व्यासपौर्णिमा (गुरुपौर्णिमा)

   आषाढी एकादशी होऊन गेली. जगत्पालक श्री विष्णू निद्राधीन झाले. आता हा प्रपंच कोणी सांभाळायचा? ज्ञानी लोक पुढे सरसावले. गुरुपौर्णिमा म्हणजेच व्यासपौर्णिमा. या दिवसाला भारतीयांच्या मनात एक वेगळेच आदरयुक्त ,श्रद्धेचे स्थान आहे. महाभारत चार वेद, सहा शास्त्रे, अठरा  पुराणे यांची रचना करून समस्त लोकांना व्यासमुनींनी ज्ञानी करून सोडले.याना भारतीय संस्कृतीचे शिल्पकारच म्हणायला हवे. कोणतेही ज्ञान प्रथम व्यासांनी दिलेले असल्यानेच ‘व्यासोच्छिष्टम जगत्सर्वंम ‘ म्हटले जाते. ज्ञानाने मानवी जीवन समृद्ध करणाऱ्या व्यासमुनींच्या कृतद्न्यतेपोटी हा दिवस व्यासपौर्णिमा (गुरुपौणिमा) म्हणून साजरा करतात.

   जन्मतःच प्रत्येक जीव परावलंबी तसेच असहाय असतो. सर्व गोष्टी कोणीतरी शिकविल्यानंतरच तो शिकतो. ही  शिकण्याची प्रक्रिया जन्मापासून मृत्यूपर्यंत अखंड चालूच असते. उत्क्रांती प्रक्रियेत सुरवातीला मानव आणि इतर प्राणी समान पातळीवर होते. परंतु मानवी मेंदू वेगाने अतिप्रगत झाला आणि त्याला कोS हं असा प्रश्न सतावू लागला. चौऱ्यांशी लक्ष योनींनंतर मिळालेला मानव जन्म, त्याचे रहस्य ,मृत्यूनंतरचे जीवन या सर्वांबद्दल त्याच्या मनात संभ्रम निर्माण झाला आणि मानवी जन्माचे सार्थक कशात आहे याचे उत्तर तो शोधू लागला. जन्म ते मृत्यू या दोन टप्प्यांमधील ऊर्ध्व दिशेने करावयाचा आत्मिक प्रवास पूर्ण करण्यासाठी त्याला योग्य मार्गदर्शकाची गरज पडली. याच वेळी सद्गुरूंनी हाताला धरून संसारसागरातून पैलतीराला जाण्याचा मार्ग दाखविला. गुरु तसे मुख्य दोन प्रकारचे असतात – गुरु आणि सद्गुरू.

   जो जो ज्याचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाण’ श्री दत्तगुरूंनी व्यक्तीला गुरु न मानता परिसरातील प्रत्येक चांगला गुण  स्वीकारला. असे २४ गुरु त्यांनी केले ,परंतु असे विद्या शिकवणारे गुरु वेगळे. त्यांच्यामुळे आपण जीवन जगायचे कसे हे शिकतो, हा जीवनसागर पार करून पुढील प्रवासासाठी फक्त सद्गुरूच समर्थ असतो. अशा विद्यागुरुंचे अनेक प्रकार श्री दासबोधात समर्थ रामदासांनी स्पष्ट केले आहेत.  सदगुरु ही व्यक्ती नसून तत्त्व आहे, एक चैतन्यशक्ती आहे. सद्गुरुंचे देखील पृच्छक गुरु, वंदन गुरु,अनुग्रह गुरु, कर्म गुरु, विचार गुरु, वात्सल्य गुरु, स्पर्श गुरु असे प्रकार आहेत. 

   गुरूचा अर्थ पहिला तर ‘ग’कार म्हणजे सिद्ध,  ‘र ‘कार हा पापाचे दहन करणारा, तर ‘उ’कार हा श्री विष्णूचे अव्यक्त रूप मानतात. पौर्णिमा म्हणजे प्रकाश, गुरूने दिलेल्या ज्ञानाच्या प्रकाशाची शिदोरी शिष्याला भवसागर पार करून नेते. 

ध्यानमूलं गुरोरमुर्ती, पूजामूलं गुरू पदमम | 

मंत्रमूलं गुरोरवाक्याम, मोक्षमुलं गुरो: कृपा || 

या श्लोकातच गुरुतत्त्वाचे सर्व सार आहे 

   ज्याप्रमाणे कोणतेही शिक्षण घेण्यासाठी त्या क्षेत्रातील वाकबगार व्यक्ती गुरु असते त्याचप्रमाणे ‘आत्मज्ञान’ प्राप्त करून घेण्यासाठी आत्मज्ञानी सद्गुरूची गरज असते. बाकी विद्या आपल्याला दृश्य स्वरूपात दिसतात परंतु आत्मज्ञान ही अनुभूतीची गोष्ट असल्याने खरा सद्गुरू मिळणे फार भाग्याचे असते. पुस्तकी ज्ञानापेक्षा जाणत्या अनुभवी व्यक्तीकडून प्राप्त होणारी विद्या जास्त परिणामकारक तसेच अक्षय असते.  सामान्य माणसाला अज्ञात असणारा परमार्थासारखा गहन विषय सद्गुरू आईच्या मायेने समजावून सांगतात.

   सद्गुरूंना नेहमी परिसाची उपमा देतात पण परीस लोखंडाला सोने बनवतो तो दुसरा परीस नाही तयार करत! सद्गुरू मात्र शिष्याला आपल्यसारिखे करून सोडतात. आत्मज्ञानाअभावी मानवाकडून घडणारी कृत्ये त्याला जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात अडकवतात. अशा वेळी सद्गुरू ब्रह्मज्ञान शिकवितात आणि सतशिष्याला आपल्या पातळीवर नेऊन त्याचा उत्कर्ष घडवून आणतात. सद्गुरू ब्रह्मज्ञानी आणि परमात्म्याशी एकरूप झालेले असतात. परमात्म्यासारखी अतिन्द्रीय,अचिंत्य,अदृश्य आणि गूढ परंतु दुर्लभ वस्तू शिष्य फक्त सद्गुरुंच्या मार्गदर्शनाने मिळवितो. सद्गुरुंच्या ठिकाणी मानवता आणि दिव्य ईश्वरता यांचा अनोखा मिलाफ झालेला दिसून येतो. सजीवांमधील ईश्वरी अंशास सद्गुरू बरोबर हेरतात. जीवा- शिवामधील द्वैत नष्ट करून अविद्येच्या, अशाश्वताच्या पसाऱ्यातून सद्गुरू शिष्याची सुटका करतात. ते स्वतः देखील एका शाश्वत ईश्वराशिवाय दुसरे काही बोलत नाहीत. शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती यांचा संगम सद्गुरू ठायी आढळून येतो.

   काही अज्ञानी जीव सद्गुरुंच्या  कृपेविना निम्नस्तरीय साधना तसेच उपासना करतात परंतु अशा कर्मकांडामुळे परमार्थही साधत नाही तसेच भगवंत प्राप्तीच्या रहस्यापासून ते दुरावले जातात. आपल्या भारत भूमीमध्ये अनेक थोर ज्ञानी महात्मे होऊन गेले, तरी सामान्य जनांमध्ये लोक अजूनही चमत्काराशिवाय नमस्कार करीत नाहीत, अशा लोकांना परमेश्वर प्राप्तीची खरी ओढ देखील नसते. जो मोठा चमत्कार करून दाखवेल तोच मोठा साधू ,ज्ञानी! भारतीय समाजामधील हा गैरसमज भारताच्या अध्यात्मिक क्षेत्राला असणारा शाप आहे. स्वघोषित गुरूंनी सध्या सर्वत्र देवत्वाचा बाजार मांडला आहे, अशा भोंदू बाबांच्या नादी लागल्या मुळे जनता आळशी तसेच अंधश्रद्धाळू होताना दिसत आहे. असे नामधारी गुरु देव आणि भक्त यांच्यामध्ये फूट पाडत आहेत. योगसाधनेच्या आहारी गेलेल्या साधकांस अनेक सिद्धी जरी प्राप्त झाल्या तरी सदगुरुविना तो आत्महित साधू शकत नाही.

   सद्गुरू जीवाची तळमळ शांत करतात. ईश्वरदर्शन घडवितात. सद्गुरुंच्या शब्दामागे त्यांच्या तपश्चर्येचे मोठे सामर्थ्य असते. गुरूंचे शब्द जीवाचे सूक्ष्म रूप छेदतात आणि त्याची अंतरंग रचना बदलतात. अज्ञानी जीवाला वरच्या पातळीवर उचलून ईश्वरासमीप नेतात आणि म्हणूनच ब्रह्मा विष्णू महेश देखील सद्गुरुचरणी लीन असतात. 

   चला तर मग मानव्याच्या दिशेने एक पाऊल  पुढे टाकू आणि खऱ्या ईश्वरदर्शनाची आस ठेऊन सद्गुरूंना शतश :वंदन करू. जय गुरुदेव !!!!

Theme: Overlay by Kaira