कर्णाची आख्यायिका

danveer karna

   महाभारतामधील कर्ण दानशूर म्हणून सर्वश्रुत आहे. युद्धभूमीवर लढता लढता देह भूमीवर पडला तरी प्राण सोडण्याआधी त्याने एका वृद्ध याचकाला आपला सोन्याचा दात काढून दिल्याची कथा सर्वांना माहित आहे.

   धर्मयुद्ध लढता लढता कर्ण गतप्राण झाला आणि त्याच्या आत्म्याने स्वर्गारोहण केले. जेव्हा कर्ण इंद्रासमोर गेला तेव्हा इंद्राने त्याला अन्न म्हणून सोने खाण्यासाठी दिले. तेव्हा कर्णाने त्यांना विचारले की इंद्रदेव तुम्ही ही काय थट्टा आरंभिली आहे? मी इथे भुकेने व्याकुळ झालो असताना तुम्ही मला अन्न म्हणून हे सोने का देत आहात? त्यावर इंद्रदेव उत्तरले, ”कर्णा तू आयुष्यभर गरजवंत लोकांना मदत केलीस. दानशूर कर्ण म्हणून तू या पृथ्वीवर नाव कमावलेस. परंतु दारी आलेल्या याचकाला तू नेहमी धन अथवा सुवर्ण स्वरूपातच दान दिले. तू कधीही दारी आलेल्या याचकाला अन्न देऊन तृप्त केले नाही. तसेच तुझ्या हातून पूर्वजांच्या स्मरणाप्रीत्यर्थ कधीही अन्नदान झाले नाही. त्याचमुळे मी देखील तुला सोन्याव्यतिरिक्त फक्त हवे असल्यास धन देऊ शकतो.

   कर्णाचे डोळे उघडले. त्याने इंद्रदेवांजवळ आपली चूक कबुल केली आणि ती सुधारण्याकरिता मुदत मागितली. तेव्हा इंद्राने त्याला सांगितले की, सूर्य जेव्हा तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश करेल आणि पृथ्वीवर पूर्ण चंद्राचे दर्शन होईल अशा वेळी दान केले तर तुझा हेतू सिद्ध होईल. त्यासाठी इंद्राने त्याला पुन्हा १५ दिवस पृथ्वीवर पाठविले. त्यानंतर कर्णाने पूर्वजांप्रती श्राद्धविधी करून अन्न दान केले. त्यामुळे कर्णाला तर मोक्षप्राप्ती तर झालीच परंतु त्याच्या मागील तीन पिढ्याना देखील सदगती प्राप्त झाली.

   या कथेशी मिडास राजाची हात लावीन त्याचे सोने ही कथा मिळती जुळती आहे. भौतिक गोष्टीपासून तुम्हाला क्षणिक सुखाची प्राप्ती तर होते परंतु ही भौतिक सुखे तृप्ती अथवा मानसिक समाधान नाही पुरवू शकत. त्यामुळे दान करताना देखील याचकाला आत्मा तृप्त होईल त्याला मानसिक समाधान लाभेल तसेच दानकर्त्याबद्दल तो सहजच आशीर्वादपर शब्द उच्चारेल असेच दान अर्थात अन्न आणि जलदान प्रामुख्याने करावे.

Theme: Overlay by Kaira