कात्यायनी

   कात्यायनी हे नवदुर्गांमधील दुर्गेचे सहावे रूप मानले जाते. काली, शाकंभरी, चंडिका ही या दुर्गेची अन्य नावे. कालिका पुराणात ओरिसा हे कात्यायनी आणि जगन्नाथाचे स्थान असल्याचा उल्लेख आहे.

   या दुर्गेची उपासना गोरज समयी करतात. तिचे स्वरूप अत्यंत तेजःपुंज असून तिला चार भुजा आहेत. उजव्या बाजूच्या दोन हातांच्या अभयमुद्रा असून डावीकडील हातांमध्ये तलवार आणि कमळ आहे. या तलवारीचे नाव ‘चंद्रहास’ असे आहे. या कात्यायनीचे वाहन सिंह आहे. तिचे स्वरूप रुद्र असून तिला युद्धदेवता देखील म्हणतात.

चंद्रहासोज्जलकरा शार्दूलवरवाहना ।

कात्यायनी शुभ दधादेवी दानव-घातिनी ।।

या मंत्राने कात्यायनी देवीची उपासना केली जाते.

   कालिंदीच्या यमुना किनारी भगवान श्रीकृष्णांना पती स्वरूपात प्राप्त करण्यासाठी व्रज गोपींनी या देवीची उपासना केली होती असे सांगतात. म्हणूनच ही दैवी रजमंडी मंडळाची अधिष्ठात्री देवी मानली जाते. या देवीची उपासना केली असता साधकाचे मन ज्ञान चक्रात स्थिर होते. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चारही पुरुषार्थांची इहलोकात राहूनच या देवीच्या उपासनेमुळे प्राप्ती होते. साधकास अलौकिक तेज प्राप्त होते.

   कात्यायनी उत्पत्ती संदर्भात एक पुराणकथा सांगितली जाते. कत नावाचे महर्षी, त्यांचा मुलगा कात्यायन. याने अनेक वर्ष भगवतीची कठोर उपासना केली. भगवती प्रसन्न झाल्यानंतर भगवतीने आपल्या घरी कन्या स्वरूपात जन्म घ्यावा अशी प्रार्थना केली. यानंतर पृथ्वीवर महिषासुराचा उपद्रव वाढला. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी आपल्या तेजातील काही अंश देऊन महिषासुराच्या विनाशासाठी एका देवीला उत्पन्न केले. कात्यायनाने सर्वप्रथम या देवीची पूजा उपासना केली म्हणून तिचे नाव कात्यायनी.

   कात्यायानीचा शब्दशः अर्थ पाहिला तर ‘दृढ आणि घातक अहंकाराचा नाश करणारी’ असा होतो. अश्विन कृष्ण चतुर्थीला या देवीने कात्यायनाच्या घरी जन्म घेतला होता. सप्तमी, अष्टमी, नवमी या तीन दिवशी कात्यायनाची पूजा ग्रहण करून दशमीच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला.

   कात्यायनीचे रूप मातृत्व वैशिष्ट्य दाखवणारे असून कुमारिकांनी इच्छित वर प्राप्तीसाठी कात्यायनी देवीची आराधना करावी, ज्यांच्या विवाहास विलंब होतो अशा कुमारिकांनी हा श्लोक म्हणून उपासना केल्यास लवकर विवाह जमून इच्छित वर प्राप्त होते असे मानले जाते.

कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी ।

नंदगोपसुताय देवी पतिम् मे कुरु मे ।।

   या देवीला पिवळ्या रंगाचे फूल आणि चांदीच्या पात्रातून मध नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो. लाल रंग या देवीच्या आवडीचा आहे. या देवीच्या पूजेनंतर महादेव आणि प्रजापिता ब्रह्मा यांची पूजा करण्याचा प्रघात आहे. समस्त सृष्टीला महिषासुराचा जाचातून मुक्त करणाऱ्या कात्यायनीचे जयगान गाऊया –

परमांवदमयि देवि परब्रह्म परमात्मा ।

परमशक्ती परमभक्ति कात्यायनसुता नमोस्तुते ।।

Theme: Overlay by Kaira