महागौरी

   नवदुर्गांमधील आठवे रूप म्हणजे महागौरी! शिवा, श्वेतांबरा हीदेखील महागौरीची नावे. दुर्गा म्हणून हिची पूजा महाअष्टमीच्या मंगल मुहूर्तावर केली जाते.

   एकदम तेजस्वी गोरा रंग असणारी महादुर्गा आदिशक्ती मानली जाते. तिच्या तेजाने सर्व विश्व प्रकाशमान झाले आहे. शुंभ-निशुंभ यांच्याकडून युद्धात पराभव पावल्यानंतर देवतांनी गंगा नदीच्या किनारी याच महागौरीची स्वतःच्या रक्षणासाठी आराधना केली. महागौरीच्या निखळ, निवळ गोरेपणाला शंख अथवा कुंद फुलांची उपमा देतात.

   महागौरीची वस्त्रे, आभूषणे देखील श्वेत रंगाची असतात. चतुर्भुजा असणाऱ्या महागौरीच्या उजव्या बाजूचा वरचा हातात अभयमुद्रेत असून खालच्या हातात त्रिशूळ आहे. डाव्या बाजूच्या वरच्या हातात डमरू आणि खालील हात वरमुद्रेत आहे. शिवा असल्यामुळे तिने त्रिशूल, डमरू हातामध्ये धारण केले आहेत. तिच्या शांत आणि स्नेहमय स्वरूपाचे वर्णन करताना म्हटले जाते

श्वेते वृषे समारूढा श्वेतांबर धरा शुचि: ।

महागौरी शुभदान्महादेव प्रमोददा ।।

   महागौरीने आठव्या वर्षी श्रीशंकर पतिस्वरूपात प्राप्त होण्यासाठी आठ वर्षे तप केले. ही महागौरी आठ वर्षे वयाची मानली जाते. ‘अष्टवर्षा भवेद गौरी’! हिचे वाहन बैल आणि सिंह दोन्ही आहेत. महागौरी तप करीत असताना ऊन, वादळ, पाऊस, वारा यामुळे काळी पडली. श्रीशंकर प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी तिला गंगाजलाने स्नान घालताच तिचा वर्ण तेजस्वी गौर होऊन सर्व जगात त्याची आभा फाकली. यानंतर ती पुन्हा तपाला बसली तेंव्हा तिच्या मधून एक काळी छाया बाहेर पडले. त्या छायेचे नाव ‘कौशिकी’!

   घोर अरण्यात तप करत असताना एकदा महागौरीच्या समोर एक भुकेलेला सिंह आला. समोर महागौरी पाहता त्याची भूक अजून खवळली. परंतु तिच्या तपोबलाने त्याला तिच्या जवळ जाता येईना. तो तिथेच वाट पहात बसून राहिला. अखेर खूप वाट पाहून तो क्षीण होऊन गेला. महादुर्गेचे तप संपले. तिने डोळे उघडून समोर पाहिले तर सिंह! तेव्हापासून ती सिंहावर आरूढ झाली.

   महागौरीच्या उपासनेमुळे सर्व पापांचा नाश होऊन अक्षय सुख आणि पुण्य लाभते. या देवीची उपासना असत्याचा नाश करून मानवी वृत्तीवर सत्याचा प्रभाव निर्माण करते. महागौरी धन ऐश्वर्य प्रदायी असून तिच्या कृपेने पूर्व जन्मीची पापे नष्ट होतात. या जन्मात शारीरिक-मानसिक बळाची वृद्धी होते. दुःख दारिद्र्याचा नाश होतो. महागौरीची उपासनेमुळे शरीरातील सोमचक्र जागृत होते. सीतेने श्रीरामांच्या प्राप्तीसाठी महागौरीची आराधना केली होती असे सांगितले जाते.

   नवरात्रामधील महाअष्टमीला आठ वर्षाच्या आठ कुमारिकांचे पूजन केले जाते. त्यांना हलवा पुरीचे जेवण देऊन नंतर वस्त्रे देऊन सन्मान केला जातो. महागौरीला पूजेमध्ये चमेली, केशराचे फूल अर्पण केले जाते. या दिवशी गुलाबी वस्त्रे नेसून सौभाग्यवती स्त्रिया सौभाग्य वृद्धीसाठी तिची आराधना करतात, तिला सौभाग्य सूचक उपचार अर्पण करतात. महागौरीचे प्रसिद्ध पीठ हरिद्वार जवळ ‘कनखल’ येथे आहे. हीच महागौरी गणपतीची जननी आहे. चला तर मग महाअष्टमीच्या मुहूर्तावर या स्नेहमय, शांत, मृदू परंतु अत्यंत दैदिप्यमान महागौरीचा जागर करूया –

माहेश्वरी वृषारूढा कौमारी शिखिवाहना ।

श्वेत रूप धरा देवी ईश्वरी वृषवाहना ।।

Theme: Overlay by Kaira