कूर्म अवतार – भाग २

Kurma avatar pic

    कूर्माला भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय शुभ मानले जाते. कूर्मास लक्ष्मीचे प्रतीक मानतात. कासव धैर्य शांतीचे प्रतीक आहे. त्याच्या योगे धनप्राप्ती होते अशी समजूत आहे. 

    श्री विष्णुंच्या आशीर्वादाने प्रत्येक मंदिराच्या गाभाऱ्यासमोर सत्त्वगुणप्रधान कासव आढळून येते. दीर्घायुषी असणे ही कासवाची विशेष बाब. मंदिराच्या गाभाऱ्यासमोरील कासव शरणागत भाव दर्शविते. तसेच वात्सल्यभावाचे शिंपण भक्तांवर करते. केवळ वात्सल्यपूर्ण नजरेने आपल्या पिलांचे पालनपोषण करणे हा कासवाचा गुणधर्म आहे. 

    उन्हाळा आणि हिवाळ्यामध्ये कासवे दीर्घ निद्रा घेतात. प्रतिकूल परिस्थितीत शांत राहून जीवन व्यतीत करावे असेच ते सुचवतात. योग्य वेळी कार्यास सुरुवात केली तर ते संपूर्ण होते. समुद्रमंथनप्रसंगी कासवाने धीराने मंदराचल पर्वत तोलला म्हणून समुद्रमंथनाचे कार्य सिद्धीस गेले व अमृतप्राप्ती झाली. धीराने व अढळ निश्चयाने कोणतेही काम सिद्धीस जाते. म्हणूनच कूर्म जयंतीचा दिवस कोणत्याही कार्याचा शुभारंभ करण्यासाठी योजतात. विशेषतः वास्तुबांधणीची कामे यादिवशी सुरु करतात.

    नागपूरमध्ये एक मध्यवर्ती संग्रहालय असून एका पीठावर कूर्म, त्याच्या चार पायांजवळ शंख, चक्र, गदा, पद्म , पीठाला  वारीमार्ग  असे शिल्प आहे. त्याची स्वतंत्र पूजा होत असल्याचे पुरावे आहेत. ग्वाल्हेर किल्ल्यातदेखील नागफणाधिष्ठित कूर्मावतार शिल्प आहे. खजुराहो येथे विष्णू योगासन मुद्रेत बसलेले असून पद्मासनाच्या खाली कूर्माची आकृती आहे. 

    प्रलयानंतर श्री विष्णुंनी घेतलेल्या दहा अवतारांचे उत्क्रांतीच्या दृष्टीने एक महत्त्व आहे. प्रथम अवतार मत्स्य सगळीकडे जेव्हा जलमय अवस्थाच होती तेव्हा निर्माण झाला. त्यानंतर दुसऱ्या अवताराची ‘कूर्माची’ निर्मिती झाली. उत्क्रांतीचा अर्थ याठिकाणी सजीवांची क्रमानुसार उत्पत्ती असा घेणे योग्य ठरते. या संकेतानुसार मत्स्य निर्मिती आधी झाली. त्यानंतर कूर्म निर्मिती झाली. अर्थात कूर्म निर्मिती झाली तेव्हा मत्स्य देखील अस्तित्वात होतेच. 

    कूर्म उत्पत्तीच्या वेळी काही ठिकाणी जल हटून भूभाग निर्मिती झाली होती. त्यामुळे कूर्म हा प्राणी पाण्यातील जीवनाबरोबरच जमिनीवरील जीवनाशीदेखील समायोजन साधू शकत होता. उभयचर असणाऱ्या या प्राण्याला नवीनच निर्माण झालेल्या भूभागावर अचानक काही संकट निर्माण झाल्यास त्यापासून बचाव करण्यासाठी आपले सर्व अवयव आत ओढून एकदम दणकट अशा संरक्षक कवचात ठेवण्याची क्षमता निर्माण झाली होती. त्याच्या शरीराचे शीर, धड, शेपूट असे ठळक विभाजन होते.

    ‘कूर्मगती’ हा शब्द नेहमी वापरला जातो. अत्यंत सावकाश परंतु निश्चयीपणाने त्याची हालचाल विशिष्ट दिशेने होत असते. अगदी हाच नियम उत्क्रांती संदर्भातही लागू होतो. कोणतीही उत्क्रांती, बदल अत्यंत संथ गतीने पण ठराविक दिशेने होत असतात. ही एक अखंड चालणारी प्रक्रिया आहे. 

    स्थिरता हा कासवाचा विशेष गुण मानला जातो. परंतु ही स्थिरता गतिमानतेमधील स्थिरता असते. त्याचमुळे काळाच्या बदलत्या प्रवाहात देखील प्राचीन कूर्म जात आजही अस्तित्वात आहे! 

    कूर्म अवतारासंदर्भात पौराणिक गोष्टींसाठी क्लिक करा –  कूर्म अवतार – भाग १

Theme: Overlay by Kaira