शास्त्रीय नजरेतून गुढीपाडवा

    गुढीपाडव्यामागील ऐतिहासिक संदर्भांसाठी, त्यासंबंधी सांगितल्या जाणाऱ्या कथांसाठी आणि हा सण साजरा करण्याच्या पद्धतीविषयी आपण माहिती पाहिली ‘गुढीपाडवा’ या लेखात. आता जाणून घेऊयात गुढीपाडव्याच्या दिवशी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या प्रतीकात्मक अर्थांविषयी!

    सध्या हिंदू सणांच्या बऱ्याचशा प्रथांना अनावश्यक कर्मकांड म्हणून हिणवण्याची वृत्ती दिसून येते. ज्या समृद्ध हिंदुस्थानाने हजारो वर्षे परकीय आक्रमणे सोसली, अनेक मौल्यवान गोष्टी देशाबाहेर नेऊनही तो आजही समृद्धच आहे. या समृद्ध भारतकडे जगाची नजर परत परत वळतेच आहे. भारताने जपलेली समृद्ध संस्कृती, त्याच्या विविधतेमधील एकता हेच यामागील कारण आहे. भारतामध्ये कोणताही सण साजरा करताना काही प्रथा परंपरांचे अगत्याने पालन केले जाते. त्यामधील प्रत्येक गोष्टीला प्रतीकात्मक अर्थ आहेत. कोणत्याही गोष्टीचा प्रतीकात्मक अर्थ, कार्यकारणभाव समजून न घेता आपल्या समृद्ध संस्कृतीला आपणच कर्मकांड, थोतांड म्हणून हिणवणे नक्कीच स्पृहणीय नाही.

    जेव्हा आपण प्रतीकांच्या मुळाशी जाऊन विचार करतो तेव्हा भारतीयांच्या कल्पनाशक्तीचे कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. गुढीपाडव्याच्या निमित्ताने अशाच काही प्रतीकांचा शास्त्रीय दृष्टीने घेतलेला परामर्श :

वसंत ऋतू:

   सृजनाचा मानला जाणारा हा ऋतू मानवी मनाला हर्ष, उल्हास प्रदान करतो. किंचितशी उबदार हवा मानवाच्या शरीरात भरलेला आळस दूर करते. शरीराचे जडत्त्व दूर करून चैतन्याचा संचार हा ऋतू घडवून आणतो. कोणत्याही सृजनाचे मूळ चैतन्यच असते. नवचैतन्यच्या या ऋतूचे औचित्य नववर्षदिनाच्या रूपाने करणे उचितच.

गुढीसाठी वापरण्यात येणारी काठी (बांबू) :

   गुढीसाठी जेव्हा बांबूची काठी वापरली जाते तेव्हा भारतीयांच्या समर्पक प्रतीकात्मकतेचे कौतुक वाटते.

  • बांबूचे नाव ‘वंश’ आहे. गुढीची ही मंगल परंपरा पिढ्यानपिढ्या चालावी हा उद्देश यामागे आहे. 
  • मानवी जीवनात जन्मापासून ते मृत्यूपर्यंत प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्याचा बांबू साक्षीदार आहे. 
  • बांबूचे ‘वेणू’ हे नाव तुमचे जीवन मधुर, संगीतमय असावे हे सुचवते. 
  • कोणत्याही वातावरणात सहजपणे रुजून उंच वाढणारा बांबू, जीवनात कोणत्याही परिस्थितीत तग धरून तुम्ही देखील उंच ध्येयाकडे वाटचाल करा असे सांगतो. 
  • मुळे जमिनीत राहून उंच उंच आकाशाकडे वाढणारे बांबूचे रोप, तुमचे पाय कायम जमिनीवर राहून उच्च इच्छा, आकांक्षा तुम्ही पूर्ण कराव्यात हे सुचवते. 
  • भगवान बुद्ध, तसेच जपानी झेनपंथीय बांबूच्या वनात ध्यान करणे पसंत करत होते. 
  • आजही फुगीर खोड असणाऱ्या बांबूच्या जातीला Buddha’s Belly असे म्हणतात. 
  • सध्या सर्वत्र आढळणारे ‘लकी बांबू’ रोपे उन्नती आणि विकासाचे प्रतीक मानतात. त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याची तसेच तणाव दूर करण्याची क्षमता असते. 
  • बांबूच्या पेरामध्ये आढळणारा सिलिकायुक्त पदार्थ (वंशलोचन, तबशीर) अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरतात. 

   ही अगदी ठळक जाणवणारी वैशिष्ट्ये! तपशीलाने पाहायला गेल्यास अशी खूप आहेत.

कडुनिंब :

   पृथ्वीवरील अमृततत्त्व लाभलेला हा वृक्ष कडुनिंब रक्तातील दोष दूर करतो तसेच शरीराला शीतलता प्रदान करतो. उन्हाळ्याच्या सुरुवातीला होणारे काही उष्णतेचे विकार, जसे की गोवर, कांजिण्या, घामोळे यावर कडुनिंब अत्यंत प्रभावी औषध ठरतो. उन्हाळ्यामध्ये वाढणारे पित्त कडुनिंबामुळे कमी होते. या वृक्षाचे प्रत्येकच अंग औषधी आहे. याची फळे लिंबोण्या एक उत्कृष्ट कीटकनाशकाचे काम करतात.

साखरगाठी :

    उन्हाळ्यामध्ये वरचेवर येणाऱ्या घामामुळे शरीरामध्ये पाण्याची, खनिजद्रव्यांची कमतरता जाणवते. यामुळेच ऊर्जादेखील खालावते. काही खाण्याची इच्छा होत नाही आणि काही खाल्ले तरी ऊर्जेच्या ऐवजी सुस्ती जाणवते. अशावेळी ही साखरगाठी येते. ताबडतोब ऊर्जा प्रदान करणारी आणि सहजपणे कुठेही घेऊन जाता येणारी ही साखरगाठी कृत्रिम पेयांपेक्षा स्वस्त आणि मस्त काम करते. ही गाठी तयार करताना शुभ्रतेसाठी लिंबाचा रस वापरतात. गाठीमधील हा लिंबूरस ताजेपणा पुरवतो त्याचबरोबर सी व्हिटॅमिन देखील पुरवतो.

रेशमी वस्त्र :

    रेशमी वस्त्रामधील कार्यरत असणारी स्थितिज ऊर्जा (static electricity) वातावरणातील सकारात्मक लहरी खेचून घेते आणि आपल्याला पुरवते.

धातूचा कलश : 

    मानवी जीवनावर सकारात्मक परिणाम करणारी सूर्याची किरणे धातूचा कलश शोषून घेतो. कोणतेही काम जेव्हा पूर्णत्वाला जाते तेव्हा ते कळसास गेले असे आपण म्हणतो. नववर्षाच्या शुभदिनी जे संकल्प आपण करतो ते पूर्णत्त्वास जावे हे दर्शवणारा हा कलश. संकल्पाचे प्रतीक संपूर्ण गुढी तर कार्यपूर्तीचे प्रतीक कलश.

    प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाऊन पाहिल्यास त्याचा कार्यकारणभाव लक्षात येतो. कोणतीही गोष्ट अंधविश्वासाने करण्यापेक्षा डोळसपणे त्याला शास्त्राधार काय आहे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यास आपल्या बहुमूल्य संस्कृतीमधील गाभ्याचे रक्षण होईल.

    विविध भारतीय सणांविषयी, त्यांच्या इतिहासाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ‘भारतीय सण’ या विभागातील लेख नक्की वाचा.

2 thoughts on “शास्त्रीय नजरेतून गुढीपाडवा

  1. अभिनंदन … गुढीपाडवा या सणाची खूप छान माहिती मिळाली. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  2. चांगली माहिती. माहिती देताना वैज्ञानिक दृष्टिकोन व निर्विवाद माहिती असावी. इंग्रजी अर्थ देण्याची आवश्यकता नाही. वातावरणातील सकारात्मक लहरी अवैज्ञानिक शब्दप्रयोग वाटतो. उपक्रम चांगला आहे खूप खूप शुभेच्छा.

Comments are closed.

Theme: Overlay by Kaira