परंपरा – ओळख

    आपली राष्ट्रीय प्रतिज्ञा म्हणताना त्यामध्ये एक सुंदर वाक्य आहे जे आपण विशेष जोर देऊन तालासुरात म्हणतो – “माझ्या देशातील समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन.” खरंच! ‘परंपरा’ – काय सूचित होते या शब्दातून? हा शब्द वापरण्याचा नेमका उद्देश काय? यासाठी प्रथम परंपरा म्हणजे काय हे जाणून घेतले पाहिजे.

    आदिमानवापासून सद्यमानवापर्यंत उत्क्रांती होत होत अनेक बदल झाले. या सर्व प्रक्रियेमध्ये मानवामध्ये काही गुण वांशिक पद्धतीने आले तर काही नवीन गुण मानवाने संपादित केले. जीवनार्थ कलहात यशस्वी होण्यासाठी हे दोन्ही मिळून उपयुक्त ठरले, त्यांनाच पुढे ‘परंपरा’ म्हणले गेले. मागच्या मानवी पिढीकडून पुढच्या पिढीस प्राप्त झालेली पद्धती म्हणजे परंपरा.

    सर्व मानवी संस्कृती म्हणजे परंपरा. या परंपरेमध्ये काळानुसार काही दोष, काही त्रुटी आढळून आल्या. त्या नंतरच्या पिढीने नवीन मानसिक तसेच भौतिक साधने शोधून त्यांच्या पद्धती विकसित केल्या. त्याला त्यांनी नवी परंपरा असे नाव दिले. मानवी जीवनाच्या संस्कृतीच्या सर्व शाखा – जुनी परंपरा -> परिवर्तन -> नवी परंपरा अशा चक्रात अव्याहत फिरत असतात. परंपरांमुळे सामाजिक तसेच सांस्कृतिक वैशिष्ट्यांचे सातत्य राखले जाते. जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे जतन करण्यासाठी दिलेला परंपरा हा सांस्कृतिक वारसा असतो.

    कोणत्याही परंपरांना विशिष्ट प्रतीकात्मक अर्थ असतो. भारतामधील विविध प्रदेशांमधील प्रत्येक समाजातील लोकांचा काही गोष्टी आवर्जून करण्यावर भर असतो तर काही गोष्टी कटाक्षाने टाळल्या जातात. आवर्जून केल्या जाणाऱ्या अनेक गोष्टींमागे एखादे सकारात्मक कारण असते तर टाळल्या जाणाऱ्या अनेक गोष्टींमागे हमखास एखादी नकारात्मक घटना आढळून येते. रूढी, प्रथा या परंपरेच्या बहिणी. यांच्याद्वारे सामाजिक वर्तनाचे नियमन केले जाते.

    परंपरागत लोकरिती, रूढी, नैतिक आचारसंकेत, विधिनिषेध, संस्थात्मक वर्तन प्रबंध, तत्त्वज्ञान, धार्मिक समजुती, श्रद्धा या सर्व गोष्टींमुळे समाजातील व्यक्तींच्या आचारविचारांत, उद्दिष्टांत सारखेपणा येऊन समाज जीवनास स्थिरपणा लाभतो.

    या विभागातील लेखांमधून आपण भारतातील, विशेषतः महाराष्ट्रातील अनेक परंपरांचा मनोरंजक वेध घेणार आहोत. त्याची प्रतीकात्मकता उलगडण्याचा प्रयत्न करतानाच त्यामधील शास्त्रीय आधाराचा धागा देखील शोधून काढण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Theme: Overlay by Kaira