देऊळ बंद

    मोठ्या उत्साहात सन २०१९ ला निरोप देऊन २०२० चे स्वागत झाले. जानेवारी महिन्यात २०२० लिहिण्याची सवय अंगवळणी पडतच होती तोच ११ जानेवारीला चीन मध्ये कोरोना या विषाणूच्या प्रादुर्भावाने एक व्यक्ती मृत्यू पावल्याची वार्ता आली. परंतु अथांग माहितीप्रवाहात हे वाहूनदेखील गेले. आत्तापर्यंत अशा अनेक बातम्या येत होत्या आणि लुप्त होत होत्या. त्यातूनच सार्स, स्वाईन फ्लू, बर्ड फ्लू, निप्पाह अशी अनेक नावे समजत होती. तेवढ्या विशिष्ट काळापर्यंत योग्य ती काळजी घेतली की या रोगांचे उच्चाटन देखील होत होते.

    पण हा ‘कोरोना (covid19)’ हा विषाणू मात्र फारच प्रभावशाली निघाला. चीनमधून हात पाय पसरत २० जानेवारीला त्याने इतर देशांत प्रवेश केला. २३ जानेवारीला या विषाणूच्या प्रभावामुळे त्याचे उगमस्थान वुहान पूर्णतः बंद करण्यात आले. ३० जानेवारीला जागतिक आरोग्य संघटनेने याला ‘जागतिक आरोग्य आणीबाणी’ घोषित केले. २ फेब्रूवारीला या रोगामुळे चीनबाहेरील एका देशात एक मृत्यू झाला. २३ फेब्रुवारी नंतर इटलीमध्ये या  रोगाने थैमान घातले. ३० जानेवारीला या विषाणूने भारतात प्रवेश केला. तेव्हापासून आजपर्यंत या विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या वाढतच आहे. सुरुवातीला यामुळे वाटणाऱ्या काळजीचे रूपांतर आता काही अंशी भीतीमध्ये झाले आहे. सामान्य वाटणाऱ्या या आपत्तीने आता उग्ररूप धारण’केले आहे. महाराष्ट्रात या विषाणूचे अस्तित्व आढळले आणि सर्वांना खडबडून जाग आली.

    isolation, quarantine यासारख्या शब्दांनी धुमाकूळ घातला. घडणारी प्रत्येक महत्त्वाची घटना नेहमीच काही शब्द प्रचलित करून जाते. त्या काळातील हे जणू keyword च! जगाच्या कानाकोपऱ्यातून कोरोना प्रसाराच्या बातम्या येऊन आदळत होत्या. आता मात्र ठोस उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली गेली. लोक एकत्र जमतात अशा जागा सर्वप्रथम बंद करण्यात आल्या. शाळा, कलासेस, कॉलेजेस ओस पडली. सर्वांनी साकडे घालण्यासाठी मंदिराकडे धाव घेतली. अरे पण हे काय? स्वतः देवच मंदिराची दारे बंद करून बसला होता. 

    खरे तर आरोग्यमंदिरे (gym), ज्ञानमंदिर जेव्हा बंद झाली तेव्हा लोकांनी सहज स्वीकारले. परंतु देऊळ बंद? काही अल्पमती जीवांनी देवच स्वतःच्या रक्षणासाठी दरवाजे बंद करून बसला, तो आमचे काय रक्षण करणार? अशी हाकाटी सुरु केली. 

    आस्तिक आणि नास्तिक हा वाद जरी खूप जुना असला तरीही प्रत्येक जण सर्व जगाचे नियंत्रण करणाऱ्या श्रेष्ठ शक्तीला मनातून मानतच असतो. नास्तिक लोक आत्मविश्वास, कर्तव्यनिष्ठा, त्यांनी आयुष्यभर जोपासलेली तत्त्वे यांच्यावर पॅरामेश्वराप्रमाणे विश्वास ठेवतात. तर आस्तिक लोकांची परमेश्वरावरील असीम श्रद्धा त्यांना जगण्याचे बळ पुरविते. कित्येक जण ‘नेति नेति’ म्हणत परमेश्वराच्या निर्गुण निराकार शक्तीचे अधिष्ठान मानत असतात. सामान्य लोकांना मात्र प्रतीकात्मक मूर्तीमधूनच ईश्वराचे दर्शन घडते. मूर्तीमध्येच परमेश्वर वास करतो अशी समजूत सामान्य लोकांमध्ये आजही दृढ आहे. 

    ईश्वर सर्वव्यापी आहे, प्रत्येक प्राणीमात्रात ईश्वराचा अंश आहे या गोष्टींचा विसर पडून मंदिरे आणि देवत्त्वाचा बाजार मांडला गेला. प्रत्येकाच्या देहामध्ये आत्माराम आहे. आपण अनन्यभावाने त्याला शरण गेलो की हमखास प्रचिती येते. अंतर्यामी असणाऱ्या या देवाला बाबा आमटेंसारख्या समाजसेवकांनी पुरते ओळखले होते व गांजल्या जीवांची सेवा करण्याचे व्रत अंगिकारले होते. आपण मात्र या हृदयातील भगवंताला उपाशी ठेऊन मंदिरांमध्ये गर्दी करत राहतो. 

    एका जागी गर्दी करून होणाऱ्या विषाणूंच्या संक्रमणाला आळा घालणे हा मंदिरबंदीचा मुख्य उद्देश! परंतु स्वतःच्या संरक्षणासाठी देवाने दरवाजे बंद केले असे ऐकून देवाने मानवाच्या बुद्धीची कीवच केली असेल. या जीवाणू-विषाणूंमुळे निर्माण होणाऱ्या आपत्ती कोण ओढवून आणतो, त्याचा प्रसार होऊ नये म्हणून काय काळजी घेणे आवश्यक आहे असे प्रश्न हा बुद्धिमान मानव स्वतःला विचारत नाही.याविषयी सखोल ज्ञान माहित करून घेणेही त्याला आवश्यक वाटत नाही. अशा प्रसंगी पूर्ण दैववादी बनून सर्व गोष्टी देवावर ढकलून तो स्वतः नामानिराळे राहू पाहतो. आपण बेबंद, बेताल वर्तन करून जेव्हा दुष्परिणाम होतात त्यासाठी देवाला जबाबदार धरणे कितपत संयुक्तिक आहे? स्वच्छता पाळणे, सामाजिक नियमांचे पालन करणे, या रोगाचा प्रसार थांबवण्यासाठी शक्य ती सर्व काळजी घेणे, यासाठी आपल्या परिसरातील लोकांचे प्रबोधन करणे या गोष्टी सोडून फक्त social media द्वारे टवाळकी करणे महत्त्वाचे समजले जात आहे. गाडगे महाराज, तुकडोजी महाराज यांचे संदेश लोक विसरले आहेत. पान, तंबाखू, मावा खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, शिंकताना, खोकताना रुमाल न वापरणे, हाताची स्वच्छता न पाळणे यासारख्या गोष्टी रोगप्रसारास प्रामुख्याने हातभार लावतात. या स्वच्छतेच्या सवयीचे कटाक्षाने पालन केले गेलेच पाहिजे. या संसर्गाने बाधित असणारी व्यक्ती एक मानवच आहे हे सुद्धा विसरून जाऊन लोक त्याचा तिरस्कार करत आहेत.

    उठा, डोळे उघडा, जागे व्हा! मंदिरामधील देव आज प्रत्येक आरोग्यकेंद्रामधून आरोग्यसेवकाच्या रूपात वावरतो आहे याची जाणीव असू द्या. बाधित लोकांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी ते दिवस-रात्र एक करत आहेत. प्रत्येक आरोग्यकेंद्र मंदिर बनले आहे. आरोग्यसेवकांनी मानवतेच्या पुजाऱ्याचे रूप घेतले आहे. रतन टाटांपासून ते सामान्य माणसापर्यंत सर्वांनी या मानवतेच्या कार्याला उचलून धरले आहे. त्यांना सहकार्य करा, हातावरील शिक्के लपवू नका, आपल्याच घरात सुरक्षित राहून समाजाचे आरोग्य राखण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही चुकीच्या माहितीला बळी पडू नका. शासनाकडून याविषयीच्या माहितीचा अधिकृत स्रोत या संकेतस्थळावर उपलब्ध आहे – mygov.in

    या मानवतेच्या पुजाऱ्यांना त्यांच्या योगदानाबद्दल त्रिवार वंदन! आपण सर्वांनी एकदिलाने, एकजुटीने सकारात्मकतेने या संकटावर मात करण्याचा संकल्प सोडू या! 

Theme: Overlay by Kaira