मेघदूत

   आकाश गर्द काळ्या ढगांनी व्यापून गेले, आषाढाचा पहिला दिवस उगवला आणि जर एखाद्याला कालिदासाच्या मेघदूताची आठवण झाली नाही तर तो खरा भारतीय साहित्यरसिकच नाही. महाकवी कालिदासाने रचलेले हे खंडकाव्य आजही रसिक मनाला भुरळ घालत आहे, प्रेरणा देत आहे. 

   या अजरामर काव्याची रचना करणारा महाकवी कालिदास हा एक अभिजात संस्कृत लेखक, कवी, नाटककार! परंतु त्याच्या खाजगी, वैयक्तिक जीवनाविषयी अगदी नक्की असे फारसे कोणाला माहीत नाही. विशेषतः त्याचा जन्म, शिक्षण, कर्मभूमी या सर्व गोष्टींबाबत अत्यंत संदिग्धता आहे आणि याचमुळे त्याच्या संबंधी अनेक दंतकथा, आख्यायिका प्रसिद्ध आहेत. शकांचा पराभव करणारा राजा विक्रमादित्य याच्या पदरी तो राजकवी असावा असे मानले जाते तर काही जण तो राजा भोज  याच्या पदरी असल्याचा दावा करतात. पण खात्रीलायक कोणीही पक्के सांगत नाही. त्या काली त्या राजाची राजधानी उज्जयिनी असावी असे त्याच्या काव्यातून वारंवार जाणवते. तसेच त्याच्या साहित्य लेखनाचा काळ प्राचीन  भारतातील सुवर्णयुग, गुप्तांचा कालखंड म्हणजे अंदाजे चौथे ते सहावे शतक असा असावा असे अनेक जाणकारांचे मत आहे. कर्नाटकातील ऐहोळे येथील जैन मंदिर शिलालेखात कालिदासाचा उल्लेख आहे. त्याच्या साहित्यसंपदेचा विचार करता मालविकाग्निमित्र, शाकुंतल, विक्रमोर्वशीय ही  नाटके, कुमारसंभवम, रघुवंश ही महाकाव्ये आणि मेघदूत हे खंडकाव्य ठळकपणे डोळ्यासमोर येतात. इतर स्फुट लेखनही बरेच आहे.

   वर्डस्वर्थने म्हटल्याप्रमाणे त्याचे हे काव्य म्हणजे थांबवता न येणारा भावनांचा खळाळता प्रवाह आहे.  या काव्यातून प्रेमविव्हल विरही मनाची दिसणारी  नाजूक अवस्था आपल्या हृदयाची तर छेडून जाते. अनिवार्य प्रेमाची उत्कटता , विरहाची जीवघेणी व्यथा आपल्या काळजाचा ठाव घेते. मंदाक्रांता वृत्तात रचलेल्या या खंडकाव्याचा विप्रलंभ आणि शृंगार या दोन बाजू आहेत. चिरतरुण असणाऱ्या  पत्निविरहाने विरहित पतीची व्याकुळ अवस्था आपल्याला अस्वस्थ करते आणि या मनाच्या व्याकुळ अवस्थेत सचेतन अचेतन असे काही भान हरवून बसलेला यक्ष मेघाबरोबर तिला संदेश पाठविण्याचा जो काही प्रयत्न करतो तो केवळ चिरंतन अनुभूती देणारा असाच आहे.

   या काव्याची मध्यवर्ती कल्पना ‘पत्निविरहाने शोकग्रस्त झालेला यक्ष आषाढातील मेघाला आपला दूत बनवितो आणि त्यांच्याकरवी आपल्या प्रियतमेला संदेश पाठवितो’! नुसता संदेश पाठवितो असे नाही तर तिचे शुभवर्तमान परत येऊन सांगण्याची कामगिरी देखील सोपवितो, या सर्व आधुनिक जनांना अवास्तव ,अतिरंजित वाटेल अशा प्रवासात वाचक मात्र तरल, काव्यमय विश्वाची सफर अनुभवून तृप्त होतो. 

   कोणत्याही कथेला, काव्याला नायक हा असतोच. येथेही हा यक्ष या खंडकाव्याचा नायक आहे पण हा निनावी आहे, त्याला नाव नाही आणि नाव नाही म्हणून काही बिघडतही नाही. काव्याची सफर करतांना जाणवत राहते ती फक्त त्याची विरहव्याकुळ अवस्था आणि पत्नीचा वियोग संपून उरणारी मिलनाची आस.

हिमालयातील अंतर्भागात असणाऱ्या अलका नगरीचा  राजा कुबेर आणि त्याचा सेवक असणारा हा नवविवाहित यक्ष. यक्ष आपल्या नूतन पत्नीच्या सहवासात कुबेराने नेमून दिलेल्या कामात हलगर्जी करतो आणि नशिबी हद्दपारीची शिक्षा येते, ती देखील त्याच्या जवळील सिद्धींचा वापर करता येणार नाही या अटीवर.

   एकान्तवासासाठी दूर असणाऱ्या रामगिरी (आजचे रामटेक) डोंगरावर कसाबसा आठ महिन्याचा काळ निघून जातो. बिचारा यक्ष आपल्या प्रियतमेच्या आठवणीत खंगून जातो. अगदी हातातील सुवर्णकंकण गळून पडते त्याचे देखील त्याला भान नसते. वसंतऋतू निघून जातो, ग्रीष्म  तडाखा देऊन जातो, सर्व काही मुकाट्याने  सोसत असतानाच आषाढाचा प्रथम दिन उगवतो आणि सर्वत्र आषाढअभ्रांची गर्दी दाटून येते, आता मात्र यक्षाचा संयम सुटतो. हे जलदच आपला निरोप प्रियतमेला पोहोचवतील आणि तिचे शुभवर्तमानदेखील पुन्हा आपलयाला येऊन सांगतील अशी त्याला खात्री पटते. ढगांचे मानुषीकरण ही अतिरंजित, अवास्तव कल्पना एकदा का आपण स्वीकारली की पुढे उरते ते फक्त कालिदासाच्या दिव्य रसप्रवाहात डुंबत राहणे. 

   पूर्वमेघ आणि उत्तरमेघ अशा दोन खंडात विभागलेले हे काव्य, पूर्वमेघामध्ये रामगिरीपासून ते अलका नगरीपर्यंतचा  रस्ता यक्ष मेघाला सांगतो. मार्गावरील विविध खुणा, डोंगर, नद्या, अरण्ये, उपवने, नगरे, मंदिरे याचे वर्णन करताना ठराविक भागांमधील समाजजीवन यक्षनगरीचे अद्भुत वर्णन तो मेघाला सांगतो. नद्या, मेघ यांचे मानुषीकरण करून त्यांना नायक- नायिका म्हणून संबोधतो.

मेघाच्या या प्रवासात मध्ये उज्जयिनी नगरी  येत नसली तरीही मुद्दाम वाट वाकडी करून तो त्याला उज्जयिनीला जायला सांगतो. उज्जयिनीचे वास्तव रूप आणि अलकानगरीचे अद्भुत मनोहारी चित्रण याचा अनोखा संगम आपल्याला मोहवून टाकतो. मेघाला दूत बनविण्याची ही कालिदासाची संकल्पना यथार्थच होती.आषाढाचे मेघ गच्च पाण्याने भरून येतात आणि जाताना पूर्ण रिते होऊन जातात. ग्रीष्माच्या काहिलीनंतर त्याच्यातील ओलावाच आपल्याला सुखावतो, शांतावतो. या ढगांच्या प्रवासाला निश्चित अशी एक दिशा असते. विरहामुळे आपल्याप्रमाणे  व्याकुळ असणाऱ्या पत्नीचे मन थोडे तरी सुखावेल असे त्याला वाटते. वाऱ्यासारखा बेलगाम,छचोर दूत हे काम करूच शकला नसता.मेघाला दूत बनण्याची विनंती करताना कालिदास म्हणतो ,

संतप्ततानां त्वमसि शरणं तत्पयोद प्रियायाः ।।

संदेशं मे  हर धनपती क्रोधविश्लेशितस्य ।।

   अर्थातच, हे मेघा संतप्त आणि व्यथित जनांचा तू निवारा आहेस. माझ्या स्वामींच्या शापामुळे मी माझ्या प्रिय सखीचा विरह सहन करीत आहे, माझा निरोप माझ्या सखीपर्यंत पोचविण्याची मी विनंती करीत आहे. कालिदासाचे तरल संवेदनशील मन मेघाला बजावते की रात्रीच्या गडद अंधारात प्रियकराच्या भेटीसाठी निघालेल्या स्त्रियांची पावले अडखळतील तेव्हा विद्युल्लतेच्या मदतीने तू त्यांचा मार्ग उजळून टाक पण त्याच वेळी हेही लक्षात असू दे की या स्त्रिया भित्र्या आहेत. उगीच ढगांचा गडगडाट करू ,पाऊस पाडून त्यांना घाबरवू नकोस. निसर्गातील  निर्जीव मेघाला विनंती करून त्याच्याइतकीच विरहात दु:खी असणाऱ्या पत्नीला धीर देणारा निरोप देण्यास सांगतो 

    आषाढातील पाण्याने भरलेल्या मेघाचे वर्णन करताना तो म्हणतो,

आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लीष्टसानु

वप्रक्रीडा परिणत गजप्रेक्षणीय ददर्श ।।

त्याला हे आषाढअभ्र प्रचन्ड काळ्या हत्तीप्रमाणे डोंगराला धडक देत आहेत असे वाटते आहे. 

   चार चरणांची १११ कडवी असणारे हे काव्य मानवी मनातील तरल प्रेमाचा आणि विरहामुळे उद्भवणाऱ्या विरहवेदनाचा जिवंत आविष्कार घडविते. उत्तरमेघ या खंडात यक्ष आपल्या घराचे तपशीलवार वर्णन करतो.  तसेच आपल्या नाजूक विरही पत्नीचे देखील वर्णन करतो. या प्रसंगो तिची विरही मानवी प्रतिमा डोळ्यासमोर ठाकते.

    शतकानुशतकांनंतर देखील या काव्याची जनमानसावर अजून मोहिनी आहे. काळ बदलला ,संदर्भ बदलले,अनेक लोकांनी वेगवेगळ्या रुपामधून हे काव्य रसिकांसमोर आणले. परंतु त्याची खुमारी आजही ताजी आहे. त्याचे गारुड साहित्यरसिकांना भुलवित आहे.सी. डी.देशमुख यांनी या काव्याचे ‘ Cloud Messenger’  असे इंग्रजी रूपांतर केले आहे. आज या दोन्ही  संज्ञांना संगणक क्षेत्रात  विशिष्ट अर्थ असले तरीही ते निरोप्याचेच काम करीत आहेत!

साहित्य विश्वातील कालिदास  हा अढळ ध्रुवतारा तेजस्वीपणे झळकत आहे. आणि अद्वितीय प्रेमातून उद्भवलेल्या विरहवेदना चिरंतन करत असतानाच आपल्या प्रिय मेघाला “तुला तुझ्या प्रिय विद्युल्लतेचा विरह कधीही न घडो” अशी शुभेच्छा देत आहे.

Theme: Overlay by Kaira