चैत्रगौरी आणि खाद्यपरंपरा

    चैत्र शुद्ध तृतीया, चैत्रगौरीचे आगमन. गौरींचे हे वर्षामधील पाहिले आगमन. दुसरे भाद्रपदात येतात त्या गौरी. चैत्रगौरीसंदर्भात काही महत्त्वाच्या परंपरा चालत आलेल्या दिसतात. त्यामध्ये शास्त्रीय दृष्टिकोन तर दिसतोच पण त्याचबरोबर ऋतूबदलातील आहार नियोजन केल्याचे दिसून येते. 

१. वसंत ऋतू :

    हा सृजनाचा ऋतू मानला जातो. या ऋतूच्या सुरुवातीला कौमार्य अवस्थेतील गौरी घरी आणून अक्षय्यतृतीयेला यौवनावस्थेत तिची सासरी होणारी पाठवणी यामधून स्त्रीजीवनातील महत्त्वाचे टप्पे परावर्तित होतात. तसेच सृष्टीलादेखील स्त्रीरूपात कल्पून तिचा सृजनाचा सोहळा अधोरेखित होतो.

२. झोपाळा :

    नवसर्जनाच्या वेळी मातेचे मन प्रसन्न असावे, थोड्याशा उष्ण वातावरणात झोपाळ्याची मंद हवा मन प्रसन्न करते. चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात. याच कारणासाठी डोहाळेजेवण देखील झोपाळ्यावरच करतात. 

३. कैरीचे पन्हे :

    वसंत ऋतूमधील मुबलक प्रमाणात सर्वत्र उपलब्ध असणारे फळ म्हणजे आंबा! त्याचेच कच्चे रूप कैरी. चवीला आंबट आणि सी व्हिटॅमिन भरपूर असणारे हे फळ. सी व्हिटॅमिन प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते. तसेच पन्ह्यामधील गूळ किंवा साखर ऊर्जा पुरवतात, थकवा कमी करतात. 

४. कलिंगड :

    हेसुद्धा फक्त उन्हाळ्यातच मिळणारे फळ. भरपूर पाण्याचा अंश आणि खजिने यात असतात. उन्हाळ्यात घामामुळे शरीरात कमी होणारे पाण्याचे प्रमाण आणि खनिजे यांची कमतरता कलिंगडाची भरून निघते. घशाला पडणारा शोष कमी होतो. 

५. कैरीची डाळ :

    नवीन तयार झालेल्या हरभऱ्याच्या डाळीचा कैरी मिसळून केलेला हा लोकप्रिय प्रकार. उन्हाळ्यामध्ये भाज्या कमी असल्याने त्याची कमतरता याने भरून निघते. आंबट गोड चटपटीत कैरीची डाळ सी व्हिटॅमिनयुक्त असते. हरभरा डाळीमधून भरपूर प्रोटिन्सदेखील मिळतात. 

६. भिजवलेले हरभरे :

    हरभऱ्याच्या लक्ष्मीचे प्रतीक मानले आहे. म्हणूनच शुक्रवारी देखील भाजलेले चणे (हरभरे) प्रसादासाठी असतात. थंडीमध्ये साचून राहिलेला कफ कमी करण्याचे काम हरभरा करतो. अगदी अडीच हजार वर्षांपूर्वी सिंधू संस्कृती दाखावणाऱ्या कालीबागन शहरात शेतजमिनीत त्या काळचे हरभऱ्याचे अवशेष सापडले आहेत. हरभऱ्यामध्ये लोह, कॅल्शिअम, रायबोफ्लॅविन, फॉस्फोरस, नियासिन ही घटकद्रव्ये मुबलक प्रमाणात आहेत. 

७. सुगंधी फुले :

    वसंत ऋतूबरोबरच निसर्ग फुलून येतो. सोनचाफा, मोगरा यासारखी सुवासिक फुले या ऋतूत वातावरण सुगंधित करतात. उन्हाळा असल्यामुळे या फुलांमधील सुवासिक रेणू वातावरणात लवकर आणि दूरवर पसरतात. वातावरण प्रसन्न व आल्हाददायक बनते. उन्हाळ्याच्या तापामुळे कोमेजलेल्या मनाला या सुवासिक फुलांमुळे टवटवी येते. 

    भारतीय सण उत्सव कायमच ऋतुबदल या मुख्य संकल्पनेवर आधारलेले दिसून येतात. या ऋतूबदलातील आहार नियोजनाचे प्रतिबिंब या सणांच्या खाद्यपरंपरेतून दिसून येते. शास्त्रीय दृष्टीने विचार केला तर प्रत्येक ऋतूमधील आहारातील घटक, पोषकद्रव्ये त्या ऋतूनुसार उपयुक्त असेच असतात.

Theme: Overlay by Kaira