कूष्मांडा

   नवदुर्गा मधील दुर्गेचे चौथे रूप म्हणजे कूष्मांडा. कूष्मांडा देवीला आदिमाया-आदिशक्ती मानले जाते. कुसुम फुलांप्रमाणे हास्य आणि अण्ड-ब्रम्हांड या दोन शब्दांची संधी होऊन कूष्मांडा हा शब्द तयार झाला आहे. ही देवी अष्टभुजा असून सृष्टी निर्मिती पूर्वी जेव्हा चारी दिशांना फक्त अंधार अंधारच होता तेव्हा आपल्या दैवी ईश्वरी हास्यातून अण्ड म्हणजेच ब्रम्हांडाची निर्मिती केली म्हणून तिला आदिशक्ती म्हणतात. 

   कूष्मांडा देवीचा वर्ण सूर्याप्रमाणे तेजस्वी असून ती अष्टभुजा आहे. या अष्टभुजांमध्ये क्रमशः कमंडलू, धनुष्य, बाण,  कमळ, अमृत कलश, चक्र, गदा ही शस्त्रे आहेत. आठव्या हातामध्ये सर्व सिद्धी आणि निधी देणारी जपमाला आहे. 

   ही एकमेव दुर्गा अशी आहे की जी सूर्याचा ताप सहन करून सूर्य लोकात निवास करते. त्याचमुळॆ तिच्या शरीराचा वर्ण तप्त सुवर्णा प्रमाणे झळझळीत आहे. त्याचे तेज सर्व दिशांना फाकले आहे. याच तेजाचे संचारण सर्व प्राणिमात्रांमध्ये दिसून येते.

सुरा संपूर्ण कलशं रुधिराप्लुतमेवच |

दधाना हस्त पद्माभ्यां कूष्मांडा शुभदास्तुमे ।।

या श्लोकाने कूष्मांडा देवीची उपासना केली जाते. तिच्या उपासनेमुळे रोग हरण होते तसेच तिच्या भक्ताच्या आयुष्य, यश, बल यामध्ये वृद्धी होते.  कूष्मांडा अत्यल्प भक्तीने, सेवेने प्रसन्न होते. खऱ्या प्रेमाने, भक्तीने शरण गेल्यास भक्त सहजपणे परमपदाला पोहोचतो. त्याची लौकिक आणि पारलौकिक उन्नती होते. 

   या देवीची पूजा करताना हिरवे वस्त्र नेसावे अशी प्रथा आहे. तसेच हिरवी विलायची, बडीशेप देवीला अर्पण केली जाते. मालपुव्याचा नैवेद्य देवीला दाखवून नंतर तो ब्राह्मणाला दान केल्यास विघ्ने दूर होतात. 

   नवरात्री मधील चौथ्या दिवशी या देवीची पूजा केल्यानंतर विशाल असणाऱ्या तेजस्वी सुवासिनीची पूजा करून तिला सुकामेवा आणि आणि सौभाग्यदायक वस्तूंचे दान दिले जाते. 

   या देवीची उपासना केली असता साधकाचे मन अनाहत चक्रात स्थिर होते. 

   ब्रह्मांडाची निर्मिती करणारी ही अष्टभुजा देवी हिला कुष्मांड अर्थात कोहळा अत्यंत प्रिय आहे याच कोहळ्याचा यज्ञात बळी देतात. देवीला अर्पण करण्यासाठी कोहळा उपलब्ध न झाल्यास पेठा नैवेद्यासाठी वापरला जातो. उपासकाने पूजा करताना हिरवे वस्त्र धारण करावे असे असले तरी देवीला मात्र लाल रंग अत्यंत प्रिय आहे. तिला लाल वस्त्र, लाल फुले, लाल चुडा अर्पण केला जातो. ब्रह्मांडाचे प्रतीक म्हणजेच कोहळा असून त्याच्या मधल्या पोकळीत देवीचा वास असतो असे मानले जाते. 

   आपले जीवन आरोग्यसंपन्न आणि बलदायी यशदायी करण्यासाठी कूष्मांडा देवी ची प्रार्थना करूया –

वंदे वांछित कामर्थे चंद्रार्धकृत शेखराम |

सिंहारूढा अष्टभुजा कूष्मांडा यशस्विनीम् ।।

Theme: Overlay by Kaira