नरसिंह शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर येते ती भला मोठा खांब दुभंगून बाहेर आलेली एक अर्धमानवी आकृती. जिचे तोंड सिंहाचे आहे. मानेभोवती दाट आयाळ, तीक्ष्ण सुळे, उग्र चर्या, आग ओकणारे नेत्र, मांडीवर हिरण्यकश्यपू, आपल्या टोकदार नखांनी या नरसिंहाने त्याचा कोथळा बाहेर काढलेला. बघताक्षणीच हे रूप पाहून मनात धडकी भरते. पण जर दुष्टाचा विनाश करायचा तर सात्त्विक असून कसे चालेल? विष्णुभक्त प्रल्हादाला संपविण्याचा ज्याने चंग बांधला होता आणि त्याच्या माध्यमातून भगवान विष्णूंचे नामोनिशाण हिरण्यकश्यपू मिटवू पाहत होता. आपल्या भक्ताचे रक्षण करण्यासाठी भगवान धावून येतातच.
पण म्हणून काही नरसिंहाचे हे एकच रूप आपल्याला सर्वत्र दिसत नाही. दक्षिण भारत, महाराष्ट्र, उत्तराखंड, अगदी पाकिस्तान मधील मुलतान येथे देखील नरसिंह मंदिर आहे. परंतु या प्रत्येक मंदिरामधील मूर्ती मात्र वेगळ्या स्वरूपात असल्याचे दिसून येते. भगवान विष्णूंच्या दशावतारांमध्ये नरसिंह या अवताराचे जितके वैविध्य दिसून येते, तितके दुसऱ्या कोणत्याच अवताराच्या स्वरूपांमध्ये दिसून येत नाही.
स्थूल मानाने पाहिल्यास स्थौण नरसिंह, गिरिज नरसिंह, केवल नरसिंह, विदरण नरसिंह, लक्ष्मी नरसिंह, योग नरसिंह, नृत्य नरसिंह अशा विविध स्वरूपात आपल्याला नरसिंह मूर्ती दिसून येतात. यामधील काही रूपे उग्र आहेत तर काही रूपे शांत आहेत.
सर्वसाधारणतः स्थौण रूप दिसून येते, जे वर वर्णन केले ते अत्यंत उग्र आणि क्रूर आहे. अतिशय आक्रमकपणा या रूपामध्ये आढळतो. या अशा उग्र रुपामुळेच ज्या घराण्यामध्ये नरसिंह कुलदैवत आहे,त्यांचे कुलाचार अत्यंत कडक असतात. सोवळे-ओवळे कटाक्षाने पाळले जाते. यामध्येही जरासा सूक्ष्म भेद दिसून येतो. खांब दुभंगून येणाऱ्या मूर्तीला’ स्थौण मूर्ती’ म्हणतात तर हिरण्यकश्यपूचे पोट फाडत असणाऱ्या स्वरूपास ‘विदरण नरसिंह‘ म्हटले जाते.
लक्ष्मी नरसिंह हे दुसरे रूप जे शांत आणि सोज्वळ असे आहे. नरसिंह हा विष्णूचा अवतार आहे हे त्याच्या वाम अंकी बसलेल्या लक्ष्मी वरून सहज समजते. या दैवताबद्दलची जनमानसातील एक पालनकर्ते दैवत म्हणून कीर्ती व्हावी आणि त्याला मान्यता मिळून या दैवताची समाजातील लोकांनी भक्ती,पूजन करावे या हेतूने हे लक्ष्मी नरसिंह रूप रूढ झाले असावे. दक्षिणेकडील अनेक मंदिरांमध्ये लक्ष्मी नरसिंहाची मूर्ती आपल्याला दिसते. सिंहासनाधिष्ठित शांत मुद्रेचा नरसिंह आणि त्याच्या वाम अंकावर विराजमान असणारी श्री लक्ष्मी साक्षात लक्ष्मी नारायणाचे दर्शन घडवितात. नरसिंहाच्या या रूपाची संसारी लोकांनी आवर्जून पूजा करावी म्हणजे त्यांना ऐहिक तसेच पारमार्थिक दोन्ही फळे प्राप्त होतात.
‘केवल नरसिंह ‘ या स्वरूपात आपल्याला नुसता उभा असणारा एकटा नरसिंह दिसतो. हा नरसिंह शांत स्वरूपात दिसतो . डॉक्टर पूर्वा अष्टपुत्रे यांच्या सिद्धांतामधील आंध्र प्रदेशातील चंचू या वन्य जमातीला अभिजन प्रवाहात सामील करून घेण्याच्या सिद्धांताचे प्रतिनिधित्व ही मूर्ती करत असावी असे वाटते.
नरसिंहाची सर्वात भव्य मूर्ती प्राचीन विजयनगरची राजधानी हंपी येथे आपण पाहू शकतो. उत्तुंग आणि भव्य असणाऱ्या या नरसिंह मूर्तीचे स्वरूप जरी उग्र असले तरी तो योगमुद्रेत बसलेला, गुडघ्याला योगपट्टीका बांधलेला असा दिसतो. डोळे मात्र बटबटीत बाहेर आलेले आहेत. आज ही मूर्ती आपल्याला फक्त नरसिंहाची मूर्ती दिसते परंतु पूर्वी त्याच्या डाव्या मांडीवर लक्ष्मीची मूर्ती देखील असावी, जी नंतर उद्ध्वस्त केली गेली असावी. आजही आपण नरसिंहाच्या खांद्यावर लक्ष्मीच्या बोटांचे अवशेष दिसतात.
महाराष्ट्रातील सोलापूरनजीक नीरा नरसिंगपूर हे नरसिंहाचे जागृत स्थान आहे. येथे आपल्याला नरसिंहाची द्विभुज मूर्ती वीरासनात बसलेली दिसते. तर सांगली नरसिंहपूरच्या मूर्तीला ’ ज्वाला नरसिंह ‘असे म्हणतात.या विविध रुपांखेरीज नरसिंहाची अजून काही वेगळी रूपे देखील काही मंदिरामधून दृष्टीस पडतात.
पुणे जिल्ह्यातील रांजणी गावातील ब्रह्मे या गृहस्थांच्या घरातील नरसिंह चतुष्पाद आहे. परभणी येथील पिंगळी येथे उडत्या गरुडाच्या पाठीवर बसलेला नरसिंह आहे.
एकाच अवताराची इतकी विविध रूपे फार कमी देवतांच्या बाबतीत दिसून येतात. भक्त प्रल्हादाने त्याच्या पित्याला सांगितल्याप्रमाणेच हा नारायण जळी, स्थळी काष्ठी पाषाणी वसलेला आहे. आपल्या असंख्य नेत्रांनी तो भक्ताचे रक्षण करीत आहे. कितीही अमरतेच्या जवळपास जाणारा वर मागून घेतला तरी अहंकार, मद, अत्याचार याचा अंत घडून आणण्यासाठी हा नारायण कायमच तत्पर आहे. कितीही अमरतेचा हव्यास धरला तरी प्रत्येक जीवनाचे मृत्यू हेच सत्य आहे.
सुष्टाचे रक्षण आणि दुष्टाचे निर्दालन हाच विष्णू अवताराचा कायम उद्देश आहे आणि राहीलही. आपल्या हाती आहे ते फक्त नम्र भावनेने या जगत्पालकाच्या पायी नतमस्तक होणे आणि त्याची प्रार्थना करणे.
पुढील लेखात पाहूया ‘शरभ’ या वैशिष्ट्यपूर्ण नरसिंह रूपाबद्दल !!!
Original content here is published under these license terms: | X | |
License Type: | Read Only | |
License Abstract: | You may read the original content in the context in which it is published (at this web address). No other copying or use is permitted without written agreement from the author. |