करामती शनी महाराज

   महाराष्ट्रामध्ये वैशाख अमावस्येस एक वेगळे महत्त्व आहे. या दिवशी ‘शनी जयंती’ साजरी केली जाते. महाराष्ट्र आणि दक्षिण भारतामध्येही शनी जयंती वैशाख अमावास्येला साजरी होत असताना मध्य प्रदेश आणि उत्तर भारतात ज्येष्ठ अमावस्या असते. भारतामधील सौराष्ट्रात वैशाख अमावास्येस माध्यान्ही शनी जन्म झाल्याचे सांगतात. एखादा सूर्यमालेतील ग्रह मानवी जीवनावर केवढा प्रभाव टाकू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘शनी ‘. 

   खरे तर पौराणिक दृष्टीने पाहता सूर्यपुत्र असणारा हा शनिदेव स्वतः रूपाने काळा आहे. यमाचा वडीलबंधू आहे. परंतु त्याची न्यायी प्रवृत्ती मात्र आपल्या पित्याप्रमाणे (सूर्यप्रकाशाइतकी) स्वच्छ आहे. या एकमेव देवतेचे दर्शन धाकामुळे (दहशतीमुळे) घेतले जाते. शनीची आपल्यावर कृपा असावी, त्याने आपल्याकडे वक्र दृष्टी वळवू नये, यासाठी सर्व शनी उपासना करतात. शनीचे दर्शन घेतात. शनी दर्शन करताना देखील त्याच्या डोळ्यात डोळे घालून दर्शन न घेता त्याचे चरण दर्शन करावे असा संकेत आहे. 

   भौगोलिक दृष्ट्या जर पहिले तर शनीसारखा सुंदर दुसरा ग्रह आपल्या आकाशगंगेत नाही. अतिशय विलोभनीय असणारी त्याची कडी हे त्याचे वैभव आहे. शनी हा वायुरूप गोळा असल्याने त्याची घनता खूप कमी आहे. शनीला असणाऱ्या चंद्राची संख्या अंदाजे ६२ आहे. त्याच्या ‘टायटन ‘या उपग्रहावर वातावरण असून २००४ साली या उपग्रहावर  ‘ह्यूजेन्स ‘ हे मानवनिर्मित यान उतरविण्यात आले होते. उपग्रहावर यान उतरविण्यात आलेला पृथ्वी नंतरचा शनी हा दुसरा ग्रह. शनीवर नासाने ‘कॅसिनी ‘ नावाचे यान पाठविले होते. सप्टेंबर २०१७ मध्ये शेवटचे चित्र पाठवून ते नष्ट झाले. 

   शनीचा वेग अत्यंत मंद असून तो अडीच वर्षात फक्त एक रास पूर्ण करतो. सूर्याभोवती एका प्रदक्षिणेसाठी शनीला २९ वर्षे लागतात. त्याच्या या मंद वेगास अनुसरूनच संस्कृतमध्ये ‘शनै :’शनै :’ म्हणजे अत्यंत मंद ही उक्ती रूढ झाली आहे. प्रत्यक्षात इतके सुंदर असणाऱ्या या ग्रहाची भारतीय लोकांमध्ये मात्र चांगलीच दहशत आहे. साडेसाती, ढाईया,पनौती असे शब्द ऐकताच भले,भले शनी महाराजांच्या सेवेसी रुजू होतात.

   परंतु शनी हा न्यायाचे प्रतीक देखील आहे. तो कोणावरही अन्याय करीत नाही. शनी हा केवळ वाईटच नसून कित्येक लोक साडेसातीमध्ये यशोशिखरावर गेले आहेत. साडेसातीची अत्यंत शुभ फळे त्यांना मिळाली आहेत. शनी हा अनुभवातून शिक्षण देणारा एक उत्तम शिक्षक आहे. शिस्तबद्ध, नम्र, प्रामाणिक, प्रयत्न करणाऱ्या, कष्ट  करणाऱ्या,सद्हेतू मनी बाळगणाऱ्या व्यक्तींना तो उच्च पदाला पोचवितो. परंतु अहंकारी, स्वार्थी, मनात नीच हेतू धरून कार्ये करणाऱ्या व्यक्तींचे तो गर्वहरण करतो. एखाद्याची कर्माची फळे भोगण्याची काळ हा साडेसातीचा काळ असतो. याच काळामध्ये गर्व, अहंकार, पूर्वग्रह यांचे सावट दूर होऊन व्यक्तीला माणुसकीची जाणीव होते. वाईट काळातच आपल्याला बरोबर असणाऱ्या खऱ्या माणसांची ओळख पटते. व्यक्ती स्वतःच्या गुणदोषांचे मूल्यमापन करते. तिचा अहंकार गळून तिला माणुसकीची जाणीव होते. साडेसातीच्या प्रभावामध्येच व्यक्तीला माणूस म्हणून कसे जगावे याचे ज्ञान होते. 

   कित्येक वेळा शनीची नुसती दृष्टी देखील मृत्युकारक असते. शनिदेवांना लांडीलबाडी खपत नाही. खोटे बोललेले आवडत नाही. मानवतेचा मुख्य धर्म ‘सेवा’ त्याला अत्यंत प्रिय आहे. कर्तव्यपरायणता त्याला आवडते. खोटी स्तुती केलेली त्याला आवडत नाही. कष्टाळू वृत्तीला तो मनापासून दाद देतात. फळाची अपेक्षा न करता कर्तव्य बजावल्यास अगदी न्यायी वृत्तीने ते योग्य वेळी त्याचा हिशेब करतात. 

शनीच्या साडेसाती संदर्भात एक कथा नेहमी सांगितली जाते. रावणाने सर्व देवांवर विजय मिळवून नवग्रह बंदी बनवून आणले. आणि आपल्या सिंहासनाकडे जाण्याच्या पायऱ्यांवर त्यांना पालथे टाकले. त्यांच्या पाठीवर पाय देऊन तो सिंहासनावर विराजमान होत असे.उन्मत्त गर्विष्ठ रावणाने नीच हेतू मनी धरून सीतेचे हरण केले. सीतेला सोडविण्यासाठी हनुमान लंकेत आले तेव्हा रावणाने त्याला बंदी बनवून दरबारात नेले. त्याच्या शेपटीला चिंध्या गुंडाळून पेटवून देण्यास सांगितले. दरबारात गेल्यावर मारुतीने नवग्रह सिंहासनाच्या पायऱ्यांवर पालथे पडलेले पहिले. चतुर हनुमानाने त्या ग्रहांना सुलटे करण्यास सांगितले. शनीला सुलटे करताच त्याची दृष्टी रावणावर  पडली आणि रावणाची दुर्दशा सुरु झाली. त्याची सुरवात लंकादहनापासून झाली.

   तमप्रधान कर्मांचा नाश  करण्यासाठी, पापी जीवांना  कठोर शिक्षा करण्यासाठी शनीदेव उग्र रूप धारण करतात, काळा निळा जांभळा असे तमोगुणी रंग शनीचे आवडते रंग आहेत. तर लोखंड या धातूवर शनीची सत्ता चालते. त्यामुळे खूप ठिकाणी शनीच्या लोहप्रतिमांची पूजा केली जाते. कितीही अधिकार असले तरी त्याला मर्यादा असतातच. जेंव्हा अधिकाराच्या धुंदीत शनिमहाराज अत्याचाराची परिसीमा गाठतात,  तेंव्हा त्यांच्या प्रकोपाचा प्रभाव कमी करण्यासाठी महादेव, सूर्य, श्रीकृष्ण ,हनुमान ही मंडळी सरसावतात. त्यांना शरण गेलेल्या भक्तांना अभय देतात. शनिदेव आणि हनुमानाचे एक अजब नाते आहे. एवढा पराक्रमी शनीदेव परंतु रावणाच्या दरबारात पालथे असेपर्यंत त्याचे काही चालत नव्हते .हनुमानाने त्याला सुलटे करताच त्याला त्याची शक्ती पुन्हा मिळाली आणि शनीदेव परत कार्यरत झाले. याच कारणामुळे मारुतीभक्त असणाऱ्यांना शनीदेव त्रास देऊ शकत नाही.

   भल्या भल्या लोकांना स्वसंरक्षणासाठी स्रीरूप घ्यावे लागल्याच्या कथा आपल्याला माहीत आहेत. शनिदेवांना देखील एकदा असेच मारुतीपासून बचावासाठी स्रीरूप घ्यावे लागले होते. शनिदेवाच्या कठोर शासनाला घाबरून लोक मारुतीरायाला शरण गेले. तेव्हा मारुतीच्या धाकाने शनीदेवानी स्रीरूप धारण केले, यावेळी आपल्या पायाखाली  शनीला  दाबून मारुतीने त्याला निष्प्रभ केले. हे मारुती मंदिर गुजरातमधील सारंगपूर जिल्ह्यात ‘बोताड’ येथे असून ‘कष्टभंजन हनुमान मंदिर’ म्हणून प्रसिद्ध आहे. आजच्या करोनाच्या काळात या मंदिराने मानवतेचे खरेखुरे दर्शन घडविले आहे. या मंदिराने आपल्याकडील ५० खोल्या आणो १०० पलंग करोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी उपलब्ध करून दिले आहेत. 

   आता शेवटी एक मजेशीर गोष्ट एवढे पराक्रमी सूर्यपुत्र शनीदेव  एका बाबतीत मात्र अगदी सामान्य माणसाप्रमाणे वर्तन करतात. ते स्वतःच्या पत्नीला घाबरूनच असतात! यामागील कथा सांगताना असे म्हणतात की एकदा शनीदेव श्रीकृष्ण आराधनेत एवढे मग्न होते की आपल्या पत्नीचे देखील त्यांना भान राहिले नाही.पतीने  आपल्याकडे दुर्लक्ष केले म्हणून तिने पतीला  शाप दिला. तेंव्हापासून शनिदेव पत्नीला घाबरूनच राहतात आणि भक्तलोक शनीचा प्रभाव कमी करण्यासाठी शनीपत्नी ‘नीलादेवी धामिनी’ चे नामस्मरण करतात. पत्नीच्या धाकापासून कोणाचीच सुटका नाही हेच खरे! 

   असो.  शनीवरील पुढच्या लेखात अहमदनगर जिल्ह्यातील ‘शनी शिंगणापूर ‘ ची माहिती अवश्य वाचा.

Theme: Overlay by Kaira