लोककलाकारांमधील ‘चित्रकथी’ हा प्रकार आजघडीला अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे. परंतु शिवाजी महाराजांच्या काळात गुप्तहेर म्हणून काम करणारे काही हरहुन्नरी लोक, त्यांच्या अंगी विविध कौशल्ये असत. चर्मकथी, कळसूत्री, पांगुळ बैल, पोतराज, गोंधळी, पिंगळा, वासुदेव, फुगड्या, पोवाडे अशा अनेक कलांमध्ये हे गुप्तहेर वाकबगार असत. ही अशी निरनिराळी कामे करत असतानाच गुप्तहेराची कामगिरी पार पाडीत. राजाश्रय असताना या लोकांचा अंगात जाकीट,डोक्याला फेटा असा डौलदार पोशाख असे. राजाश्रय संपल्यानंतर मात्र यांनी भिक्षेकरी जीवन स्वीकारले. महाराष्ट्रामध्ये कर्जत,श्रीगोंदा, अहमदनगर ,नेवासा ,राजुरी या ठिकाणी चित्रकथी दिसून येतात. परंतु समृद्ध अशा निसर्गसंपन्न तळकोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यामधील पिंगुळी या गावातील आदिवासी ठाकर समाज ‘चित्रकथी’ ही पारंपरिक कला जोपासत आहे.
आदिमानवाने चित्ररूपाने संवाद साधला. त्याचे भाषेचे आदि संप्रेषण चित्राद्वारे झाले. प्राचीन गुहांमधील चित्रे तसेच काही ठिकाणी खडकांवर कोरलेली कातळशिल्पे यांची साक्षीदार आहेत. अनेक लेण्यांमधून तसेच बौद्ध मठांमधून बौद्ध धर्मातील अनेक प्रसंग रंगीबेरंगी चित्रांच्या माध्यमातून रंगविलेली दिसून येतात. स्थिर चित्रे अथवा पट दाखवून कथा सांगण्याची परंपरा प्राचीनआहे. वैदिक, बौद्ध,जैन वाङ्मयात अनेक ठिकाणी चित्रांचे पट (कापड रंगवून त्यावर रंगीत चित्रे काढणे, प्रसंग रेखाटणे) असल्याचे उल्लेख सापडतात. साधारणतः ११व्या शतकापासून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येणारी चित्रे (सेट) याद्वारे कथा कथा/गायन करण्याची परंपरा दिसून येते. कथानिवेदनाचे वेगवेगळे प्रकार असून प्रकारानुसार कथा सांगण्याचे, निवेदनाचे तंत्र बदलते. पौराणिक कथा कथेकरी सांगतात तर बोधकथा संवादरूपात समोर येतात. अद्भुतकथा, परीकथा निवेदन केल्या जात. तसेच दैवतकथा निवेदनाभोवती श्रद्धा,पवित्रता यांचे वलय असे. चित्रांच्या आधारे कथाकथन अथवा गायन सादर करणारे ठाकर आदिवासी ‘चित्रकथी’ कलाप्रकार सादर करतात.
भिक्षुक असणारे हे लोक,यांनीही इतर भिक्षुक जातींप्रमाणे वतनाची गावे वाटून घेतली असून आपल्या हक्काच्या गावात चित्राच्या साहाय्याने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या नायकांच्या पौराणिक कथा सादर करतात. कालानुरूपया व्यवसायास उतरती कळा लागल्याने बऱ्याच जणांनी मूळ व्यवसाय बदलून नवीन व्यवसाय स्वीकारला असला तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पिंगुळी या गावातील आदिवासी ठाकर समाजाने हा व्यवसाय खऱ्या अर्थाने जोपासला आहे. येथील परशुराम गंगावणे यांनी अनेक हालअपेष्टा सहन करीत या व्यवसायाचे जणू पुनरुज्जीवन केले आहे.
चित्रकथींमधील ठाकर, हरदास, सरोदे, वऱ्हाडी ही तशी मुख्य कुळे. त्यापैकी पिंगुळी येथील ठाकरांच्या दोन कथा सांगतात. एक म्हणजे हे मूळचे पिंगुळीचेच,सावंतवाडीच्या सावंताचे आश्रित. तर दुसरा प्रवाद असा की हे मूळ राजस्थानचे, सावंताबरोबर सावंतवाडीत आले. वंशपरंपरेने कलावंत असणारी ही मंडळी आजही चित्रांच्या आधारे कथा गायन करतात. यांचे बगडी ठाकर आणि दगडे ठाकर असे दोन मुख्य प्रकार आहेत. त्यापैकी बगडी ठाकर चामड्यावरील चित्रांच्या साहाय्याने छायानाट्य सादर करतात ,त्यांना चर्मकथी असे म्हणतात. याच चित्रकथींमध्ये बाहुल्याचे खेळ सादर करणारे बाहुलेकार देखील असतात.
वर्णकै: सह यो वक्ति चित्रकथको वर|
गायक यव गायन्ति विना तालैर्मनोहरम ।।
अर्थातच वर्णकांच्या (चित्रांच्या) साहाय्याने जो कथाकथन करतो तो श्रेष्ठ चित्रकथक होय. या श्लोकात सांगितल्याप्रमाणे चित्रकथी खरे तर तालाविना गात नाहीत त्याच्या कथनात चित्र,गीत,वाद्य यांचा मनोहारी त्रिवेणी संगम झालेला दिसून येतो.
त्यांच्या सादरीकरणाला ‘पोथीवाचन’ म्हणतात. अगदी स्थानिक भाषेत लोक त्याला’ पोथी सोडणे‘ म्हणतात. या पोथीमध्ये ३० ते ५० चित्रे एकत्र ठेवलेली असतात. त्याला ‘ पोथी बांधणे’ असे म्हटले जाते. एका कापडी चौकोनी तुकड्यात (रुमाल) ही पोथी एका चॉकलेटी दोरीने बांधली जाते. ही दोरी कापडी किंवा चामड्याची असते. ज्या लाकडी फळीवर ही पोथी ठेवतात त्याला ‘बांध’ म्हणतात. विशेष म्हणजे या पोथ्या अक्षर स्वरूपात लिहीलेल्या नसतात तर साधारण अठरा इंच लांब आणि बारा इंच रुंद अशा कागदावर नैसर्गिक रंग वापरून मनमोहक चित्रे काढलेली असतात. या चित्रांना अत्यंत पवित्र मानले जाते. प्रत्येक चित्रामध्ये देवाचा प्रत्यक्ष वास असल्याची समजूत असल्याने विधीप्रसंगी या चित्रांची देवाप्रमाणे पूजा केली जाते. या चित्रासोबतची त्यांची वर्तणूक देवाप्रमाणे असते. खराब झालेले चित्र देखील जाळून टाकून त्याची राख पाण्यात वाहवली जाते. तत्पूर्वी जुन्या चित्रातील देवाच्या चैतन्याची नवीन चित्रात प्राणप्रतिष्ठा केली जाते. पूर्वी ही चित्रे पानावर काढली जायची,परंतु नंतरच्या काळात बापू महाराजांनी त्यांना कागद उपलब्ध करून दिला. महाराष्ट्रामध्ये या चित्रकथी पोथ्यांची चित्रे आजही आपण पिंगुळी गावातील चित्रकथींकडे पाहू शकतो. या चित्रांमधील पात्रे एकदम ठळक आणि गडद रंगात रंगविलेली आहेत. यामधील पात्रांचा वैशिष्ट्यपूर्ण महाराष्ट्रीयन पोशाख. अंगावरील दागदागिने. त्यांच्या बसण्याच्या पद्धती मनोहर आहेत.
या पोथ्यांचे त्यांच्याकडे विशिष्ट संच असतात,आणि त्यामधील चित्रे दाखवून कथाकथन केले जाते. अशा कथनांमध्ये निरनिराळी आख्याने सांगितली जातात. रामायण, महाभारत सर्वात आधी चित्रस्वरुपात प्रकाशित झाले. परंतु त्याचबरोबर बभ्रुवाहन, सीताहरण, शिवाला मोहीनी घालणारी भिल्लीण,हरिश्चंद्र तारामती, द्रौपदी वस्त्रहरण अशी अनेक आख्याने सांगितली जातात. चित्रांमधील कथा जी निवेदनाच्या स्वरूपात सांगितली जाते ती केवळ मौखिक परंपरेने जतन केलेली असते, लेखनबद्ध नाही.
गणेशोत्सव तसेच नवरात्रीमध्ये हे लोक पोथ्या सांगतात. त्यांच्या सादरीकरणामध्ये वाचिक,आंगिक सात्विक लय असते. पोथीमधील पुराणकथा पदबंधातून सादर करताना प्रत्येक पदबंधावर निरूपण, डाव्या हातात मंजिरी, उजव्या हाताने वीणावादन करीत कथाकार चित्रे बदलतो. या चित्रांना अनुसरून निरूपण, गायन आणि संवाद याद्वारे कथाकार उत्स्फूर्त परंतु सहज असे कथन करतात. यामध्ये रिद्धी, सिद्धी सहीत श्री गणेशाचे आगमन, सरस्वतीचे आगमन, सरस्वतीकडून उपदेश आणि त्यानंतर मूळ कथानक असा क्रम असतो. चित्रकथीचे सादरीकरण गणेशोत्सव तसेच नवरात्र अशात होत असले तरीही नवरात्रामध्ये याचे विशेष महत्व आहे. नवरात्रीला फक्त पंचमी व्यतिरिक्त चित्रकथीचे सादरीकरण ठराविक मंदिरांमधून विधिपूर्वक केले जाते. चित्रकथी सादरीकरणात पूर्वी स्त्रियांचा सहभाग नसे. परंतु आजच्या काळात गंगावणे कुटुंबातील स्त्रियादेखील सादरीकरणासाठी मदत करीत आहेत.
चित्रकथी सादर करण्यासाठी किमान तीन व्यक्तींचा गट असतो. रात्रीच्या वेळी देवळाच्या सभामंडपामध्ये याचे सादरीकरण करतात. यावेळी सादरकर्त्यामधील प्रमुख सादरकर्ता देवळाच्या मंडपात देवाकडे तोंड करून ,देवाचे मुख स्पष्ट दिसेल अशा रीतीने बसतो. त्याचे साथीदार त्याच्या डाव्या उजव्या बसतात. कार्यक्रम पाहण्यासाठी आलेली मंडळी त्यांच्या भोवती बसतात. यातील प्रमुख सादरकर्त्यास ‘नायकी ‘असे संबोधले जाते. या नायकीच्या उजव्या हातात वीणा तर दुसऱ्या हातात टाळ असतात. त्यांच्या साथीदारांच्या हातात हुडुक (छोटे डमरू) असते. पिढ्यानपिढ्या चित्रकथी हीच तीन वाद्ये निदानाच्या वेळी वापरतात. आजतागायत त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. निवेदन करावयाची पोथी नायकीच्या उजव्या हाताशी ठेवलेली असते. ही पोथी एका लाकडी फळीवर ठेवली जाते जेणेकरून कार्यक्रमासाठी आलेल्या लोकांना दुरूनदेखील दर्शन होईल. उजव्या हाताने वीणेचे मधुर स्वर छेडीत डाव्या हाताने नायकी चित्रे दाखवतो. वेळी त्याचे साथीदार तालवाद्याची साथ देऊन वातावरण भारून टाकतात.
पोथीला सुरुवात करण्यापूर्वी देवळाचा पुजारी गाभाऱ्यातून निरंजन आणून गणपतीच्या चित्राला ओवाळतो. ही निरंजन या वेळी तेवलेली नसते. ती तशीच ओवाळली जाते. चित्रकथी सादर करतानाचे सर्व संवाद नायकीचे स्वनिर्मित असतात. निवेदनाच्या अगदी सुरवातीला नायकी ‘कविजन ‘हे काल्पनिक पात्र रंगवितो. बुद्धीची देवता श्री गणेश आणि विद्येची देवता सरस्वती याना आवाहन करून त्यांचे आशीर्वाद घेऊन नंतर मुख्य कथानकास सुरवात होते!
हा कविजन गणपतीला वंदन करून प्रार्थना करतो,
दे पायाची जोड । मोरया दे पायाची जोड|
तुजविण कवणा शरण मी जाऊ ।
नाम तुझे बहुगोड ।मोरया दे पायाची जोड ।।
अथवा
देव गजानन रे पाबंधु देव गजानन रे।
देव गजानन गौरीनंदन मूषकवाहन रे।
पाबंधु देव गजानन रे।
अतिशय मधुर, सुश्राव्य परंतु लोकगायनाचा बाज असणारी ही प्रार्थना आपले मन तृप्त करते. गणपती आवाहन,प्रार्थना झाल्यानंतर सरस्वतीला आवाहन केले जाते.
विश्वजननी गं अंबाबाई माउले गं आई।
अहो भक्तापाशी उचलून बालकासी कडेवर घेसी ।।
तू आजशक्ती विश्वजननी गं अंबाबाई।
प्रत्येक चित्राचे नुसते वर्णन करायचे तर ते तांत्रिक ,एकसुरी वाटते, चित्रकथनामधील हादोष दूर करण्यासाठी नायकी स्वतःच्या शब्दामध्ये सादर चित्राचे बहारदार वर्णन करतो. काही प्रसंग कल्पनेनुसार रसदारपणे वर्णन करतो.अशामुळे श्रोते कथा ऐकताना तल्लीन होऊन जातात. निवेदनामधील कृत्रिमपणा दूर होतो, निवेदनाला एक प्रकारचा जिवंतपणा प्राप्त होतो. अशा प्रकारे स्वतःच्या भाषेतील प्रसंगाचे वर्णन करण्याला ‘भाकडी’, ‘भाकडकथा’ असे म्हटले जाते. अशा कथनाची प्रत्येक नायकीची एक स्वतंत्र शैली असते, भाषा असते जी व्यक्तिगणिक बदलते. या भाकडीच्या मदतीने एखादा भावुक प्रसंग हुबेहूब समोर मांडण्यात चित्रकथी यशस्वी होतात आणि कार्यक्रमाचे सादरीकरण वेगळीच उंची गाठते. सादरीकरणाची समाप्ती करताना गाभाऱ्यातून तेवती निरंजन आणले जाते, हे निरंजन गणपतीच्या चित्राला ओवाळल्यानंतर कार्यक्रम संपतो.
लोकांसाठी लोकांकडून सादर केल्या जाणाऱ्या या लोककलेचा वारसा जपून ठेवणाऱ्या ठाकर समाजाची जीवनपद्धती देखील वैशिष्टयपूर्ण आहे. यांच्यामध्ये पंच मंडळाच्या साक्षीने फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातच विवाहसंबंध जोडले जातात. जन्म, लग्न मृत्यू अशा प्रसंगी सर्वाना मोहाची दारू वाटली जाते. कोणताही प्रसंग साजरा करण्यासाठी मोहाची दारू हा अविभाज्य घटक असतो. चित्रकथी, कळसूत्री बाहुल्या, पारंपरिक गाणी असे कार्यक्रम लग्नात असतात. ‘राधानृत्य’ या प्रकाराला लग्नामध्ये खूप मान असतो. मंगल प्रसंगी ‘हीरोबाची’ पूजा मांडली जाते. मोरपिसांचा हीरवा कुंचा हाच त्यांचा ‘हीरोबा’! त्यालाच’ हीरवा देव‘ देखील म्हणतात. ठाकर गोंधळी हातात मशाल घेऊन हीरोबाची पूजा करतात. हे लोक देवी उपासक असून नवरात्रामध्ये केळबाईच्या मंदिरात चित्रकथीचा कार्यक्रम रात्रभर चालतो. कार्यक्रमाच्या सुरवातीला ठाकर देवांचा घट मांडतात त्याला ‘मांड भरणे ‘असे म्हटले जाते.
चित्रांच्या माध्यमातून कथागायन /कथन करणारे लोक वेगवेगळ्या प्रांतात आहेत. राजस्थानमध्ये याना ‘भोपा’ म्हणतात. पाबूजी या देवतेचे भक्त असणारे हे कलाकार पाबूजींच्या कथांवर आधारित ‘पाबूजी का फड’ असा कार्यक्रम सादर करतात. याला ‘फड वाचणे’ असे म्हणतात. गुजरातमधील ‘गरोडा’ कृष्ण लीलेच्या कथा सांगतात. कापडाच्या आडव्या पट्टीवर (पासोडी) रेखाटलेल्या प्रसंगचित्रांच्या साहाय्याने हे कथन केले जाते. बंगाल मधील ‘ पटुआ’, तेलंगणातील ‘चित्रपट’, महाराष्ट्रातील ‘गोल्ला’ ही त्यांची काही उदाहरणे!
कथानुरूप तयार केलेल्या चित्रानुसार निरूपण करण्याची आणि संवाद साधण्याची अनुपम हातोटी असणारी ही कला आता ओहटीस लागली आहे. आजच्या संगणकीय युगात उदबोधन, रंजन करणारी पारंपरिक माध्यमे त्याच्याशी संबंधित कलांचे सादरीकरण लोप पावत आहे. मूळचा व्यवसाय बंद केल्यानंतर आता हे लोक इतर कलांचे सादरीकरण करत आहेत. नंदीबैल, गोंधळी,पांगुळ अशा समांतर कलामध्ये आपले नशीब आजमावून पाहता पाहता या कला जिवंत ठेवीत आहेत. ही सर्वांगसुंदर कला पिंगुळी मध्ये आजही तग धरून आहे.परशुराम गंगावणे, चेतन गंगावणे या कलेच्या अस्तित्वासाठी जीवाचे रान करीत आहेत. पिंगुळी येथीलठाकर आदिवासी कला केंद्रामध्ये खास आदिवासी उपकरणे, वाद्ये, पोशाख, हीरोबा, चित्रकथीसाठी वापरली जाणारी चित्रे आजही आपण पाहू शकतो.
पूर्वापार चालत आलेली ही पारंपरिक कला जपत असतानाच त्यांनी काळाबरोबर पुढे पाऊले टाकण्यास सुरवात केली आहे. पौराणिक विषयांबरोबरच त्यांनी आता आजच्या काळातील सामाजिक विषयांवर बाहुल्यांचे खेळ सुरु केले आहेत. त्यामध्ये स्त्रीशिक्षण ,हुंडाबळी, बालकामगार ,लाचखोरी, बेकारी, कोविड १९ असे अगदी नवीन पण महत्त्वाचे असे विषय हाताळले आहेत. कलेचा पारंपरिक बाज जपतानाच ही मंडळी बदलत्या माध्यमाला यशस्वीपणे सामोरे जात आहेत. आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावून सोशल मीडियावर अवतीर्ण होत आहेत. परंपरा जपतानाच त्यांनी स्वतःमध्ये घडवून आणलेलं हे परिवर्तन नक्कीच स्पृहणीय आहे.
www.pingulichitrakthiart.com हे त्यांचे माहितीस्थळ असून त्यांनी स्वतःचे अधिकृत फेस बुक पेज देखील निर्माण केले आहे. पिंगुळी येथील ठाकर आदिवासी कला अंगण (TAKA) येथे चित्रकथी माहिती आणि हस्तकला वस्तूंची विक्री केली जाते. धावपळीच्या या युगात अनेक मनोरंजन माध्यमांचा भडीमार होत असताना केवळ आपली कला आपली संस्कृती टिकवून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न होत आहे. आणि भारतीय परंपरांच्या मूल्याचे रक्षण केले जात आहे. यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या पिंगुळीमधील सर्व चित्रकथीचे खरच कौतुक वाटते. त्यांच्या या प्रयत्नांना सरकारने तसेच अभ्यासकांनी भरभरून मदत करावी हीच अपेक्षा !!
Original content here is published under these license terms: | X | |
License Type: | Read Only | |
License Abstract: | You may read the original content in the context in which it is published (at this web address). No other copying or use is permitted without written agreement from the author. |