लोकसंस्कृती उपासकांचे आविष्कार
विशिष्ट भौगोलिक प्रदेशात राहणारे समूह ज्यांच्या चालीरीती, प्रथा, परंपरा समान आहेत त्यांना लोक ही संज्ञा वापरली जाते. हिंदुस्थानातील निरनिराळ्या प्रांतातील लोकजीवन पारंपरिक कलाविष्कारांशी जोडले आहे. वेगवेगळ्या कलामाध्यमांमधून देवदेवतांची उपासना येथे केली जाते. जगातील प्रत्येक माणसास सृजनशीलतेचे वरदान असून या सृजनशीलतेमधून कलांची निर्मिती, संस्कृतीचा उदय होतो. व्यक्तीची सृजनशीलता हाच कोणत्याही कलेचा मूलस्रोत होय. विज्ञान, तत्त्वज्ञान, धर्म याप्रमाणेच कलादेखील जीवनानुभवाची अनुभूती घडवते.
हिंदुस्थानच्या संस्कृती इतिहासाचा संगीत हाच आत्मा असून लोकांमधील समष्टीभाव जेव्हा लय साधतो तेव्हा उत्स्फूर्तपणे लोकगीतांची निर्मिती होते. पारंपरिक जीवनात कोणताही विधी गाण्यांशिवाय पूर्ण होत नाही. मौखिक गाणी हा हिंदू संस्कृतीचा महत्त्वाचा घटक असून या गाण्यांद्वारे जीवनातील लौकिक घटनेला उन्नत करून ती घटना अलौकिक बनवली जाते.
लोककलावंत लोकमनोरंजनासाठी गायन, नर्तन, नाट्यदर्शन याचे सहाय्य घेतात. काळानुसार लोकाविष्कारात बदल घडत असले तरीही लोकजीवनाचा मूल स्तर तसाच आहे. या लोकगायक कलावंतांना तत्त्वज्ञान फारसे माहित नसले तरीही आपल्या अविष्कारामधून ही तत्त्वे विशिष्ट देवतेची महती गायन, वादन, नर्तन, नाट्यस्वरूप लीळादर्शन, आख्यानाचे नाट्यदर्शन याद्वारे समाजासमोर आणतात.
लोककलेचे हे सर्व उपासक लोकशिक्षकाची भूमिका बजावत देवतांची भक्ती, उपासना करीत आहेत. लोककलेला राजाश्रय नसला तरीही लोकाश्रयाच्या आधारावर ती अव्याहत वाहत आहे. महाराष्ट्रातील लोकगायकांचे संदर्भ संत-साहित्यात विपुल प्रमाणात आढळतात.
ठाकूर, कल्याण, टीपगाण, पानगाण, भाट, नागारी, डौरी, हळदे, धवळगाण, पहाटगाण यासारख्या परंपरा अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहेत. परंतु जोगी, पांगुळ, वासुदेव, भोपे, बाळसंतोष, गोंधळी, भराडी, वाघ्यामुरळी, आराध्ये, पोतराज, कुडमुडे जोशी यासारखे लोकसंस्कृतीचे उपासक आजही तग धरून आहेत. हिंदुस्थानात वैदिक तसेच वैदिकेतर देव आढळतात. वैदिकेतर लोकांच्या देवदेवतांचे उपासक आपल्या देवतेचे नाव आणि त्यापुढे भगत असे नाव सांगून भिक्षा मागतात. विशिष्ट देवतेचे उपासक भगत न म्हणता ठराविक नावाने ओळखले जातात (वाघ्या, मुरळी इ).
प्रत्येक देवतेच्या भगताची वेशभूषा वेगळी असते. ठराविक देवतेची विशिष्ट चिन्हे हे लोक आपल्या अंगावर बाळगतात. त्यांच्या गायनाच्या साथीने वाजवली जाणारी वाद्ये ठराविक असतात. पौराणिक कथांचा आधार घेत देवतांचे रूपवर्णन, गुणवर्णन, लीळावर्णन गीत आणि कथागीत यांच्या साहाय्याने करत ते आपली मौखिक परंपरा पुढे नेतात. या प्रत्येक बाबतीतले कौशल्य त्यांनी हस्तगत केलेले असते. हे उपासक केवळ लोकगायक नाही तर पारंपरिक कलांचे वाहक असतात. भटक्यांचे जीवन जगणारे हे लोककलावंत आता स्थिरावू पाहत आहेत. अलीकडच्या काळात त्यांच्या सादरीकरणाचे लौकिकीकरण, व्यावसायिकीकरण होत आहे. तरीही लोककलेची ही लोकविद्यालये संस्कृतीची मानवतेकडून दिव्यत्वाकडे वाटचाल घडवीत आहेत.
सध्या महाराष्ट्रात अस्तित्वात असणाऱ्या काही लोककलाकारांची माहिती आपण या विभागातून पाहणार आहोत.
लुप्त होत चाललेल्या लोकपरंपरेची थोडक्यात माहिती करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न!
Original content here is published under these license terms: | X | |
License Type: | Read Only | |
License Abstract: | You may read the original content in the context in which it is published (at this web address). No other copying or use is permitted without written agreement from the author. |