कालरात्री

   कालरात्री हे नवदुर्गांमधील सातव्या दुर्गेचे रूप. काली, महाकाली, भद्रकाली, भैरवी, रुद्राणी, चामुंडा, चंडी, रूद्रा, धुम्रवर्णा ही सर्व कालरात्रीचीच नावे.

   काळा रंग, विस्कटलेले केस, गळ्यात विजेप्रमाणे लखलखणारी माला, तीन डोळे! हे डोळे ब्रम्हांडाप्रमाणे गोल आणि चमकदार असतात. कालरात्रीच्या प्रत्येक श्वासातून अग्नीच्या भयंकर ज्वाला उसळत असतात. गळ्यात नरमुंडमाला असते. शरीरामधून विद्युल्लतेप्रमाणे किरणे बाहेर पडत असतात. अशी ही तामसी शक्ती असणारी कालरात्री! रूप भयंकर असले तरीही तिची उपासना कायम शुभ फळे देतात. त्यामुळेच कालरात्रीला शुभंकरी असेदेखील म्हणतात.

   चार हात असणाऱ्या कालरात्रीच्या उजव्या बाजूच्या हातात वरमुद्रा असून सर्वांना वर प्रदान करणारा आहे तर उजवीकडील खालचा हात अभयधारक आहे. डावीकडील वरच्या हातात लोखंडी काटा असून खालच्या हातात खड्ग आहे. वाहन गाढव आहे. साहस आणि वीरता यांचे संगम असणारे हे दुर्गेचे रूप!

एकवेणी जपकर्णपूरा नग्ना खरास्थिता ।

लम्बोष्ठी कर्णिकाकर्णि तैलाभ्याक्तशरीरिणी ।

वामपादोल्लसल्लोहलता कंटकभूषणा ।

वर्धन मूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भयंकारी ।।

    हा काल रात्रीचा उपासना मंत्र असून तिच्या उपासनेमुळे दुष्टांचा विनाश होतो. ग्रह संकटे दूर होतात. राक्षस भूत-प्रेत तिचे नाव ऐकताच घाबरून पळून जातात असे म्हटले जाते. नकारात्मक ऊर्जा नाश पावते. अज्ञात शत्रुभय, मानसिक तणाव सर्वकाही नष्ट होते.

   या कालरात्रीची उपासना केल्यास साधकाचे मन सहस्त्रार चक्रात स्थिर होते. साधक पूर्णतः कालरात्री रूपाकडे आकर्षित होतो. म्हणूनच तिला मोहरात्री असेही म्हणतात. साधकाच्या संपूर्ण पापांचा नाश होऊन त्याला अक्षय पुण्यलोक प्राप्ती होते.

   या कालरात्रीची उत्पत्ती कथा अशी सांगितली जाते – शुंभ-निशुंभ, रक्तबीज यांनी पृथ्वीवर हाहा:कार माजवला. सर्व देवांनी त्रस्त होऊन श्रीशंकराकडे धाव घेतली. शंकरांनी पार्वतीला दैत्यांचा नाश करण्यास सांगितले. पार्वतीने दुर्गा रूप धारण करून शुंभनिशुंभ त्यांचा वध केला. परंतु रक्तबीजाशी युद्ध करताना मात्र जसजसे त्याच्या रक्ताचे थेंब जमिनीवर पडू लागले तसतसे त्या रक्ताच्या थेंबांमधून नवीन रक्तबीजासारखेच राक्षस निर्माण होऊ लागले. तेव्हा दुर्गेने आपल्या तेजातून कालरात्री निर्माण केली. कालरात्रीने रक्तबीजाचा प्रत्येक थेंब जमिनीवर पडण्याआधीच आपल्या मुखात धरला. रक्तबीजाचे रक्त जमिनीवर पडणे बंद झाले तसा तो क्षीण होत गेला आणि दुर्गेने त्याचा वध केला.

   कालरात्रीची पूजा ब्राह्ममुहूर्तावर केली जाते. फक्त ही तामसी देवी असल्यामुळे दुर्गेचे हे रूप काळी विद्या करणाऱ्या साधकांमध्ये प्रिय आहे. तांत्रिक लोक कालरात्रीची मध्यरात्री पूजा करतात. तिला मदिरेचा नैवेद्य अर्पण करतात.

   परंतु संसारी लोक ब्राह्ममुहूर्तावर कालीची पूजा करतात. रातराणी या देवीला विशेष आवडते. तसेच कृष्ण, तुळस, काळीमिरी, काळ्या चण्याचा देवीला नैवेद्य दाखवतात. या देवीला गुळाचा नैवेद्य दाखवून नंतर तो गूळ सर्वांना प्रसाद म्हणून वाटला जातो. लाल रंगाचा देवीचा आवडता रंग असून ही देवी शनी ग्रहाशी संबंधित आहे.

ज्वाला कराल अति उग्रम शेषासूर सूदनम् ।

त्रिशूलम् पातु नो भीते भद्रकाली नमोस्तुते ।।

   कालरात्रीची प्रार्थना करून आपले मुळे दुःख दूर सारू या!

Theme: Overlay by Kaira