गुढीपाडवा

    ‘भारतीय सण’ या लेखामध्ये आपण सणांमागील उद्दिष्टांचा, सण या संकल्पनेच्या ऐतिहासिक संदर्भांचा आढावा घेतला. आता पाहू या मराठी वर्षातील पहिला सण, अर्थातच गुढीपाडव्याविषयी!

    हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते. चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी हा सण संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होतो. अखंड वाहणाऱ्या कालप्रवाहात कालगणनेची प्रथा सुरु झाली. या कालगणनेच्या प्रथेमागे काही मुख्य गोष्टींची पार्श्वभूमी आहे. सध्या जरी दिवस-महिना-वर्ष ही ग्रेगेरिअन कॅलेंडरप्रमाणे चालणारी कालगणनेची पद्धत आपण वापरत असलो तरी प्राचीन काळी तिथी-मास-संवत्सर या पद्धतीप्रमाणे कालगणना होत असे. ज्योतिषशास्त्रीय ग्रंथांमधून आपल्याला ब्राह्म, दिव्य, पित्र्य, प्राजपत्य, ब्राहस्पत्य, सौर, सावन, चांद्र, नक्षत्र अशा नऊ कालमापन पद्धती आढळतात. त्यापैकी ब्राह्म्य म्हणजे ब्रह्मदेवाच्या आयुष्यावरून ब्राह्म्य मान मोजले जाते. ब्रह्मदेवाने सृष्टीचे निर्माण केले तो दिवस म्हणजे गुढीपाडवा असे मानले जाते.

    भारतामध्ये जे काही प्रसिद्ध राजे होऊन गेले त्यांनी स्वतःच्या नावाने स्वतंत्र कालगणना सुरु केली. या राजांना शककर्ते म्हणतात. त्यानुसार शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने सहा हजार मातीचे पुतळे तयार करून  ते सजीव केले. त्यांच्या साहाय्याने शकाचा पराभव केला. तो काळ ‘शालीवाहन शक’ म्हणून मान्यता पावला. त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ गुढीपाडवा साजरा केला जातो.

    महाभारतामधील आदिपर्वामध्ये उपरिचर राजाने इंद्राने दिलेली कळकाची काठी जमिनीत रोवली आणि दुसऱ्या  दिवशी नववर्ष प्रारंभाची पूजा केली. या परंपरेचा आदर म्हणून काठीला रेशमी वस्त्र लेववून तिला शृंगारून तिची  पूजा करण्याची प्रथा आहे.

    प्रभू श्रीरामचंद्र रावणाचा वध करून वनवासातून अयोध्येस परतले तो दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा होता. त्यांनी रावणावर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून यादिवशी गुढ्या उभारल्या जातात. तेलुगू भाषेमध्ये गुढी या शब्दाचा अर्थ लाकूड, काठी तसेच तोरण देखील होतो. पाडवा हा  शब्द संस्कृत शब्द पड्डवा/ पाड्डवो (चंद्राच्या वाढत्या कलेचा पहिला दिवस) प्रतिपदा या अर्थी वापरला जातो. म्हणून हा ‘गुढीपाडवा’. वसंत ऋतूचा प्रारंभाचा दिवस, पानगळ संपवून बाल पालवी डोकावत असते. शिशिर ऋतूत शरीरभर पसरलेला आळस अंग झटकून ताजेतवाने होत असतो. चैतन्यहीन मानवात चेतना निर्माण करून त्याच्यामधील अस्मिता जागृत करण्याचा हा नववर्षाचा प्रथम दिन. या दिवसाविषयी बहिणाबाई म्हणतात –

गुढीपाडव्याचा सन आता  उभारा रे गुढी 

नव्या वरसाचं देनं सोडा मनातील अढी

    हिंदू परंपरेनुसार प्रत्येक सणाला लोकसंस्कृती आणि ऋतुबदल असे दोन आधार आहेत. गुढीपाडव्यासंदर्भात देखील भूमीला जगाचा गर्भाशय मानून सूर्य बीज पेरतो आणि वृष्टीमुळे भूमी सुफलीत होते अशी समजूत आहे. या सर्जनासाठी मिळणारी ऊर्जा वसंत ऋतूमध्ये मिळते.

    यादिवशी सकाळी लवकर शुचिर्भूत होऊन सूर्योदयाच्या नंतर बांबूच्या काठीला सुगंधी स्नान घालतात. वरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी नेसवून त्याला कडुनिंबाच्या डहाळ्यांनी सुशोभित करतात. साखरगाठी घालतात. सर्वात वरच्या टोकाला तांब्याचे अथवा चांदीचे भांडे कलश म्हणून पालथे घालतात. या गुढीची पंचोपचार पूजा करून गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. यादिवशी ब्राह्मण उपाध्यायाकडून ‘पंचांग श्रवण’ ‘वर्षफल श्रवण’ करण्याची प्रथा आहे. तसेच यादिवशी सरस्वतीपूजन देखील केले जाते. पुढे सुरु होणाऱ्या उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून कडुनिंबाचा कोवळा पाला ओवा, मीठ, हिंग, मिरी, साखर आणि कडुनिंबाचा मोहोर यासहित वाटून चटणीप्रमाणे खाल्ला जातो.

   कडुनिंबाची पाने पाण्यात टाकून ते पाणी उन्हात ठेऊन तापवले जाते आणि त्या पाण्याने लहान मुलांना अंघोळ घातली जाते. यामुळे लहान मुलांना उन्हाळा बाधत नाही असे म्हणतात. यालाच ‘इवळगी’ असे म्हणतात.तसेच गुढी उतरवताना तिला तिला तापनाशक असा धणे+गूळ असा नैवेद्य दाखवला जातो.

    अशा प्रकारे एकाच गुढीचे प्रतीक मानवी जीवनातील मूलभूत गरजांचे प्रदर्शन करते. बांबू – निवारा, रेशमी वस्त्र – वस्त्र, साखरगाठी – अन्न. त्याचबरोबरीने कडुनिंबाचे डहाळे आरोग्यपूर्णतेचा संदेश देतात. या गुढीला ब्रह्मध्वज असेदेखील म्हणले जाते. गुढीपाडवा हा आनंदाचा, विजयाचा, मांगल्याचा, स्नेहाचा सण आहे. यादिवशी भोगावर योगाचा विजय, वैभवावर विभूतीचा विजय नि विकारांवर विचारांचा विजय मिळवण्याचा संकल्प करू यात.

    या गुढीचा संतसाहित्यामध्ये भरपूर ठिकाणी उल्लेख पाहावयास मिळतो. लीळाचरित्रात, ज्ञानेश्वरीमध्ये गुढीचा उल्लेख आहे. संत एकनाथांनी धार्मिक काव्यामध्ये हर्षाची, ज्ञातेपणाची, यशाची, रामराज्याची, भक्तीची, जैताची, वैराग्याची अशा अनेक गुढ्या उभारण्यास सांगितले आहे. खरे तर गुढी उभारणे हे केवळ प्रतीकात्मक आहे. तुमचा संकल्प काठीप्रमाणे सुदृढ, दणकट असावा. त्याची फळे साखरगाठीप्रमाणे गोड असावीत. संकल्पपूर्ती करताना काही कटू अनुभव आले (कडुनिंबाप्रमणे) तरी तुमच्या संकल्पाची गुढी उंच आकाशापर्यंत  जाऊ द्या. कोणत्याही संकल्पपूर्तीसाठी भाव भावनांचे, नात्यांचे रेशमी बंध कायम लक्षात ठेवावेत म्हणूनच रेशमी वस्त्राचे आवरण असे समजून घ्यायचे आणि गुढीपाडव्याच्या या साडे तीन मुहूर्तापैकी पहिल्या पर्वाला गुढीची मनोभावे प्रार्थना करायची –

ब्रह्मध्वज नमस्तेSस्तु  सर्वाभीष्ट फलप्रद ।

प्राप्तेSस्मिनवत्सरे नित्यं मद् गृहे मंगलं कुरु ।।

    गुढीपाडव्याच्या दिवशी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या प्रतीकात्मक अर्थांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ‘शास्त्रीय नजरेतून गुढीपाडवा’ हा लेख नक्की वाचा.

One thought on “गुढीपाडवा

  1. गुढीपाडवा या हिंदू नव वर्ष दिनी आपण एक अत्यंत स्तुत्य उपक्रम सुरू केला त्या बद्दल आपले हार्दिक अभिनंदन .भारतीय सण व परंपरा याबाबत आपण माहिती देणार आहात.गुढीपाडवा या सणाची माहिती आपण उत्तम दिली आहे .त्याचप्रमाणे यापुढील सण व परंपरा याबाबत ही माहिती आपणाकडुन मिळेल अशी अपेक्षा आहे .आपणांस खुप शुभेच्छा.

Comments are closed.

Theme: Overlay by Kaira