कालिदासाचे गर्वहरण

Kalidas and Saraswati

    महाकवी कालिदास – एक प्रतिभावान संस्कृत महाकाव्ये रचणारा कवी. एकदा या विद्वान महाकवीला स्वतःच्या ज्ञानाचा खूप अहंकार झाला. त्याला वादविवाद स्पर्धेत कोणीही हरवू शकत नव्हते. गावोगावी फिरत विद्वानांच्या सभा जिंकत तो चालला होता. असेच एकदा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जात असताना दुपार झाली. उन्हाळ्याचे दिवस असल्याने कालिदास थकला होता. त्याला खूप तहान लागली होती. त्याला समोर एक झोपडी दिसली. त्या झोपडीसमोर एक विहीर होती आणि एक लहान मुलगी छोटी कळशी घेऊन पाणी भरीत होती. 

    तो तिथे गेला आणि त्या मुलीला बढाईखोरपणे सांगू लागला – “मी एक प्रसिद्ध विद्वान आहे, मी खूप मोठा आहे. ” तेव्हा ती मुलगी त्यास म्हणाली, “जगात दोनच गोष्टी मोठ्या आहेत, कोणत्या सांगा बरं?” तेव्हा कालिदास म्हणाला, “मला माहित नाही.” यावर त्या मुलीने सांगितले की, “अन्न आणि जल सर्वात मोठे आहेत. मी मी म्हणणारे सुद्धा वेळेवर अन्नपाणी मिळाले नाही की हतबल होतात, तुमचेच पाहा पाण्यावाचून कसे हाल झाले आहेत, खरेच तुम्ही कोण आहात ते नीट सांगा.” 

    तेव्हा कालिदास उत्तरला, “मी प्रवासी आहे. ” तेव्हा ती छोटी मुलगी म्हणाली की, “मला फक्त सूर्य आणि चंद्र हे दोनच प्रवासी माहित आहेत जे अखंड प्रवास करत असतात. ते कधी दमत नाहीत, त्यांना तहानही लागत नाही. तुम्हाला तर तहान लागली आहे, तुम्ही कोणीतरी वेगळेच आहात.” यावर कालिदास म्हणाला, “मी अतिथी आहे.“ त्यावर ती मुलगी म्हणाली, “अतिथी तर धन आणि तारुण्य हे दोन आहेत, ते येतात आणि जातात. तुम्ही कोण हे नक्की समजल्याशिवाय मी कसे तुम्हाला पाणी देणार?” 

    आता मात्र कालिदास काकुळतीला आला आणि म्हणाला, “मी खूप सहनशील आहे हो! आता तरी मला पाणी द्या.” त्या चुणचुणीत  मुलीचे उत्तर तयारच होते – “धरती आणि वृक्ष हे दोनच या पृथ्वीतलावरील सहनशील आहेत.” आता कालिदासाला चक्कर येऊ लागली होती. तो चिडून त्या मुलीला म्हणाला, “मी मूर्ख आहे, आता तरी मला पाणी देशील का?” तेव्हादेखील ती मुलगी म्हणाली – “जगात दोनच मूर्ख आहेत, एक म्हणजे निरपराध्यांना शासन करणारा राजा आणि दुसरा म्हणजे अशा राजाची प्रशंसा करणारा पंडित.” 

    पण हे ऐकायला कालिदास शुद्धीवर नव्हता. तहानेने व्याकुळ होऊन तो त्या मुलीच्या पायाशी बेशुद्ध होऊन पडला. “उठ वत्सा!” त्याचे डोळे हळू हळू उघडत होते, थोडे भानावर येताच त्याला समोर लहान मुलीच्या जागी साक्षात सरस्वती दिसली. “शिक्षणाने ज्ञान मिळते, अहंकार नाही. याच शिक्षणाने सन्मान नि प्रतिष्ठादेखील मिळते. तुला तुझ्या ज्ञानाचा अहंकार झाला होता, त्याचे निराकरण करण्यासाठी मला यावे लागले. आता इथून पुढे ज्ञानदान कर आणि अहंकार सोडून दे.“ सरस्वती त्याला उपदेश करून अंतर्धान पावली. 

Theme: Overlay by Kaira