नरसिंह जयंती

    वैशाख शुद्ध त्रयोदशी युक्त चतुर्दशी ही तिथी नरसिंह जयंती म्हणून ओळखली जाते. श्री भगवान विष्णूच्या दशावतारापैकी चौथा अवतार हा नरसिंह अवतार मानला जातो. नरसिंह अवताराचा उल्लेख आपल्याला श्रीमद्भागवत, ब्रम्हांडपुराण, वायुपुराण, लिंगपुराण, मत्स्यपुराण, पद्मपुराण, देवीभागवत, नरसिंहपुराण या प्राचीन ग्रंथांमध्ये दिसून येतो . पृथ्वीतलावर जेव्हा जेव्हा दुष्ट शक्ती बळावते तेव्हा तेव्हा धर्मरक्षणार्थ सुष्ट शक्तींचे रक्षण करण्यासाठी , त्यांना बळ पुरवण्यासाठी जगत्पालक श्री विष्णूंना उतरावे लागले. भक्त रक्षणार्थ श्री विष्णूंचे पृथ्वीतलावर उतरणे म्हणजेच अवतीर्ण होणे, अवतार धारण करणे. सनातन हिंदू संस्कृतीमध्ये श्री भगवान विष्णूचे दशावतार हे जीवसृष्टीच्या प्रगतीचे उत्क्रांतीचे टप्पे निदर्शित करतात. प्रलयानंतर पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण होताना प्रथम जलचर( मत्स्यावतार), उभयचर( कूर्मावतार), भूचर (वराह अवतार )असे टप्पे आपल्याला दिसून येतात. या वराह अवतारा नंतर चौथा अवतार येतो तो नरसिंह अवतार!नरसिंहालाच नरहरी, नरसोबा असेदेखील म्हणतात.

   नरसिंह अवताराचा उत्क्रांतीमधील हा टप्पा हा सजीवाची पशूअवस्थेकडून मानव अवस्थेकडे होणाऱ्या वाटचालीचा एक महत्त्वाचा टप्पा आपण मानू शकतो . या विष्णू अवतारामध्ये सजीवाची चार पायांवरून दोन पायावर उभे राहण्याची प्रगती दिसून येते. तसेच वस्तू पकडण्यासाठी हाताचा उपयोग, शस्त्र म्हणून नखांचा वापर या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी उत्क्रांतीचे महत्त्वाचे टप्पे दर्शवतात . मानवाची वन्य स्थिती कडून नागर स्थितीकडे होणारी (रानटी + मानव) अवस्था म्हणजेच नरसिंहावतार. डॉक्टर पूर्वा अष्टपुत्रे यांच्या मतानुसार आंध्रा मधील बलवान असणाऱ्या ‘चंचू’ या वन्य या जमातीला अभिजन व्यवस्थेत सामावून घेण्याचे द्योतक म्हणजे हे नरसिंह रूप आहे . आंध्रा मधील’ कोडामोतू’ येथे शिल्पपटात सिंहाच्या अंगावर शंख , चक्र कोरलेले तर छातीवर श्रीवत्स चिन्ह देखील दिसते. प्राचीन काळच्या अनेक राजकुलांचे चे कुलदैवत नरसिंह होते. राज्यकारभार चालविण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या शक्तिशाली अशा रूपाची उग्र नरसिंहाच्या रूपात प्रचिती येते.

   आपल्या सर्वांना नरसिंह जन्माची प्रल्हाद रक्षण आणि हिरण्यकश्यपू वधाची कथा चांगलीच माहित आहे. त्याची पुनरावृत्ती टाळतानाच आपण एक होलिकेची या संदर्भातील कथा पाहूया .होलिका ही भक्त प्रल्हादाची आत्या म्हणजेच हिरण्यकश्यपूची बहीण . तिला अग्निभय नसते म्हणजेच अग्नी तिला जाळू शकणार नाही असा वर तिला प्राप्त झालेला असतो. या वराचा सत्कार्यासाठीच उपयोग करावा अशी त्यामागील अट देखील असते. प्रल्हादाला कोणत्याही उपायाने मृत्यू येत नाही असे पाहून हिरण्यकश्यपू तिला सुचवितो कि तिने प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्निप्रवेश करावा म्हणजे प्रल्हाद अग्नीमध्ये जाळून जाईल परंतु होलिकेस अग्नीचे वरदान असल्याने ती सुरक्षित राहील. मत्सराने ग्रासलेल्या होलिकेस आपल्या वरामागील अटीचा विसर पडतो .आणि ती वाईट हेतूने प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नी प्रवेश करते ,तत्क्षणी होलिका कापरासारखी जळून जाते परंतु प्रल्हाद सुखरूप बाहेर येतो. आपल्या वराचा दुरुपयोग करणाऱ्या होलिकेचे दहन झाले या आठवणी प्रित्यर्थआपण दरवर्षी होळी साजरी करतो.

   अहंकार ,मद , अत्याचार यांची परिसीमा गाठणाऱ्या हिरण्यकश्यपूला शेवटी मृत्यू हेच सत्य असल्याचे सिद्ध करून देणारा हा नरसिंहावतार. अन्यथा हिरण्यकश्यपूने अमरत्वाच्या जवळपास जाणाराच वर मागून घेतला होता. परंतु श्रद्धा , भक्ती, उपासना यांचे पारडे कायमच जड राहिले आहे. प्रल्हादाच्या भक्तीने नामस्मरणाने, असीम श्रद्धेने चराचरात बसलेल्या परमेश्वराचे अस्तित्व अधोरेखित होते. या प्रसंगातील नरसिंह स्वरूप उग्र आहे.

   हिरण्यकश्यपूचा वध केल्यानंतर नरसिंहाची रक्ताने बरबटलेले नखे प्रचंड दाह करू लागले , कशानेही ती आग शांत होईना तेव्हा श्री शंकराने त्यांना कमळाचे देठ आणून त्याचा रस काढून दिल्याचे सांगितले जाते. या रसामध्ये त्याने बोटे बुडवल्यानंतर त्याच्या बो टाची आग शांत झाली असे सांगतात. तेव्हा पासून कमळ हे फुल नरसिंहाला प्रिय आहे असे मानले जाते. नरसिंहक्रोधाने बेभान झाला होता त्यांना शांत करण्यासाठी प्रल्हादाने नरसिंहाच्या डोक्यावर हात ठेवून,” भगवंत आता शांत व्हा” अशी विनंती केल्याची कथा आहे. परंतु या विनंतीनेही त्याचा क्रोध शांत होईना शेवटी नरसिंहाचा अनावर क्रोध शांत करण्याची कामगिरी महादेव शंकरावर सोपविण्यात आली. शंकरांना पाहूनही नरसिंहाचा क्रोध शांत झाला नाही. शेवटी महादेवाने अक्राळ-विक्राळ बैलाचे रूप धारण केले आणि नरसिंहाना आपल्या शेपटीत गुंडाळून ते पाताळात गेले खूप काळ शेपटीत तसेच जखडून राहिल्यानंतर शेवटी नरसिंहाची ताकद संपुष्टात आली. भानावर आल्यानंतर त्यांनी शंकरांना ओळखले आणि शांत होऊन महादेवांना नमन केले..

    असा हा उग्र आणि शक्तिशाली मानला जाणारा नरसिंहावतार!! त्याचे स्वरूप कायम दुभंगलेल्या खांबातून प्रकट होणारा, अजस्त्र जबडा, हिरण्यकश्यपूला मांडीवरघेऊन तीक्ष्ण नखाने त्याचे पोट फाडून कोथळा बाहेर काढताना असेच आपल्या डोळ्यासमोर येते. पण थांबा… वेगवेगळ्या मंदिरात नरसिंहाच्या वेगवेगळ्या स्वरूपातील मूर्ती आपल्याला दिसतात. त्यांच्या विविध स्वरूपांची चर्चा पुढील लेखात !!

    तोपर्यंत या करोना काळात आपली शारीरिक आणि मानसिक शक्ती वाढविण्यासाठी नरसिंहाची आपण उपासना करूयात —

ओम उग्रसिंहाय विद्महे ।वज्र नखाय धीमहि ।

तन्नो नृसिंह प्रचोदयात ।।

2 thoughts on “नरसिंह जयंती

Comments are closed.

Theme: Overlay by Kaira