैत्र शुद्ध तृतीया ते वैशाख शुद्ध तृतीया (अक्षयतृतीया) अशी महिनाभर ही चैत्रगौर माहेरी येते असे  समजून तिची पूजा केली जाते. याच गौरीला आंध्रप्रदेशात सौभाग्यगौरी म्हणतात. वसंतगौरी देखील हिचेच नाव. राजस्थानमध्येदेखील गणगौर या नावाने याच देवीचा उत्सव साजरा करतात. भारतातील काही भागांत चैत्र शुद्ध तृतीयेस ‘आंदोलन तृतीया’ असेही म्हणले जाते.

              स्त्री शक्तीचे मातृस्वरूपात पूजन करण्याची भारताची प्राचीन परंपरा आहे. या काळात पार्वती शंकरासह माहेरपणास येते. सृष्टिमातेची ऋतूनुसार बदलणारी रूपे, ऋतूबदलानुसार खाद्यसंस्कृतीत होणारा बदल यांचे प्रतिबिंब कायमच भारतीय सण , उत्सवांमधून दिसून येते. सृष्टिमातेला पार्वती  स्वरूपात लेक म्हणून घरी आणणे, तिचे कोडकौतुक करणे, त्यानिमित्ताने ऋतूबदलातील खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करणे या सर्व गोष्टींचा नीट विचार केला तर या उत्सवामागील वैचारिक पार्श्वभूमी आणि भारतीय मनाची निसर्गाप्रती असणारी कृतज्ञता दिसून येते.

              यादिवशी घरामध्ये असणारी गौरीची मूर्ती (लाकडी, पितळी, तांब्याची किंवा अन्नपूर्णा) स्वच्छ करून तिची प्रतिष्ठापना केली जाते. या मूर्तीमध्ये झोपाळ्यावर शंकर पार्वती स्थापना केलेली असते. वसंतऋतूच्या प्रारंभाला जेव्हा थोडा उन्हाळा चालू  होतो तेव्हा झोपाळ्यावर बसून आलेली मंद हवेची झुळूक मन प्रसन्न करते. माहेरी आलेली लेक प्रसन्नचित्त असावी म्हणून ही झोपाळ्यावरील पार्वती. पाळण्याचा वर-खाली होणारा झोका पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये दुवा सांधतो, पृथ्वीचा संदेश सूर्याला पोहाचवतो अशी कल्पना केली जाते. ही गौर माहेरी आल्यावर नाना तऱ्हेने तिचे लाड केले जातात, कोडकौतुक पुरवले जाते. या चैत्रगौर उत्सवाचे महत्त्वाचे आकर्षण असते ते या निमित्ताने घराघरात होणारे हळदी कुंकू.

                हळदी कुंकू या  प्रथेला एक विशिष्ट अर्थ आहे. जी गोष्ट आपण दान करतो ती आपल्याला भरभरून मिळते अशी समजूत यामागे आहे. पूर्वी स्त्रियांचे जीवन सौभाग्याशी (पतीशी) जास्त निगडित होते. तिच्या सवाष्णपणाला समाजात मान होता. हे सौभाग्य वृद्धिंगत व्हावे म्हणून प्रत्येक घरी हळदी कुंकू कार्यक्रम होतो. ओळखीच्या सवाष्णींना घरी बोलावून त्यांचा आदरसत्कार केला जातो. ऋतूशी निगडित असणारे काही खाद्यपदार्थ देवी स्वरूप समजून त्यांना दिले जातात.

                हे गौरीचे हळदी कुंकू शक्यतो चैत्र कृष्ण तृतीयेनंतर (दुसरी तीज) केले जाते. यादिवशी गौरीची मूर्ती नटवून, सजवून पानाफुलांनी शृंंगारलेल्या झोपाळ्यावर बसवतात. तिच्याभोवती निरनिराळे फराळाचे पदार्थ आणि इतर सजावटीचे साहित्य वापरून आरास केली जाते. आलेल्या सवाष्णीला हळदी कुंकू लावून हाताला चंदनउटी व त्यावर नक्षी रेखली जाते. त्यांना प्रसाद म्हणून फक्त याच दिवसात केली जाणारी कैरीची डाळ तसेच पन्हे दिले जाते. त्याचबरोबर या ऋतूमध्ये मुबलकपणे मिळणाऱ्या कलिंगडाच्या फोडीसुद्धा वाटल्या जातात. प्रसाद म्हणून खिरापत, बत्तासे देतात. हे सर्व झाल्यानंतर प्रत्येक सवाष्णींची भिजवलेल्या हरभऱ्याने ओटी भरली जाते. तसेच जाताना तिला सोनचाफा, मोगरा अशासारखी सुगंधी फुले दिली जातात.

             गौरीची आरती करताना आरतीनंतर काही ठिकाणी गौरीचे माहेर हे विशिष्ट गाणे म्हणले जाते. या गाण्यातील उपमा, रूपके पाहिली म्हणजे पार्वतीला सृष्टिदेवता समजून तिची चैत्रगौर स्वरूपात पूजा केली जाते हे लक्षात येते.

              देवीच्या गाभाऱ्याला इंद्रधनुचे तोरण, रात्रीचे काजळ, वेणीत माळलेल्या चांदण्या, चंद्रकोरीची कांकणे, दवबिंदूची पैंजणे, गोऱ्या तळपायाला चैत्रपालवीची मेंदी, आकाशगंगेची बिंदी अशा सर्व साज शृंगाराने सृष्टिमाता सजली आहे आणि चैत्रगौर बनून माहेरी आली आहे इतके बहारदार वर्णन या गीतात आले आहे. इतके सर्व कोडकौतुक होत असताना अखेर अक्षयतृतीया येते. चैत्रगौर पुन्हा सासरी जायला निघते. तिला खीर कानोला, दहीभात, आंब्याचा रस असा नैवेद्य दाखवला जातो.

             कौमार्यअवस्थेत माहेरी आलेली वसंतगौरी अक्षयतृतीयेला यौवनावस्थेत सासरी जाते. सृष्टीच्या बदलत्या स्वरूपाचे हे प्रतीक मानतात. कारण यानंतरच सृष्टी बहरास येते, पाने-फुले-फळांनी डवरते.

              हे चैत्रगौरीचे हळदी कुंकू पेशव्यांच्या वाड्यातदेखील साजरे होत असल्याचे सांगतात. अशी ही विश्वातील कन्या रूपात पुजली जाणारी मातृदेवता. सासरी गेली तरी पुढील वर्षीच्या आगमनासाठी मन साद घालतच राहते.


जाई-जुईचा मांडव, त्यात चंदनाचा झुला 

ये गं ये सये चैत्रगौरी, सख्या झुलविती तुजला ।।

2 thoughts on “चैत्रगौरी

Comments are closed.

Theme: Overlay by Kaira