चांदोबाचा अंगरखा

Chandobacha angarkha

    शाळेमध्ये प्रार्थना चालू होती. बाई प्रार्थना म्हणत होत्या, त्यांच्यामागून मुले म्हणत होती –

“देवा तुझे किती सुंदर आकाश 

सुंदर प्रकाश सूर्य देतो 

सुंदर चांदणे, चंद्र हा सुंदर 

देवा तुझे किती सुंदर आकाश”

    प्रार्थना संपली आणि आता गोष्टीचा तास. ‘बाई गोष्ट बाई गोष्ट’ मुलांनी एकच गलबला केला. बाई म्हणाल्या, “हो हो, सांगते गोष्ट.” आता आपण प्रार्थना म्हटली की नाही, त्यातल्या चांदोबाची गोष्ट ऐका!

    दिवस मावळतो तशी रात्र पडायला सुरुवात होते आणि आकाशात एक चमकदार चांदीसारखा गोळा दिसायला लागतो. तोच आपला चांदोबा! भरपूर प्रकाश देऊन रात्र उजळून टाकणारा चांदोबा! तर बरं का मुलांनो, तुमच्या आईसारखीच या चंद्रालादेखील आई होती. चांदोबा म्हणजे तिचा लाडोबा नुसता! आईशी चांदोबा पळापळी करणार, लपाछपी खेळणार, आई चांदोबाला आवडते म्हणून गोड-गोड खीर करून देणार, बदाम पिस्ते घालून गोड दूध देणार. नुसती ऐट होती या लाडक्या चांदोबा बाळाची. एक दिवस फिरत फिरत चांदोबा आईकडे आला आणि आईला म्हणाला, “आई, आई, मला एक छानसा अंगरखा शिवून दे ना!” आपल्या लाडक्या बाळाचा हट्ट पाहून आईने छान आकाशी रंगाची मखमल आणली, त्याला चंदेरी किनार लावून चांदोबा बाळाला एक मस्त अंगरखा शिवून दिला. चांदोबानी तो घातला. खूपच सुंदर दिसत होता. त्याच्या अंगावर तो अंगरखा! रात्रभर सूर्य चांदण्यांना तो अंगरखा दाखवत आकाशभर फिरला आणि सकाळी दमून भागून घरी येऊन झोपला. 

    दुसऱ्या दिवशी रात्री आभाळात फिरायला निघताना त्याने अंगरखा चढवला. पण अरे! आज जरा हा ओढून-ताणून घालावा लागतोय. ठीक आहे त्याने तसाच तो घातला आणि गेला. तिसऱ्या दिवशी मात्र त्याच्या अंगात तो अंगरखा शिरेचना. रडत-रडत तो आईकडे गेला. मग आईने त्याला तो त्याच्या मापाचा करून दिला. तरी पुन्हा एक दोन दोन दिवसात त्याला तो अंगरखा बसेनास होई आणि आई तो अंगरखा त्याला उसवून मापात करून देई. खरं तर आता आता या अंगरख्याचा त्याला कंटाळाच यायला लागला होता! रोजच काय त्याचं  नवीन नाटक! पण आई मात्र प्रेमाने त्याला रोज नीट करून तो अंगरखा घालून देत होती. असेच पंधरा दिवस गेले. त्या दिवशी तर आईने सांगितलेच की आता यापुढे हा अंगरखा काही मोठा करता येणार नाही. उद्या जर माझ्याकडे रडत आलास तर बघ. बिचारा चांदोबा हिरमुसला. 

    दुसऱ्या दिवशी अंगरखा घालायला जातो तर काय? काहीही त्रास न होता तो पटकन घातला गेला. आईपण खूष, चांदोबा पण खूष! पण अजून दोन दिवस गेले आणि तो अंगरखा एकदम सैल बसायला लागला. चांदोबाची स्वारी परत रडत-रडत आईकडे. आई ! मी काय बुजगावणं आहे का? बघ तर कसा ढगळ बसतोय तो अंगरखा! आईने त्याला टीप मारून थोडासा लहान करून दिला. तरी परत दोन दिवसांनी तेच. आई टीपा मारून अंगरखा छोटा करून देत होती. एकदा मात्र आई वैतागली, “हे बघ चांदोबा! आता मात्र यापेक्षा हा अंगरखा काही लहान करता येणार नाही. परत जर का हा अंगरखा माझ्याकडे घेऊन आलास तर बघ! 

    बिचारा चांदोबा. त्याला खूप वाईट वाटले. बिचारा कोपऱ्यात बसून रडला, रडला आणि झोपी गेला. त्यादिवशी तो आकाशात देखील खेळायला गेला नाही. दुसऱ्या दिवशी झोप झाल्यावर उठला तरी एकदम बारीक तोंड होते त्याचे. आईने गोड गोड खीर खायला करून दिली. त्याने ठरवले होते की आज आईसमोर अंगरख्याचे नाव म्हणून काढायचे नाही! नकोच तो अंगरखा मुळी.

    आईच्या गळ्यात पडून त्याने आईला पापा दिला आणि उड्या मारत मारत आभाळात चांदण्यांशी खेळायला निघून गेला! तेव्हापासून ते आजपर्यंत चांदोबा आपल्याला आकाशात उघडच फिरताना दिसतोय!

    पण मुलांनो, चांदोबाला अंगरखा सारखा लहान मोठा का व्हायचा हे गुपित तुम्हाला कळले का?

Theme: Overlay by Kaira