दिव्याची आवस

Divyachi Awas - 2

          आषाढ अमावस्या! म्हणजेच ‘दिवली अमावस्या’, ‘दिव्याची अमावस्या’ किंवा ‘दिवेधुती अमावस्या’ होय. महाराष्ट्रामध्ये ही अमावास्या असताना मध्य भारत, उत्तर भारत येथे श्रावण अमावस्या असते. तिला ‘हरियाली अमावस्या’ असे म्हणतात.

       उगवत्या सूर्याला वंदन करून आपली दिनचर्या सुरु करणारी भारतीय परंपरा. आपल्याकडे वर्षभर सूर्यदर्शन होते. भारतीय संस्कृती एका विशिष्ट धाग्याने अध्यात्माशी जोडली गेलेली आहे. आषाढ महिन्यात जेंव्हा आभाळ गर्द ढगांनी भरून जाते, तेव्हा त्या ढगांच्या आड चन्द्र, चांदण्या, ग्रह,तारे झाकोळून जातात. कदाचित याच कारणामुळे जगत्पालक श्री विष्णू निद्राधीन झाले, त्यांची रात्र सुरु झाली असे मानले जात असावे. परंतु श्री विष्णू निद्राधीन झाले तरी ज्ञानी लोकांवर गुरुपणाची जबाबदारी त्यांनी सोपविलेली असते. अशा गुरूमंडळींनी  सर्वसामान्याना उपदेशामृत पाजावे, त्याच्या अंतर्यामी ज्ञानाचा, भक्तीचा दीप प्रज्वलित करावा यासाठीच ही गुरुपौर्णिमेनंतर येणारी ‘दिव्याची आवस’. सर्वसामान्यांच्या हृदयात भक्तीचा,ज्ञानाचा दिवा तेवत ठेवणारी.

         भारतामध्ये दिव्यांचा इतिहास फार प्राचीन आहे. अगदी आदिमानव गुहेत रहात असल्यापासून तिथे दगडी दिवा असल्याचे संदर्भ सापडतात. अंधाऱ्या गुहेमध्ये कोरलेली काही गुहाचित्रे गुहेमध्ये दिव्याचे अस्तित्व असल्याचे अप्रत्यक्ष साक्षीदार आहेत.

             आषाढातील गर्द  सावळा काळोख सरताना हा दीप श्रावणातील ऊन पावसाची चाहूल देतो आणि वातावरण मंगलमय करून टाकतो. आषाढापासून लहान होत जाणारा दिवस, आकाशात काळ्या ढगांची गर्दी असल्याने वातावरणातील कोंदटलेपण, काळोखेपण आणि अशा हवामानामुळे येणारी मनावरील मरगळ, भावनांचे कोंडलेपण दीपदर्शनाने, दीपपूजनाने झटक्यात दूर होते. जेव्हा हा दिवा गायीचे तूप वापरून प्रज्वलित केला जातो तेव्हा मनाला उत्साह, तरतरी येते. मनावर दाटलेल्या मळभाचे पटल दूर सरते. त्याच्या सात्विक प्रकाशाने नजरेला एक सुखद, पवित्र भावनेचा स्पर्श होतो.

        या गायीच्या तुपाच्या दिव्यात हवेतील सूक्ष्म किटाणू मारण्याची, हवेतील प्रदूषण दूर करण्याची क्षमता असते. अशा प्रज्वलित दीपाच्या सान्निध्यात आपण एका निरामय शांत अवस्थेचा अनुभव घेतो.

       पूर्वीच्या काळी जेव्हा विजेचा शोध लागला नव्हता, तेव्हा दुपारीच घरातील सर्व दिवे साफसूफ करून त्यावरील काजळी झटकून, त्यात तेलवात करून संध्याकाळच्या  दिवेलागणीची तयारी करून ठेवीत. सूर्यास्तानंतर देवापुढे, तुळशीपुढे दिवा लावून प्रार्थना केली जात असे.

शुभं करोति कल्याणम ,आरोग्यम धनसंपदा ।

शत्रुबुद्धी विनाशाय ,दीपोज्योती नमोस्तुते ।। 

आमच्या जीवनातील, मनातील, बुद्धीतील,सर्व अंधःकार नष्ट होऊन आमचे जीवन ज्ञानाने ,सत्कर्माच्या प्रकाशाने उजळून जाऊ दे.

      भारतीय सणांचा विचार केला तर दिव्याशी निगडीत दोन सण  दिसतात. त्यातील पहिला हा ‘दिव्याची आवस’ तर दुसरा ‘दिवाळी’. परंतु  दिव्याची आवसेला जास्त महत्त्व आहे. कारण या दिवशी दिव्यामधील सूर्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रकाशाचे आणि ज्वलनातून प्रत्यक्ष अग्नितत्वाचे प्रतिनिधित्व करणाऱ्यादिव्याची साग्रसंगीत पूजा करून कृतज्ञता व्यक्त केली जाते. दिवाळीमध्ये दिवे फक्त सुशोभनासाठी वापरतात. सजावटीचे एक माध्यम म्हणजे दिवाळीतील दिवा. आवसेच्या दिव्याची प्रतीकात्मकता त्यात नाही.

        विजेचा शोध लागण्यापूर्वी आषाढापासून सुरु होणाऱ्या धुवांधार पावसात, तुफानी वाऱ्यात प्रकाश आणि ऊब मिळविण्यासाठी दिव्यांची गरज पडेल म्हणून श्रावण सुरु होण्याच्या आदल्या दिवशी सर्व प्रकारचे दिवे घासून पुसून स्वच्छ करून पाटावर मांडून त्यांची पूजा केली जात असे.

       कुंद  पावसाळ्यात मंदावलेल्या पचनशक्तीला अनुसरून सहज पचणारे असे उकडलेले अन्न, म्हणजेच कणिक किंवा बाजरीच्या पिठात गुळ  मिसळून केलेल्या दिव्यांचा तूप आणि दूध घालून दाखविला जाणारा नैवेद्य भारतीय सण  आणि आहार याचे शास्त्र समजावून सांगतो. नैवद्य दाखवून  झाल्यानंतर या पंचमहाभूतातील अग्नीचे प्रतीक असणाऱ्या  कर्मसाक्षी दीपाची प्रार्थना करायची,

दीप सूर्याग्निरूपस्त्व ,तेजस: तेज उत्तमम ।

गृहाणम मत्कृताम  पूजा सर्व कामप्रदो भव : ।।

हे दीप, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस. तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.

        इडा -पीडा नष्ट करून अज्ञान, रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पसरू दे म्हणून त्याची विनवणी करायची.

       काही ठिकाणी याच दिवशी पितृतर्पण करून पुरणाचा नैवेद्य दाखवून पितरांचा आशीर्वाद घेतला जातो. या दिवसापासून पत्रींचे महत्त्व सुरु होते. आघाडा ,दुर्वा, पिवळी फुले असा निसर्गसंभार दिव्याच्या पूजेसाठी वापरला जातो.

        आपले पार्थिव शरीर आणि त्यात तेवणारी प्राणज्योत याचे प्रतीक असतो हा दिवा! म्हणूनच शरीरातील प्राणज्योतीस ‘आत्मज्योत’ असेही म्हणतात. आपला वंश पुढे नेणाऱ्यास  ‘कुलदीपक’ म्हणतात. आजकाल स्त्रीपुरुष समानतेच्या काळात मुलीला देखील ‘पणतीची’ उपमा देतात.

          आजच्या वीजयुगात पावसाळ्यापूर्वी सर्व विद्युत उपकरणे नीट तपासून ठेवणे, घरातील इन्व्हर्टर ,जनरेटर व्यवस्थित करून घेणे, घरातील वीजजोड तपासणे ,पावसाचे पाणी गळून कुठे शॉर्ट सर्किट होणार नाही अशी दक्षता घेणे यालाच ‘आधुनिक दिव्याची आवस’ म्हणावी लागेल!

        शेवटी काय! तेजाची पूजा हा भारतीयांचा स्थायी भाव आहे. जेव्हा या तेजाची पूजा ‘तमसो S मा ज्योतिर्गमय’ म्हणून केली जाते तेव्हा मानवाचे जीवन प्रकाशाने उजळून निघते.

Theme: Overlay by Kaira