मत्स्य अवतार

Matsya saving Lord Manu

    ‘विष्णू दशावतार’ या लेखात आपण भगवान विष्णूच्या अवतारांची ओळख करून घेतली. हिंदू वर्षाचा तिसरा दिवस चैत्र शुद्ध तृतीया ही मत्स्य जयंती मानली जाते. विष्णूच्या प्रमुख दशावतारांपैकी पहिला अवतार मत्स्य या दिवशी अवतीर्ण झाला असे मानतात. पुराणांनुसार पृथ्वीला प्रलयापासून तारण्यासाठी भगवान विष्णूंनी हा अवतार घेतला. याची कथा अशी सांगतात –

    राजा सत्यव्रत नदीत स्नान करून जलांजली देत असताना त्याच्या ओंजळीत एक मासा आला. त्याने राजाला आपल्याबरोबर घेऊन जाण्याची विनंती केल्याने राजा त्याला कमंडलूमधून घरी घेऊन आला. दररोज हा मासा असाधारण रीतीने मोठा होऊ लागल्याने राजाने त्याला मूळ रूपात दर्शन देण्याची विनंती केली तेव्हा भगवान विष्णू प्रकट झाले. पुढे सात दिवसांनी होणाऱ्या प्रलयाची कल्पना त्यांनी सत्यव्रतास दिली. पृथ्वीवरील ठराविक बीजे, प्राणी, सप्तर्षी यांना घेऊन तू मी पाठवलेल्या नावेत बैस व त्या नावेची दोरी तू माझ्या शिंगाला बांध. यावेळी तू जे प्रश्न विचारशील त्या सर्वांची मी उत्तरे देईन असे सांगितले. यथावकाश सर्व गोष्टी याच क्रमाने घडून आल्या. परब्रह्माविषयी मत्स्याने राजाला जी माहिती दिली ती ‘मत्स्यपुराण’ म्हणून नावाजली जाते.

    सत्यव्रत राजाने वाचवलेल्या काही चांगल्या लोकांपैकी ‘राजा चाक्षुष’ या प्रमुख असून हाच राजा पुढे ‘मनु’ म्हणून प्रसिद्ध झाला. याच मनूचे वंशज ते ‘मानव’ किंवा मनुष्य. वैदिक साहित्यामध्ये मरणशील मनुष्यांमधील पहिला मनुष्य म्हणून मनुचा उल्लेख आहे. पौराणिक कालगणनेनुसार सृष्ष्टीनिर्मितीपासून सृष्टीविलयापर्यंत चौदा विभागांत कालाचे विभाजन केले असून त्या प्रत्येक विभागास ‘मन्वंतर’ म्हणतात.

    या मनुने भगवान विष्णूंनी सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टी नावेत घेतल्या आणि ती नाव मत्स्याच्या शिंगाला बांधली. माशाने ती नाव  हिमालयाच्या एका शिखरापर्यंत वाहून नेल्यानंतर मनुने ती एका हिमशिखराला बांधली. प्रलय ओसरल्यानंतर आपली कन्या ‘इला’ हिच्या ठिकाणी दहा पुत्र उत्पन्न केले आणि अशा पद्धतीने मनुष्य जन्माचा उद्भव झाला.

    या मत्स्य जयंतीच्या दिवशी ‘ॐ मत्स्याय मनुपालकाय नमः’ या मंत्राने मत्स्य अवतार प्रतिमेची किंवा भगवान विष्णूची पूजा करतात.

    मत्स्य अवतारामागे हयग्रीव राक्षसाची देखील कथा सांगितली जाते. या राक्षसाने एका ब्रह्माचे सारे वेदांचे ग्रंथ चोरले. या ग्रंथांच्या चोरीमुळे सर्वत्र अज्ञानाचा अंधःकार पसरला. त्यावेळी भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार धारण करून हयग्रीववध केला आणि वेद सुरक्षितपणे ब्रह्माकडे पोहाचवले असे सांगतात.

    परिवर्तनशीलता हा सृष्टीचा नियम. याच नियमानुसार कोणतीही उत्क्रांती घडून येते. श्री विष्णूच्या दशावतारांबाबत डार्विनचा ‘survival of the fittest’ हा उत्क्रांती नियम लागू होतो असे मानले जाते. प्राणीजीवनाची सुरुवात पाण्यामधील सूक्ष्म जीवांपासून सुरु होऊन ते पुढे प्रगत झाले. मत्स्य अवतारानंतरचे इतर ९ अवतार अभ्यासताना यात तथ्य असल्याचे जाणवते.

    दुसरा अवतार ‘कूर्म’ जाणून घेऊ पुढील लेखात. सर्व विष्णू दशावतारांविषयी वाचण्यासाठी ‘विष्णू दशावतार’ या विभागाला नक्की भेट द्या.

2 thoughts on “मत्स्य अवतार

Comments are closed.

Theme: Overlay by Kaira