चैत्रांगण – भाग १

    भारत आणि इतर देश यांची जेव्हा आपण तुलना करतो तेव्हा भारताला मिळालेले ऋतुंचे वरदान, त्या ऋतूंचा नियमितपणा, त्या ऋतूंनुसार साजरे केले जाणारे सण-उत्सव, त्यानुसार खाद्यसंस्कृतीत होणारे बदल, सण-उत्सव साजरे करण्यामागील ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक बंध अशा अनेक गोष्टींचा जणू गोफच विणला जातो. इतर देशांमध्ये इतके नियमित ऋतू, त्यानुसार साजरे होणारे सण-उत्सव यांची लगबग अंमळ कमीच जाणवते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा प्रसंगी भारतात प्रचंड लोकसमुदाय एकाच पातळीवर मानसिकदृष्ट्या तल्लीन झालेला दिसून येतो. तर इतर देशांमध्ये सण-उत्सव देखील चार भिंतींच्या आत मर्यादित लोकांबरोबर साजरे होतात.

    आपली भारतीय परंपरा अनेक छोट्या छोट्या गोष्टी जपते. इतर देशांमध्ये तुमचे स्वागत बंद दरवाजे, त्यावरील कॅमेरे करतात. तुमच्या आगमनापासूनच तुमच्या अस्तित्वाविषयी थोडी द्विधा यजमानाच्या मनात आढळते. भारतात मोठ्या शहरांमधून फ्लॅट संस्कृती नांदत असली तरी एक प्रकारचे सामाजिक भान तेथे जपले जाते. सामाजिक जाणिवा जागृत असतात. काही खेड्यांमध्ये वा खेडेवजा शहरांमध्ये आजही चाळी, रो-हाऊसेस, वाडे अशासारखे निवास आहेत. अशा घरांना पुढचा दरवाजा, अंगण, हॉल, स्वयंपाकघर, परसदार, मागचे दार अशी रचना आढळते. ‘घराचे अंगण त्या घराची कळा सांगते’ ही म्हण कायमच वापरली जाते. अंगणात पाऊल टाकताच त्या गृहस्वामिनीच्या कर्तबगारीचा पत्ता लागतो!

    पूर्वी अगदी मागील पिढीपर्यंतदेखील सकाळी उठून दार झाडणे, उंबरा धुणे, सडा संमार्जन करून त्यावर सुबक रांगोळी रेखणे आणि त्यावर हळूच हळद कुंकवाची चिमूट सोडणे या प्रसन्न करणाऱ्या कामाने गृहिणीच्या दिवसाची सुरुवात होत असे. स्त्रीला घराच्या उंबऱ्यापर्यंत येण्याची दिवसभरातील तेवढी एकच संधी. बाकी तिचे सर्व विश्व उंबऱ्याच्या आतच असे. त्यातूनही सासुरवाशिणी असणाऱ्या स्त्रिया आपल्या मनातील भाव-भावना, मनाचे दुखरे कोपरे व्यक्त करण्यासाठी रांगोळीचा आधार घेत. वरवर पाहणाऱ्याला जरी ती कलाकुसर वाटली तरी तिच्या जीवनातील वळणे, बहार, काही काटेरी क्षण आपोआपच रांगोळीमधून व्यक्त होत.

    अशा या रांगोळी रेखाटनांमधूनच कधीतरी ‘चैत्रांगण’ या कल्पनेचा उदय झाला. गुढीपाडव्यापासून चैत्र महिना चालू होतो – मराठी नववर्षाची सुरुवात! या चैत्र मासालाच पूर्वी ‘मधु’ मास असे नाव होते. त्याही पूर्वी वैदिक काळात चैत्र महिन्यास ‘अरुण’ म्हणत. ब्रह्मदेवाने सृष्टीची स्थापना केली तो दिवस म्हणजे गुढीपाडवा! चैत्र महिना म्हणजे वसंत ऋतू – सर्वत्र फुलण्याचाच ऋतू! रती-कामदेव देखील याच ऋतूच्या प्रेमात! शिशिरामधली मरगळ झटकून टाकून सर्व जण एका नव्या उत्साहाने भारून जातात. बळीराजाच्या दृष्टीने हा काळ तसा थोडा विश्रांतीचा. पण त्याच्या कारभारणीला मात्र संपूर्ण वर्षाचे नियोजन याच महिन्यात करायचे असते. त्यातून चैत्रगौर, तिची लेक माहेरी आली की तिचे स्वागत दारातच केले जाते ते ‘चैत्रांगण’ ने!

    चैत्रांगण म्हणजे नेमके काय, या परंपरेत नेमके काय काय केले जाते याविषयी जाणून घेऊ या पुढच्या लेखामधून! पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – चैत्रांगण – भाग २

Theme: Overlay by Kaira