नाग /साप – समज गैरसमज

   कोणतेही सरपटणारे जनावर सळसळत जाताना दिसले की सर्वात प्रथम अंगातून एक भीतीची लहर जाते. मानसशास्त्राच्या नियमानुसार आपला मेंदू त्याची  धोका म्हणूनच नोंद घेतो आणि लगेच आपली प्रतिक्षिप्त क्रिया उमटते .. ‘फ्लाईट ऑर  फ्लाय’! या नुसार आपण एकतर लांब पळून जाण्याचा प्रयत्न करतो किंवा सरळ एक काठी घेऊन त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न करतो. 

   जेव्हा मोकळ्या जागेत समोरासमोर सामना होतो तेव्हा पळून जाणे शक्य असते परंतु जेव्हा घरातील अडचणीच्या जागी असा नाग अथवा साप दिसला तर त्याचा मृत्यू अटळ असतो. आपल्या मनात  साप /नाग या प्राण्याविषयी असंख्य गैरसमजुती असल्याने आपण आपल्या सोयीसाठी त्याच्या जीवावर उठतो ,त्याला साक्षात मृत्यूदूत समजतो. नाग / साप अशासारखे प्राणी पर्यावरण साखळीतील एक महत्वाचा दुवा आहेत. उंदीर,घुशी अशासारख्या उपद्रवी प्राण्यांचा  ते फडशा पाडतात व धान्याची हानी टाळतात.एक प्रकारे पर्यावरणाचे संतुलन राखतात.  परंतु या नाग/सापांविषयी सामान्य लोकांच्या मनात अनेक गैरसमजुती आहेत. 

  • साप नाग डूख धरतात:

    साप /नागाचा मेंदू एवढा विकसित नाही की काही गोष्टी,माणसे लक्षात ठेऊन तो त्याच्यावर डूख धरेल. एकतर खाद्याच्या शोधात आणि दुसरे म्हणजे समागमोत्सुक मादीच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या स्त्रावाचा गंधाचा माग घेत साप /नाग येतात. 

  • सर्व सर्प विषारी असतात :

    आपल्याकडील सर्पाच्या फक्त ४ जाती विषारी आहेत. नाग, मण्यार, फ़ुरस  आणि घोणस. त्यातही ‘राजनाग’ हा सर्वात विषारी आहे. सापाच्या इतर जाती निरुपद्रवी आहेत. 

  • सर्प चावल्यास ताबडतोब मृत्यू येतो :

    बिनविषारी सर्प चावल्यास काहीही अपाय होत नाही. बेशुद्ध पडणे, नाडी  न लागणे अशी लक्षणे फक्त मनातील भीतीमुळे दिसून येतात. काही काळानंतर आपोआप बरे वाटते. विषारी सर्प जरी चावला तरी चावल्यापासून लक्षणे दिसेपर्यंत काही काळ जावा लागतो. त्यादरम्यानकाही प्राथमिक उपचार करून नंतर  प्रतिसर्पविष नसेतून दिले कि जीवावरच धोका टळतो

  • नागाचे /सापाचे विष मांत्रिक उतरवतो:

    कोणत्याही विषारी सर्पाचे विष अंगार, धुपार, गंडेदोरे, मंत्र तंत्र करून उतरत नाही. फक्त आणि फक्त वैद्यकीय उपचारच परिणामकारक असतात. मंत्रतंत्राच्या नादी लागल्यास जीव गमावण्याची वेळ येते. 

  • सर्पाच्या/नागाच्या विषाची सर्व प्राण्यांना विषबाधा होते :

    सर्पविषाच्या बाबतीत घोडा/ मेंढी हे प्राणी शरीरात शिरलेल्या विषाचा प्रतिकार करू शकतात. त्यांच्या रक्तावर प्रक्रिया करूनच प्रतिसर्प विष  (Antivenom) तयार केले जाते.

  • धामण शेपटीच्या काट्याने मनुष्यास इजा करते :

    धामण आपल्या शेपटीची स्काऊट गाठीप्रमाणे अढी  घालते,त्यात काटा वगैरे काही नसतो.

  • धामण दुभत्या जनावराच्या आचळांतील दूध पिते:

    साप /नाग कोणीही असो तो १००% मांसाहारी आहे. त्यामुळेच कोणताही साप अगदी नाग देखील दूध पित  नाही. फक्त आपल्या संस्कृतीने नागाला देवत्व प्रदान केल्यामुळे त्याला दुधाचा नैवेद्य दाखवतात. 

  • साप पापणी न हलवता एकटक पाहून संमोहित करतात :

    माती, गवत, पाणी अशासारख्या ठिकाणी वावरताना डोळ्याला इजा होऊ नये म्हणून यांच्या डोळ्यावर एक पारदर्शक पडदा असतो, त्यामुळे सापाचे डोळे पूर्ण मिटलेले दिसत नाहीत. याचा अर्थ तो आपल्याकडे पाहून संमोहन घालतो असा नव्हे.

  • गारुड्याने वाजविलेल्या पुंगीच्या तालावर नाग डोलतो :

    नागाला कान  नसतात. हात पाय देखील नसतात. त्याची दृष्टी देखील काही फुटावरील आपले खाद्य ओळखू शकेल इतपतच असते.त्यांना फक्त जमिनीवर निर्माण होणारी आघात कंपने त्वचेच्या माध्यमातून समजतात. त्या कंपनांना ते प्रतिसाद देत असतात. 

  • नागाचा /सापाचा पुनर्जन्म होतो :

    नागाला /सापाला घर्मग्रंथी नसतात. त्यांना घाम येत नाही. त्यांच्या शरीरातील टाकाऊ द्रव्ये त्वचेखाली साचतात आणि कात टाकण्याच्या स्वरूपात फेकून दिली जातात. कात टाकल्यानंतर सापाची त्वचा तरुण, नवीन चकचकीत दिसते. पण म्हणून काही त्याचा पुनर्जन्म होत नाही. 

  • गांडुळाला दोन तोंडे असतात :

    गांडूळ हा निरुपद्रवी सर्प असून त्याचे तोंड आणि शेपटीकडील  भाग सारखे असतात. परंतु त्यालाच काय कोणत्याच सापाला दोन तोंडे नसतात. याच गांडूळ सापाची जमिनीखाली पुरलेल्या धनाच्या लालचेपोटी तस्करी देखील केली जाते.  

  • नाग धनाचे रक्षण करीत फिरतो :

      पडक्या जागा ,अडगळीच्या जागा ,निर्मनुष्य जागा ही साप /नाग यांची वसतिस्थाने असतात. अशा जागांवर कधीतरी धन सापडले असेल तेव्हापासून हा गैरसमज.

  • नागाकडे ‘नागमणी’ असतो :

    नागमणी असा कोणताही पदार्थ अस्तित्वात नाही. झाडपाला विकणारे भोंदू वैदू जी वस्तू नागमणी म्हणून सांगतात , ती प्रत्यक्षात त्याच्या पित्ताशयात तयार होऊन विष्ठेद्वारे बाहेर फेकले गेलेले (Benzine acid) चे खडे असतात. 

   इतक्या साऱ्या गैरसमजुती ,अंधश्रद्धा क्वचितच एखाद्या प्राण्यासंदर्भात असतील. हे अज्ञानाचे, गैरसमजाचे वेटोळे दूर करून पर्यावरणातील या घटकाचे संरक्षण /संवर्धन करणे आपले कर्तव्य आहे.

Theme: Overlay by Kaira