चैत्रांगण – भाग २

    या चैत्रांगणमध्ये मध्यभागी मखरात दोन गौरी पाटावर बसवलेल्या असतात. आणि त्यासोबत असतो लाडका गिरिजापुत्र गणपती. त्याशिवाय तर कशाचाच शुभारंभ होत नाही. विद्येची देवता सरस्वतीदेखील जीवनातील विद्येचे महत्त्व दर्शविते. कोणत्याही संघर्षातील, युद्धातील विजयाचे, साफल्याचे प्रतीक म्हणून ध्वज, गुढी असतात.

    आपल्याला चैत्रांगणमध्ये दोन पंखे देखील दिसतात. वरकरणी जरी ते ग्रीष्म ऋतुत शीतलता प्रदान करणारे साधन असले तरी ते पंचमहाभूतातील वायू तत्त्वाचे वाहक आहेत. सदैव परिवर्तनशीलता हा जगाचा नियम असल्याचेच ते दर्शवतात. या परिवर्तनाशी जुळवून घेऊन चालावे. सुखदुःख कायम राहत नाहीत, त्यामुळे दोन्ही परिस्थितीत समभावाने राहावे असा संदेश ते देतात.

    शंख, चक्र, गदा ही विष्णुरूपाची प्रतिके देखील यात असतात. प्रणव ॐ देखील असतो. अवकाशामधील ॐकार ध्वनीतून विश्वनिर्मिती झाली असेच तो सांगतो. याच दरम्यान सीता राम वनवासातून परत आले. सीतेने वनवासात त्याग केलेल्या गोष्टी तिला परत आल्यानंतर मिळाव्यात या हेतूने कुंकवाचा करंडा, आरसा, फणी या शृंगाराच्या वस्तूदेखील चैत्रांगणात असतात.

    सनई चौघडे ही मंगलदायक आनंदसूचक वाद्ये, श्रीकृष्णाची अत्यंत लाडकी बासरी जी वंश वृक्षाचे (बांबू) प्रतिनिधित्त्व करते तर मोरपीस मानवी जीवनातील अनंत छटा दाखवते. आरोग्यदायी तुळशी वृंदावन, गायवासरू ज्यांच्या दर्शनाने वात्सल्याचा आविष्कार घडतो. अंबारीसहित असणारा हत्ती गजलक्ष्मीचे प्रतीक आहे तर नाग रक्षणकर्त्याची भूमिका बजावतो. केळीचे झाड – बहुप्रसवा केळी तुमचे आयुष्य समृद्ध असावे हे सूचित करते तर खण-नारळ अन्न-वस्त्राचे प्रतीक आहे. त्यामधील पाळणा सृजनाचे प्रतीक आहे. संसाराचा लयकर्ता शंकराचे शिवलिंग देखील यामध्ये असते. कितीही संसारात रमले तरी शेवटी सर्वांचा लय होतो हेच सत्य ते अधोरेखित करते.

    पणती जीव छोटा असेल तरी आसमंत प्रकाशित करणाऱ्या कन्येचे प्रतीक आहे तर ज्यांच्या मुखात विष्णू आणि कंठात रुद्र विराजमान असतात अशा हरिहरांचे एकत्र पूजन कलशरूपाने होते. या सर्व सृष्टीचे नियमन आपल्या उदय अस्ताने करणारे सूर्य-चंद्र कायम आपले घर प्रकाशित करतात.

    बापरे! नुसती एक झलकसुद्धा दमवून टाकते! पण पूर्वी गृहिणी हे सर्व रेखत असत. महिनाभर त्याची पूजा होत असे. आजसुद्धा कित्येक ठिकाणी छाप वा स्टिकर स्वरूपात चैत्रांगण दिसते. रांगोळीपेक्षा थोडे कमअस्सल असले तरी त्यातील मांगल्य, पावित्र्य, प्रसन्नता तीच आहे.

    हीच प्रसन्नता आपणास वर्षभर लाभो! सहनशीलतेची परिसीमा असणारी पृथ्वी आणि तिलाही धारण करणारे असे ते कासव! त्याची सहनशीलता केवढी अगाध! त्याचप्रमाणे आपणही सहनशील व्हावे. डमरूच्या नादाने आपल्यातील कलाभाव जागृत व्हावा तर त्रिशुळाच्या योगाने त्रिदोषांचे शमन व्हावे.

    येणाऱ्या नवीन वर्षात आपणास ज्ञान, आरोग्य, ऐश्वर्य, संपत्ती, सुख, शांती, शीतलता, तेजोमयता लाभावी अशी संपन्न आकांक्षा बाळगणारे हे ‘चैत्रांगण’ – महाराष्ट्रभूमीचे वैभव!!

2 thoughts on “चैत्रांगण – भाग २

  1. आपल्या साईटवर पोस्ट कसे टाकावे ते सांगावे

Comments are closed.

Theme: Overlay by Kaira