खरा श्रीमंत

   संध्याकाळ टळून गेली होती. लखूशेठचे जेवण उरकले होते. घराबाहेरच्या बागेत शतपावली करता करताच त्यांच्या कानावर एक करूण स्वर आला. त्यांच्या लक्षात आले की रस्त्यावरून एक भिकारी चालला होता. जोरात ओरडून भीक मागत होता. त्याचबरोबर देवाने त्याला भिकारी बनवले म्हणून देवालादेखील दोष देत होता, नशिबाला दोष देत होता. लखूशेठने रामूला हाक मारली आणि त्या भिकाऱ्याला आत घेऊन येण्यास सांगितले. रामू जऱ्या वेळातच त्याला घेऊन आला. भिकारी भेदरून लखूशेठसमोर हात जोडून उभा होता. मनातून त्याला जरा आशा वाटत होती की शेटजींनी बोलावून घेतले म्हणजे आपल्याला नक्कीच काहीतरी चांगली भिक्षा मिळेल.

   शेटजींनी त्याला विचारले, “काय रे! दिवस संपला सगळा, सर्व रस्त्यांनी काय ओरडत फिरतो आहेस? काय झाले तुला?” तसे तो भिकारी म्हणला, “क्षमा करा शेटजी, पण बघा देव कसा अन्यायी आहे. तुम्हाला बंगला, गाडी, नोकरचाकर, खायला प्यायला सर्व काही भरपूर दिले. पण मला काय? मला मात्र दारोदारी भीक मागावी लागतेय. कोणी काही  नाही दिले तर कधीकधी अर्धपोटी देखील राहावे लागते. कसे भेदभावाचे राज्य आहे बघा देवाचे. जाऊ दे, माझे नशीबच फुटके त्याला तुम्ही तरी काय करणार?” असे म्हणून तो शेठजींनी त्याला काही द्यावे म्हणून हात पसरू लागला. 

   शेठजी काही विचार करीत होते. त्याचा समोर पसरलेला हात येताच ते पटकन म्हणाले, “देतो, तुला दोन हजार रुपये देतो, तू फक्त मला तुझा तो उजवा हात काढून दे.” ही मागणी ऐकून भिकारी एकदम चपापला. आजपर्यंत अशी मागणी कोणी केली नव्हती. भीक म्हणून २-५ रुपये किंवा काही खायचे पदार्थ त्याला मिळत होते. पण ही विचित्र मागणी! भिकारी विचारात पडलेला पाहून शेठजी पुन्हा म्हणाले, “ठीक आहे, उजवा हात कामाचा असतो, चल मला डावा हात पण चालेल, तुला एक हजार रुपये देतो.” भिकारी मात्र आश्चर्यचकीत होत होता. पैसे मिळावेत म्हणून आपले धडधाकट शरीर तोडून त्याचे अवयव सुट्टे करून विकायचे असा विचारदेखील त्याने कधी केला नव्हता!

   शेठजींनी मात्र आता त्याच्या प्रत्येक अवयवावर बोली लावायला सुरुवात केली. मोठ्या अवयवांवर दोन हजार, मध्यम अवयवांवर एक हजार, हृदय, डोळे अशा महत्त्वाच्या अवयवांसाठी तर दहा हजार देखील! अगदी एक डोळा दिला तर पाच हजार देतो. तुझे काय, एक डोळ्यावरदेखील भागेल असे त्यांनी त्या भिकाऱ्याला सांगितले. भिकारी पारच गांगरून गेला. काय बोलावे त्याला काहीच सुचत नव्हते. पैसे, अन्न, इतर काही मदत मिळाली तर हवेच होते परंतु त्यासाठी आपले अवयव विकायचे? आणि त्यानंतर काय अपंग म्हणून आयुष्यभर जगायचे? त्याने मनाशीच आपल्याला एक डोळा नाही, हात नाही, पाय नाही असा विचार करून पाहिला आणि त्याला दरदरून घाम फुटला. 

   शेठजींनी रामूला हाक मारली तसे भिकाऱ्याला वाटले की आता शेठजी रामूला सांगून आपला एखादा अवयव काढून घेणार. त्याने घाबरून शेठजींच्या पायावर लोळण घेतली आणि तो गयावया करू लागला. तसे शेठजींनी त्याला वर उचलले आणि समजुतीच्या स्वरात त्याला म्हणाले, “अरे बाबा, परमेश्वराने तुला एवढे हट्टेकट्टे शरीर दिले आहे. त्याचे आभार मानायचे सोडून तू नशीबाला दोष देतोस. या सुदृढ शरीराने कष्ट करून सुखाची रोजीरोटी कमावण्याचा प्रयत्नदेखील तू करत नाहीस. दिवसभर आळशी बनून झोपा काढतोस, संध्याकाळ झाली की भीक मागत सुटतोस. एक लक्षात ठेव, चालणाऱ्याचे नशीब चालते नि बसणाऱ्याचे बसते. तू कष्ट न करता बसून राहिलास तर परमेश्वर सुद्धा तुला मदत करणार नाही. तेव्हा आळस झटक, परमेश्वराने तुला एवढे धडधाकट शरीर दिले आहे, त्याचा उपयोग कर. कष्ट कर. कामे कर. तुला कधीही काहीही कमी पडणार नाही. आणि हो! एक गोष्ट कायम लक्षात ठेव. एवढे निरोगी शरीर दिल्याबद्दल रोज सकाळी उठल्यावर आधी परमेश्वराचे आभार मानत जा! नशीबाला दोष देणे सोडून दे.”

   भिकारी वरमला. त्याला आपली चूक समजली. शेठजींनी त्याला पोटभर जेवण दिले आणि दुसऱ्या दिवसापासून आपल्या दुकानावर काम करण्यासाठी बोलावले. त्यानंतर मात्र त्या भिकाऱ्याने कधीही नशीबाला दोष दिला नाही. प्रामाणिकपणे आणि सचोटीने कष्ट करून त्याने आयुष्य काढले.

Theme: Overlay by Kaira