देववाणी संस्कृत – ओळख

पठामि संस्कृत नित्यं, वदामि संस्कृत नित्यं सदा |

ध्यायामि संस्कृत सम्यक्, वंदे संस्कृत मातरम् ।।

भारतामधील अतिप्राचीन, समृद्ध, रम्य संस्कृतीसंचित ज्ञानभाषा म्हणजेच ‘संस्कृत’ ‘देववाणी’ होय. गीर्वाणवाणी, गीर्वाणी, देवभाषा, दैविवाक्, सुरवाणी, अमरवाणी, अमरभारती अशा अनेक नावांनी ही भाषा ओळखली जाते. इंडो युरोपीय भाषाकुलातील ही संस्कृत कोणत्याही विशिष्ट प्रदेशाची भाषा नसून भारतवर्षातील अतिप्राचीन प्राकृत भाषांमधील शब्दांचे संस्करण करून ती तयार झाली.

प्राचीन भारतीय मूल्यांचे ज्ञान, उपयुक्त प्राचीन ज्ञानाचा साठा असा तद्दन भारतीयत्वाचा कस असणारी संस्कृत ही एकमेव भाषा आहे. मधुरता हा या भाषेचा गाभा असून अलौकिकता तिचा धर्म आहे. जीवनामधील विज्ञान, तंत्रज्ञान, ज्योतिष, कृषी, आरोग्य, धातुविद्या,अर्थशास्त्र, व्यवस्थापनशात्र अशा अनेक क्षेत्रांमध्ये संस्कृत सहज रीतीने वावरते.

संस्कृत भाषेच्या पठणामुळे वाणीला शुद्धता प्राप्त होते, पवित्रता व मांगल्य याचा अनुभव आपण घेतो. संस्कृत भाषेच्या अध्ययनामुळे सकारात्मक ऊर्जा वाढून बुद्धी तीव्र होते. संगणकासाठी देखील ही भाषा सोयीची आणि सोपी असल्याचे पुढे येत आहे. काळाच्या ओघात ही भाषा मागे पडत असली तरीही कर्नाटकामधील ‘मत्तूर’ या गावातील लोकांसारखे अपवाद आजदेखील आहेत. या गावात आजही धर्माचा, समाजाचा भाषेवर अधिकार नाही. अगदी मुस्लीम समाजासहित सर्वांची बोलीभाषा या गावात संस्कृतच आहे.

या भाषेचे व्याकरण सोपे, रसदार असून एकदा संस्कृतमध्ये पाठ केलेली गोष्ट सहसा विसरत नाही. खरे तर ही भाषा आपल्या रोजच्या जीवनाचा एक भाग असावी परंतु सध्या तसे दिसून येत नाही. या भाषेतील ज्ञान, संपन्नता पचेल त्या स्वरूपात मनोरंजक रीतीने मांडण्याचा प्रयत्न या विभागातील लेखांमधून केलेला आहे.

प्राचीन उपयुक्त भारतीय ज्ञानाचे काही कण यामधून सर्वांनाच टिपता येतील अशी आशा!

या सौष्ठवसंपन्न, सुंदर भाषेचं वर्णन करताना संस्कृतप्रेमींच्या मुखातून अनायासे उद्गार येतात –

भाषासु मुख्या मधुरा 

दिव्या गीर्वाण भारती ।

तस्माद्धि काव्यं मधुरम् 

तस्मादपि सुभाषितम् ||

 

संस्कृत भाषेचे वैभव म्हणजे सुभाषिते. या सुभाषितांविषयीचेच एक सुभाषित वाचण्यासाठी क्लिक करा – ‘सुभाषिते – १’

Theme: Overlay by Kaira