नागपंचमी

Nag

   श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच ‘नागपंचमी’. महाराष्ट्रात या सणाला सासुरवाशिणी माहेरी येतात, नटतात, सजतात, झाडाला झोके बांधून झुलतात आणि भावाच्या समृद्धीसाठी ,संपन्नतेसाठी नागदेवाची पूजा करून प्रार्थना करतात. 

   श्रावण सुरु होताच ऊन पावसाचा खेळ रंगतो. धरणीमाता हिरवीगार, प्रसन्न होते आणि सर्वत्र एक मंगलमयी आल्हाददायक वातावरण पसरते. ‘नागपंचमी’ हा खास स्त्रियांचा मानला गेलेला सण. भारतीय सण कृषिकर्म, ऋतुचक्र, त्या ऋतूंमधील आहार या त्रिसूत्रीवर आधारलेले दिसून येतात. पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसात ‘नागपंचमी’  येते तेव्हा शेतीची कामे ऐन बहरात असतात. असेच एकदा शेत नांगरताना एका शेतकऱ्याच्या हातून नांगराचा फाळ लागून नागिणीची तीन पिल्ले मृत्युमुखी पडली,तेव्हा त्या नागिणीचा कोप शांत करण्यासाठी तिची पूजा केली जाते अशी आख्यायिका आहे.यमुनेच्या डोहामधील कालिया नागाचा पराभव करून याच दिवशी भगवान श्रीकृष्ण डोहामधून सुरक्षित वर आले, त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ देखील हा सण साजरा केला जातो असे काही ठिकाणी मानतात.

   सत्येश्वरी नावाची कनिष्ठ देवी,तिचा भाऊ सत्येश्वर .या सत्येश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला त्याच्या शोकात सत्येश्वरीने अन्न ग्रहण केले नाही. तेव्हा त्याने नागरूपात दर्शन दिले. त्याची सत्येश्वरीने पूजा केली. तेव्हा नागाने तिला वाचन दिले की जी स्त्री माझे भाऊ म्हणून पूजन करेल तिचे मी कायम रक्षण करीन. रक्षाबंधनाच्या देखील आधी भावा-बहिणीतील गहिऱ्या नात्याची ओळख हा सण करून देतो. या नात्याची लाडिक वीण लोकगीतांमधून समोर येते.

नागा रे भाऊराया ,तुला रे वाहिल्या मी लाह्या

नागा रे भाऊराया,तुला रे नैवेद्य गुळाचा

आता रक्षण करी माझ्या बंधूंच्या कुळाचा

नागपंचमीसाठी माहेरी आलेली माहेरवाशीण हातावर मेंदी रेखते, साजशृंगार करते आणि नागपूजेला जाण्यासाठी मैत्रिणींना साद घालते.

चल ग सये वारुळाला ,नागोबाला पुजायला

    याच नागदेवाची घरी देखील पूजा केली जाते. नागाचे चित्र ,मातीची प्रतिमा ,किंवा चंदन ,हळद एकत्र करून भिंतीवर काढलेली नागाची चित्रे यांची दुर्वा, आघाडा, पिवळी फुले वाहून साग्रसंगीत पूजा केली जाते. पावसाळ्यात पचनशक्ती मंद झाल्याने उकडलेल्या पदार्थांचा (दिंड -पुरणाचे सारण भरून उकडलेला कणकेचा पदार्थ, उकडीचे डाळवडे) असा नैवेद्य दाखविला जातो. तसेच पौष्टिक असूनही पचायला हलक्या अशा ज्वारीच्या लाह्यांना या सणाला विशेष महत्त्व आहे. या लाह्या आहारात देखील वापरतात, पण सुरवातीला या लाह्या नागदेवाला वाहून त्याची पूजा केली जाते. 

    भारतीय पुराणांमधून अनेक ठिकाणी नागाचे संदर्भ आढळतात. आपली पृथ्वी शेषाच्या फण्यावर तोललेली आहे असे समजले जाते. अनंत ,वासुकी ,कम्बल ,पदमनाभ , शंखपाल ,धृतराष्ट्र ,तक्षक ,कालिया अशा आठ नागांची पूजा केली जाते. नागासंबंधी असणाऱ्या श्लोकात मात्र या नावात थोडा फरक आहे.

वासुकी:तक्षकश्चैव कालियो मणिभद्रक: |

ऐरावतो,धृतराष्ट्र ,कार्कोटक धनंजयो ।।

या श्लोकात नागाची नावे वासुकी, तक्षक, कालिया, मणिभद्रक, ऐरावत, धृतराष्ट्र, कार्कोटक, धनंजय अशी आढळतात.यातील समुद्रमंथनामध्ये दोरी म्हणून वापरला गेलेला वासुकी, परीक्षित राजाला दंश करणारा तक्षक, बालकृष्णाने मर्दन केलेला कालिया सर्वश्रुत आहेत.

    या नागपंचमीच्या सणाला सांगली जिल्ह्यातील बत्तीस -शिराळा येथे एक विशिष्ट प्रथा पाळली जात होती. होती म्हणण्याचे कारण कालप्रवाहात ही प्रथा लुप्त झाली आहे. या गावातील काही मंडळे नागपंचमीच्या महिनाभर आधी डोंगरदऱ्यात फिरून नाग ,धामण जिवंत पकडून आणत .महिनाभर त्यांची योग्य काळजी घेत.आणि नागपंचमीच्या दिवशी शिराळ्याच्याग्रामदैवतांची पूजा झाल्यानंतर सर्व १००-१२५ नागांची एकत्र मिरवणूक काढीत . मिरवणुकीनंतर या नागांचे खेळ केले जात . त्यानंतर सर्वात उंच फणा काढणारा नाग,सर्वात लांब नाग अशा मंडळांना बक्षिसे जाहीर करीत. हे खेळ पाहण्यासाठी आबालवृद्धांची ,अगदी परदेशी नागरिकांची देखील गर्दी होत असे. काळानुसार वन्य जीव संरक्षण कायद्यांवये ही प्रथा आता बंद पडली आहे. महाराष्ट्रातील नागपंचमी नागपुजेने साजरी होते. नाग या सरपटणाऱ्या प्राण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. खरे तर नाग हा उंदरांचा शत्रू असल्याने शेतकऱ्याचा मित्र असतो. शेतामधील उंदीर खाऊन तो पिकाचे रक्षण करतो.

    नागपंचमीला इतर काही राज्यामध्ये देखील काही विशिष्ट प्रथा पाळल्या जातात. काशीमध्ये नागकूप नावाचे तीर्थ आहे. नागपंचमीच्या दिवशी विद्वान लोक शास्त्रचर्चा करतात आणि त्यानंतर नागकूपावर जाऊन नागाची पूजा करतात. प्रसिद्ध वैयाकरण पतंजली शेषाचा अवतार असून त्याचे वास्तव्य नागकूपात आहे असे मानले जाते. बंगालमध्ये सर्पदेवता मनसादेवीची पूजा केली जाते. राजस्थानमध्ये पीपा ,तेजा या नागदेवांची पूजा केली जाते. नागपंचमीला जमीन न खणणे, न चिरणे, तवा अग्नीवर न ठेवणे असे रिवाज पाळले जातात. सळसळणारा पिवळाजर्द अथवा काळा नाग जेव्हा डौलदार फणा उभारून डोलत फुत्कार टाकतो, तेव्हा आपल्या मनात धडकी भरते आणि आपण आपोआप त्याला रक्षकाची भूमिका प्रदान करतो.

    पृथ्वीचा आधार, रक्षणकर्ता अशी नागदेवतेची पुराणातील वर्णने असोत अथवा सद्यस्थितीतील नागपंचमीला होणारे त्याचे पूजन असो, प्रत्येक भारतीय स्त्रीच्या मनाचा एक कोपरा या जातिवंत प्राण्याने व्यापला आहे. त्याच्या कथा पुराणात ती रमते. नागाला आपला रक्षणकर्ता भाऊ मानते. जेव्हा एखादा जातिवंत नाग फणा काढून पुंगीच्या तालावर डोलू लागतो तेव्हा नकळतच आदरयुक्त भीतीने हात आपोआप जोडले जातात.

    जग सुधारले,सणाच्या रिती पद्धती बदलल्या, विवाहित मुलींना सासर -माहेर या घरामधील अंतर जाणवेनासे झाले. तरीही माहेरघरपासून लांब असणाऱ्या एखाद्या सासुरवाशिणीचे डोळे ‘पंचमीचा सण आला डोळे माझे ओले’ या काव्यपंक्ती ऐकताच भरून येतात!

    नाग या प्राण्यांविषयीचे समज-गैरसमज आणि शास्त्रीय माहिती जाणून घेऊ पुढील लेखात!

One thought on “नागपंचमी

Comments are closed.

Theme: Overlay by Kaira