चंद्रघंटा

   नवदुर्गांमधील दुर्गेचे तिसरे स्वरूप म्हणजे चंद्रघंटा. चंद्रघंटेच्या उपासनेमुळे साधकाचे मन मणिपूर चक्रात स्थिर होते. 

   परमशांती दायक आणि कल्याणकारी स्वरूप असणारी चंद्रघंटा कायम सिंहारूढ आणि युद्धसज्ज असते. सुवर्णाप्रमाणे तेजस्वी कांती असणाऱ्या चंद्रघटेला 10 बाहू आहेत. प्रत्येक हातामध्ये तिने खड्ग, चाप, बाण, गदा इत्यादी शस्त्रे धारण केली आहेत.

पिण्डजप्रवरारूढा चण्डकोपास्त्रकैर्युता |

प्रसाद तनुते महां चंद्रघंटेति विश्रुता ।।

या मंत्राने चंद्रघंटेची उपासना केली जाते. चंद्रघंटेच्या उपासनेमुळे अलौकिक अनुभव प्राप्त होतात, दिव्य वस्तूंची दर्शने स्वर्गीय सुगंधांचा अनुभव येतो. हे सर्व जाणवण्यासाठी आपले मन तेवढे तरल बनते.  चंद्रघंटेच्या आराधनेमुळे वीरता, निर्भयता वृद्धिंगत होतेच पण त्याचबरोबर स्वभावातील ऋजुता, सौम्यता देखील वाढते. अहंकार नष्ट होतो.

   दुर्गेच्या चंद्रघंटा या रूपामध्ये देवीला चंद्राच्या आकाराच्या घंटांनी युक्त दागिन्यांनी मढवले जाते. घंटेचे प्रतीक बाळगणारी ही दुर्गा घंटा नादाने चित्त तत्काळ प्रमाणात यावे त्याप्रमाणे मानवी मनाला वर्तमानात सजग ठेवते. मानवी मन चंद्राच्या कलांबरोबर बदलत असते.  घंटेच्या नादाने मन जागृत होऊन त्यावर आपले नियंत्रण प्रस्थापित होते. सजगता, खंबीरपणे हे गुण व्यक्तिमत्त्वाला आकर्षकता देतात.  चंद्रघंटेची उपासना भक्तांचे पाप, संकट दूर करते. उपासक सिंहाप्रमाणे निर्भय आणि पराक्रमी बनतो. 

   गळ्यात पुष्पमाला परिधान केलेली डोक्यावर रत्नजडित मुकुट असणाऱ्या चंद्रघंटेची पूजा शारदीय नवरात्राच्या तिसऱ्या दिवशी करतात. या दिवशी सावळा परंतु तेजस्वी सुवासिनीचे पूजन केले जाते. तिला भोजन दिले जाते. भोजनामध्ये दही-हलवा यासारखे पदार्थ आवर्जून वाढले जातात. या सुवासिनीला कलश, घंटी या वस्तू भेट म्हणून दिल्या जातात. 

   अशी ही सिंहारूढ दशभुजा चंद्रघंटा दुर्गा – सौम्य, शांत परंतु प्रसंगी कायम युद्धसज्ज! देवीच्या या स्वरूपाच्या उत्पत्तीनंतरच दानवांचा संवाद सुरू झाला. या देवीच्या मुखावरील आविर्भाव कायम युद्धसज्ज असल्यामुळे भक्तांवरील संकटाचे ती तात्काळ निवारण करते. डोक्यावर आणि हातामध्ये चंद्राप्रमाणे घंटा असणारी अथवा ज्या घंटेत चंद्र आहे अशी रक्तवस्त्रधारिणी ‘चंद्रघंटा’ आपल्या सर्वांचे दुःख हरण करून आपल्याला सुख, समृद्धी, आत्मिक शांती प्रदान करून आपले सदैव भयापासून रक्षण करो! 

Theme: Overlay by Kaira