लोकगायक – वासुदेव

    अविरत फिरणाऱ्या कालचक्राच्या गतीत ‘रामाच्या पारी’ हा शब्द जणू हरविल्यासारखा झाला आणि गावागावातून ‘दान पावलं, दान पावलं’ असे गात पायात चाळ, हातात मंजिरी, चिपळ्या वाजवित सकाळीच गाव जागे करणारे ‘वासुदेव’ अभावानेच दिसू लागले. 

    मुळातच कृष्णभक्त असलेली ही भटकी जमात आता कालबाह्य होत आहे. यांनाच ‘थुकोट’ असेही नाव आहे. महानुभाव साहित्यामध्ये यांचा ‘ भ्रीडी’ असा उल्लेख आढळतो. ‘हरबोला’, ‘जागाकापडी’, ‘अंतवैदिन कापडिया’ ही देखील यांचीच नावे. ‘वासुदेव’ ही महाराष्ट्रातील प्राचीन परंपरा असून वासुदेव, वासुदेव गोंधळी, वासुदेव जोशी असे उपप्रकार दिसून येतात.

    एका ब्राह्मण ज्योतिष्यास कुणबी स्त्रीपासून झालेला पुत्र ‘सहदेव’ हा या जमातीचा मूळ पुरुष मानतात. भगवान श्रीकृष्णाने यादवकुळातील लोकांना निरनिराळी कामे नियुक्त करून दिली. वासुदेव  समाजाच्या पूर्वजांना लोकांच्या कुळीचा उद्धार करण्याचे काम सोपवले. तेव्हापासून वासुदेवाकडे कुळी वाचून दाखवण्याचे काम आले. वाचून दाखवणे, वाचून देणे या शब्दांत कालांतराने बदल होऊन ‘वाचदेव’ असा शब्द रूढ झाला आणि याच शब्दाचे अपभ्रंश रूप ‘वासुदेव’ सध्या प्रचलित आहे. 

    कृष्णाचे भक्त म्हणवून घेणारी ही जमात कृष्णाची प्रतीके आपल्या वेशभूषेत सन्मानाने वागविते. मोरपिसांचा उंच टोप, घेरदार झगा, सुरवार, खांद्यावर उपरणे, गळ्यात झोळी, कंबरेला छोटी बासरी (पावरी) अशा रूपात हे वासुदेव त्यांच्या ठराविक गावामध्ये भिक्षाफेरी मारतात. या सर्व वेषभूषेमध्ये मोरपिसाच्या टोपीला अत्यंत महत्त्व आहे.भिक्षाफेरीसाठी निश्चित केलेल्या गावामध्ये भिक्षा मागतानाच ते ही टोपी वापरतात, इतरत्र नाही.

    खासगाव, ता. जाफराबाद, जि.जालना येथे बरीचशी वासुदेवांची घरे आहेत. खानदेशमध्ये चांगदेव जत्रेत यांची जातपंचायत होत असे. आता ही कालबाह्य झाली असून नवीन पिढी वादविवादांसाठी कोर्टाचा अवलंब करताना दिसते. महाराष्ट्रामध्ये काही भागात नवजात शिशुच्या पाचवीच्या पूजेला वासुदेव मंडळींना आवर्जून बोलावतात. हे लोक यादिवशी पूजा करतात, बाळाची दृष्टीबाधा निवारण करतात आणि शिशुला मंगल आशीर्वाद देतात.

    वासुदेवाला दिलेले दान देवदेवतांना, पितरांना पोहोचते अशी समजूत असल्याने लोक त्यांना कधीही रिक्त हस्ते पाठवीत नाहीत. त्यांच्या झोळीला ‘कामधेनू’ असे यथार्थ नाव आहे. याच झोळीत आलेल्या भिक्षेतून ते आपला चरितार्थ चालवतात. वासुदेव राम प्रहरी गात नाचत येतो आणि लोककल्याणार्थ तसेच वाडवडिलांचा उद्धार करण्यासाठी दान करा असे कवनाद्वारे सांगतो.

“वासुदेव हरी वासुदेव हरी 

सकाळच्या पारी आली वासुदेवाची स्वारी

सीता सावली माना दान करी वासुदेवा

श्रीकृष्ण घ्या सखा, नाही होणार तुला धोका”

    दान मागताना अगदी सुरुवातीला कृष्णाच्या प्रिय तुळशीला वंदन करून वासुदेवाची स्मरण करतात.

वासुदेवाच्या कथागायनाला विशिष्ट असा बंध नाही. कथागायनाबरोबरच गद्यपद्यमिश्रित रचना ते गातात. त्यांचे सादरीकरण करतात. हे हरहुन्नरी वासुदेव एकाच वेळी एका हाताने टाळ, दुसऱ्या हाताने चिपळी, साथीला पायातील घुंगरांचा लयबद्ध नाद अशी कौशल्ये सादर करतात. माधुर्य हा वासुदेवाच्या एकूण गायन आणि सादरीकरणाचा आत्मा असतो. त्यांचे गाणे, नाचणे, वाद्य वाजवणे सर्वच हळुवार, मधुर, मृदू असते. जो कृष्ण प्रेमाचाच उद्गाता आहे, त्याच्या भक्तांनी सर्व मनोरंजनात्मक सादरीकरण मृदू, मुलायम, हळुवार भाव जपत लोकांत प्रेमभाव जास्तीत जास्त रुजविला. त्यांचे सादरीकरण लोकांमधील भक्तिभाव वाढवते, श्रद्धा बळकट करते, लोकांचे मनोबल पक्के करते. त्यांच्या सादरीकरणामध्ये पौराणिक तसेच लौकिक कथा असतात. उपदेशात्मक, बोधात्मक कवने, विविध विषयांवरील कवने अशा विविधतापूर्ण रचना असतात. उपदेशपर फटकेदेखील असतात.

“अरे पराण्या तुला सांगते हरीबंद तू राहू नको

अन दुही भावाचा तंटा चालला सरकारामंदी जाऊ नको.”

    शिवरायांच्या काळात या वासुदेवांनी बहुरुप्याचे कामदेखील केल्याचे उल्लेख आहेत. 

    कोणत्याही निमंत्रणाविना सकाळीच ‘दान पावलं’चा घोष करीत गावाला जाग आणणारे वासुदेव आता अभावानेच दिसतात. पहाटे पहाटे येऊन गाव जागवणे, लहान थोरांना निरनिराळ्या कथा सादर करणे, बालगोपाळांचे मनोरंजन करणे ही सर्व कामे हौसेने करणारा वासुदेव कालबाह्य होत आहे. प्रत्यक्ष वासुदेवांचे दर्शन दुर्मिळ झाले असले तरीही काही मंदिरांसमोर भिक्षा मागताना ही मंडळी दिसतात.

    बदलत्या काळात नव्या पिढ्यांनी नवीन व्यवसाय स्वीकारल्यामुळे ही परंपरा खंडित होण्याच्या मार्गावर आहे. नवीन पिढीतील मुलांना गल्लोगल्ली भिक्षा मागत फिरणे मान्य नाही. मुले वासुदेवाचा वारसा जपण्यास तयार नाहीत अशी ज्येष्ठ वासुदेवांची खंत आहे. अल्पसंख्यांकांमध्येही वासुदेव समाज अत्यल्प आहे. मुले शिक्षणाकडे वळत आहेत. सरकारने आम्हाला शैक्षणिक आरक्षण द्यावे म्हणजे मुलांवर भटकंती करून दान मागण्याची वेळ येणार नाही अशी रास्त मागणी या वासुदेवांची आहे.

    फक्त ही कला पूर्ण अस्ताला जाण्यापूर्वी ही लोकगायकांची परंपरा दृकश्राव्य दस्तऐवजीकरण करून उत्तम रीतीने कशी जतन करता येईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे आपल्याच हातात आहे.

Theme: Overlay by Kaira