दत्त जयंती

   मार्गशीर्ष पोर्णिमा, मृग नक्षत्र आणि सायंकाळची वेळ, सर्व दत्त भक्तांना मध्ये अतिशय महत्त्वाची असणारी ही त्रयी! दत्तगुरूंचा जन्म झाला तोच हा दिवस,’दत्तजयंती’! सर्व दत्त स्थाने आणि दत्तभक्त दत्त जयंतीचा उत्सव उत्साहाने साजरा करतात. या उत्सवापूर्वी पुरुष दत्तभक्त काटेकोर नियमांचे पालन करीत गुरुचरित्र या ग्रंथाचे मनोभावे पारायण करतात. दत्तजन्म उत्सवापूर्वी सर्व दत्त मंदिरांमधून भजन- कीर्तन केले जाते. दत्तगुरूंची धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती केली जाते. प्रसाद म्हणून सुंठवडा वाटला जातो.

   भारतामध्ये दत्त उपासना प्राचीन काळापासून चालत आली आहे. शैव, वैष्णव, शाक्त या सर्व पंथीयांमध्ये दत्तआराधननेची उज्वल परंपरा आहे. हीच परंपरा महानुभाव, वारकरी, नाथ, समर्थ,दत्त संप्रदायाचे उपासक देखील चालवितात. श्री दत्तात्रेय महाप्रभु यांना गुरुपरंपरेचे मूळ पीठ मानले जाते. हिंदू धर्मातील प्रथम गुरू श्री दत्तात्रेय असून त्यांच्यापासून साधन मार्गातील गुरू-शिष्य परंपरेचा उगम झाला. औदुंबर वृक्षाखाली श्री दत्तगुरूंचे स्थान असते असे मानले जाते. श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्ताचा पहिला अवतार आहेत. त्यानंतर ही शृंखला नरसिंह सरस्वती – वासुदेवानंद सरस्वती – श्री स्वामी समर्थ अशी प्रसार पावते. जैन धर्मीयांमध्ये नेमिनाथ या नावाने दत्तगुरुंची उपासना केली जाते. नाथ संप्रदायामध्ये राऊळ (रावळ) या पंथाचे प्रवर्तक असणारे’ नागनाथ’ हे सिद्ध पुरुष होते. अनेक मुसलमान पंथीय यांची उपासना करतात. मुसलमान भक्त दत्तात्रयाचा फकीर असा उल्लेख करतात. अनेक भक्तांना दत्तात्रेयांनी मलंग स्वरूपात दर्शन दिल्याची उदाहरणे आहेत.

   महानुभाव पंथीयांची परंपरा देखील दत्तात्रेयांपासून सुरू होते. दत्त्तात्रेय – चांगदेव राऊळ -गुंडम राऊळ -चक्रधर स्वामी अशा रीतीने विस्तार पावते. साधारणत : बाराव्या शतकाच्या सुमारास या देवतेचा नाथपंथातून भक्ती पंथात प्रवेश झाला असे दिसून येते. गोरक्षनाथाने अनेक शैव,शाक्त, वैदिक, अवैदिक धर्म- पंथ एकत्र करून नाथ पंथाची स्थापना केली होती. वारकरी पंथातील ज्ञानेश्वर, एकनाथ हेदेखील दत्त उपासक होते. चैतन्य संप्रदायाची परंपरा देखील राघवचैतन्य -केशव- बाबाजी- तुकाराम अशा पद्धतीची गुरुपरंपरा सांगते.

   श्री दत्तगुरूंच्या पाठीमागे असणारी गाय पृथ्वीचे प्रतीक असून सहनशीलता, सहिष्णुता, ममता याचे निदर्शक आहे. दत्तगुरूंच्या सभोवती असणारे चार श्वान, चार वेदांचे निदर्शक आहेत. दत्तगुरूंच्या काखेत असणारी झोळी ब्रह्मचर्य दर्शविते. दत्तमूर्तीची पूजा, उपासना, औदुंबर वृक्षाची पूजा, उपासना, उपवास,गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण अशा विविध स्वरूपात दत्तगुरूंची उपासना केली जात असली तरी सर्वात जास्त महत्त्व पादुका पूजन व दर्शनाचे आहे. उत्पत्ती, स्थिती, लय या जगरहाटीच्या तिन्ही स्थितींचा निर्देशक असणारे दत्तगुरु, कमंडलू- जपमाळ ही ब्रह्मदेवाचे प्रतीके धारण करताना दिसतात. शंख -चक्र ही विष्णूचे प्रतीके त्यांच्या दुसऱ्या दोन हातात असतात, तर त्रिशूळ अन डमरू शंकराचे प्रतीके त्यांच्या तिसऱ्या दोन हातात असतात. तीन शिरे सहा हात असे वर्णन केले जाणारे हे दत्तात्रय स्वरूप सत्व, रज, तम या तिन्ही गुणांनी युक्त असते.

   दत्त साधक कायम अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त असा जयजयकार करताना दिसतात. यातील ‘अवधूत’ हे दत्ताचे नाव असून ‘सदासर्वकाळ वर्तमानात आनंदाने जगणारा’ असा त्याचा अर्थ आहे. दत्त हे दैवत भक्तांच्या हाकेला तात्काळ पावणारे, धावून जाणारे आहे. क्षणार्धात प्रकट होणे आणि क्षणार्धात अंतर्धान पावणे ही त्यांचे खास दत्त वृत्ती आहे. इतक्या चंचल वृत्तीच्या दत्तगुरूंची दिनचर्या देखील त्यांच्या या वृत्तीस साजेशी अशीच आहे. श्री दत्तगुरूंचे स्नान वाराणसीला, चंदनाची उटी लेपन प्रयाग येथे, दुपारची भिक्षा कोल्हापूरला, भोजन पांचाळेश्वर येथे, तांबूलभक्षण राक्षसभुवन येथे, प्रवचन कीर्तन श्रवण नैमिष्यारण्यातील बिहार येथे होते. हे दत्तगुरू निद्रेसाठी माहूर येथे तर योग साधनेसाठी गिरनार येथे रोज भ्रमंती करतात असे मानले जाते.

   दत्तात्रेय याचा शब्दशः अर्थ पाहिला तर दत्त + अत्रेय म्हणजे यातील दत्त म्हणजे आपण स्वतः ब्रह्म, मुक्त आत्मा, निर्गुणाची अनुभूती असणारा असा होतो. तर आत्रेय म्हणजेच अत्रि ऋषीचा पुत्र होतो.

   अशी ही योग वृत्तीची हिंदू देवता! ज्यावेळी पृथ्वीवर स्थूल, सूक्ष्म अशा स्वरूपातील अनेक आसुरी शक्तीचा उपद्रव वाढला त्या वेळी त्यांचा नाश करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात अवतरली अथांग भव सागरामध्ये मानवी जीवन सुखरूपपणे पैलतीराला पोहोचविण्याचे कार्य सद्गुरु करतात. श्री दत्तगुरु गुरूंचाही गुरु असे विश्वगुरू पद धारण करतात. मूर्तिमंत कैवल्यमूर्ती असणारे हे ज्ञानी स्वरूप प्रपंच, परमार्थ, युक्ती यांचा त्रिवेणी संगम घडवून आणते.

   परमात्म्याचे आत्म्याशी असणारे अविनाशी एकत्व जगाच्या आदिपासून अंतापर्यंत वाहणारे एक गुरुतत्व आहे. श्री दत्त गुरूंचे पूजन हे दैवत पूजन नसून या गुरुतत्त्वाचे पूजन आहे. अद्वैत वेदांत हा या दत्तसंप्रदायाच्या तत्वज्ञानाचा भक्कम पाया आहे. या मार्गाने श्री दत्तगुरूंची उपासना करताना शारीरिक मानसिक प्रगती बरोबरच कौटुंबिक प्रगती साधली जाते. भक्ती आणि योग यांचा अचूक मेळ साधणाऱ्या या दैवताबद्दल आणि दत्त संप्रदायाबद्दल अधिक माहिती पुढील लेखात पाहूया…

Theme: Overlay by Kaira