गोंधळ – एक विधिनाट्य

   घरात कोणतेही मंगल कार्य संपन्न झाल्यानंतर कुलाचारा प्रमाणे आपापल्या कुलदेवतेच्या उपासनेने प्रित्यर्थ गोंधळ घातला जातो. गोंधळी लोकांचा वृंद पारंपरिक पोशाखात येतो. त्यांच्याबरोबर त्यांचे गोंधळाची म्हणून खास असणारी संबळ, तुणतुणे, टाळ, झांजरी, दिमडी अशी वाद्ये असतात.

   हे गोंधळी लोक आल्यानंतर प्रथम मांडणी करतात. पाच उसाची किंवा ज्वारीची ताटे टोकाकडून एकत्र बांधून जमिनीवर उभे केले जातात. या तिकाटण्यात देवीच्या घटाची स्थापना केली जाते. वर फुलोरा बांधला जातो. त्यावर नवग्रहांच्या नऊ सुपार्‍या मांडल्या जातात. सप्त धातूंचे निदर्शक हळकुंड ठेवले जातात. यामधील ज्वारीची किंवा उसाची ताटे पंचमहाभूतांचे प्रतीक आहेत, फुलोरा तारांगणाचे प्रतीक आहे, तर घट आत्म ज्योतीचे प्रतीक आहे. दैत्याच्या शीराचे प्रतीक असणारे नारळ देखील मांडले जाते.

   या गोंधळी लोकांचा पारंपरिक पोशाख पूर्वी पायघोळ अंगरखा, धोतर, मुंडासे, उपरणे असा असायचा. परंतु आता कालानुरूप झब्बा, पायजमा, टोपी असा असतो. या गोंधळाच्या विधीनाट्याची जी मांडणी केली जाते त्यासंबंधी एक सुंदर रचना आढळते,

आकाशाचे केले मंडप , पृथ्वीचा भरला चौक

सप्तधातू लाविली खूण , त्याचे बनले हळकुंड

नवरस लिंबू पूर्ण, हृदयात भरला घट

ध्यान करतो परशुराम, कानी येतो ऐसा ध्वनी

आली तू माय भवानी!!

   देवी जगदंबे चे विश्वव्यापक रुप यामधून दिसते. या गोंधळाच्या विधिनाट्यात या पूर्वी स्त्रियांचा सहभाग अजिबात नव्हता. फक्त आणि फक्त पुरुष लोकच हा गोंधळ सादर करायचे. अलीकडच्या काळात मात्र या गोंधळाचे उपासनत्मक रूप रंजनात्मक रूपात बदलले आहे, त्यामुळे आजकाल गोंधळी वृंदात स्त्री नर्तिकांचा भरणा होऊन त्याला बाजारू स्वरूप आले आहे. कालाय तस्मै नमः।

   मांडणी झाल्यानंतर सर्वप्रथम देवतेची स्थापना करून षोडशोपचारे किंवा पंचोपचार पूजा केली जाते. या विधीमध्ये गणपतीची स्थापना न करता त्याला आवाहन करून नंतर नमन केले जाते. त्याला गण असे म्हणतात. उपास्य देवतेला नमन करून संकीर्तन केले जाते. पूर्वरंग व उत्तररंग असे भाग असतात. काही गोंधळी आख्याने सांगतात. नळ -दमयंती , अंबरीश राजा, विक्रम राजा, चांगुणा राणी तसेच जांभूळाख्यान अशी आख्याने रंगवून सादर केली जातात. उपास्य देवतेची गाणी, देवतेच्या लीलांचे नाट्यरूपात दर्शन असे सर्व सादर केले जाते. या सर्व सादरीकरणामध्ये गायक, वादक, नर्तक, संवाद साधणारे, नाट्य अभिनय सादर करणारे सर्व काही गोंधळीच असतात. उपासना गीते झाल्यानंतर जोगवा म्हणून शेवटी आरती केली जाते. आरतीनंतर देवतेचे विधीपूर्वक विसर्जन केले जाते. गोंधळी देवीचा घट त्रिवार यजमानाच्या डोक्याला लावून “काय उतरतो?” असे विचारतात आणि त्यावर यजमान “ओझे उतरतो.” असे उत्तर देतात.

   गोंधळी गीतांमधून पारंपरिकता आणि उत्स्फूर्तता यांचा संगम दिसून येतो. कृत्रिमता अलंकारिकता यांचा अजिबात लवलेश नसतो .प्रभावी आणि ओघवते श्रोत्यांना भारावून टाकणारी निवेदन शैली असते. सादरीकरणाला एकसुरीपणा येऊन ते कंटाळवाणे होऊ नये म्हणून अधून मधून विनोद निर्मिती केली जाते .गोंधळी विनोदनिर्मितीसाठी चरणांचे बंध गातात त्याला ते ‘कंडी’ म्हणतात. या लोक गायकांचे स्वतःची अशी एक सांकेतिक भाषा असते, तिला ते पारसिक भाषा म्हणतात. आपापसात बोलताना ते या पारसिक भाषेत बोलतात.

   तसेच सादरीकरण झाल्यानंतर गोंधळी आपल्या करपल्लवीचा आविष्कार दाखवतात. श्रोत्यांपैकी कोणाचेही नाव करपल्लवीच्या माध्यमातून ओळखून दाखवतात. याविषयीचा सध्या व्हायरल झालेला एक व्हिडिओ आपण कदाचित पाहिला असेल! या लेखात खाली आपण तो पाहू शकता! संबळ वाजवून नाद निर्मिती करून श्रोत्यांमध्ये बसलेल्या विशिष्ट व्यक्तीचे स्थान देखील ओळखतात. असे हे विधिनाट्य हे लोक कलाकार सादर करतात. परंपरा, उपासना, देवी भक्ती याचे भक्कम अधिष्ठान याच्यामागे असते. देवीवरील श्रद्धा भटकेपणा आणि भिक्षेकरीपणाच्या भावनेवर मात करते. या लोक सादरीकरणाला ना नेपथ्य, ना प्रकाश योजना, ना पात्रयोजना ना ध्वनी योजना! अंतरीच्य उमाळ्यातून येणारे गीत-संगीत ,संवाद श्रोत्यांसमोर जिवंत रितीने प्रभावीपणे वहात राहते आणि समस्त श्रोतृवर्ग श्रद्धा भक्तीने एकाच स्वरात आई भवानीचा जयजयकार करतो, ‘आई भवानी चा उदो उदो’!!

 

Theme: Overlay by Kaira