पिंगळा

पांगुळ

   रात्र नुकतीच सरत आलेली असते. अजून तांबडेदेखील फुटायचे असते. इतक्या ‘पिंगळा’वेळी खोपटीमधील ‘पिंगळा’ माणूस जागा होतो. खांद्याला भिक्षेची झोळी, एका हातात कंदील आणि दुसऱ्या हातात ‘कुडमुडं’ (डमरू) घेऊन मागणीसाठी निघतो. धोतर, बंडी, त्यावर काळं जाकीट, डोक्यावर लांबरुंद फेटा आवळून बांधलेला, फेट्यावर चांदीचे, पितळेचे मुखवटे, नाणी असलेली पट्टी (यालाच चांद असे म्हणतात), कपाळभरून पांढरेशुभ्र भस्म आणि त्यावर कुंकवाचा टिळा अशा वेषात हे लोक पहाटेच्या पण आधी कुडमुडं वाजवत आपण आल्याची वर्दी गावकऱ्यांना देत परंपरेची चाल पुढे नेण्यासाठी ‘मागतं’ मागतात. 

   पिंगळा अथवा पांगुळला सूर्याचा सारथी अरुण याचे प्रतिनिधी मानले जाते. हा सूर्याचा सारथी पांगळा असल्याचा समज असल्याने त्याच्या प्रतिनिधीला ‘पांगुळ’ म्हणले जाते. भल्या पहाटे गावात येणारा हा भिक्षेकरी कोणीही पैसे अथवा धान्य स्वरूपात भिक्षा दिली की स्वतःभोवती गिरकी घेऊन उडी मारतो. तेव्हा आपण समजावे की आपण दिलेले ‘पाऊड’ (दान) पावले. पारंपरिक पद्धतीने आपले शुभ चिंतन करून तो याप्रकारे पावती देतो 

“पांगुळ आला वं माय 

दान दे वं माय 

शकुन जाणून घे वं माय 

तुझं भलं व्हईल वं माय”

अशी हाक मारीत, हातातील कुडमुडे वाजवीत तो शकुन ऐकण्याची गळ घालतो. त वरून ताकभात ओळखण्याची जन्मजात चलाखी तो शकुन सांगण्यासाठी वापरतो. अडचणीत असणाऱ्या माणसाला तेवढाच धीर येतो, आधार वाटतो. त्याचे मनोबल उंचावते. दिवसभरात येणाऱ्या अडचणींना तोंड द्यायला तो खंबीरपणे उभा राहतो. 

   मराठी साहित्यात तेराव्या शतकापासून पांगुळाचा उल्लेख सापडतो. सर्व संतांनी पांगुळांवर रूपके रचलेली दिसून येतात. स्वामी समर्थ मात्र पांगुळ या शब्दाचे आध्यात्मिक परिभाषेत वर्णन करताना म्हणतात, 

“मी पणाचे मोडले पाय। म्हणून पांगळा जालो ।।

तू पणाची कीर्ती जेई । ऐकुनिया शरण आलो ।।”

महानुभाव पंथाचे पहिले आचार्य नागदेवाचार्य यांनी एका प्रसंगी पांगुळाचा वेष धारण केल्याचे सांगतात. 

   पांगुळ गाणी म्हणून परमार्थाचा उपदेश करतात. हेच पांगुळ दिवाळीनंतर येणाऱ्या द्वादशीला नंदीची विधिपूर्वक पूजा करून त्यांच्या डोक्यावर शिवलिंग बांधतात आणि फेरी काढतात. या फेरीच्या वेळी ते कसरतीचे खेळ करतात. वासुदेवाप्रमाणेच पांगुळांना आणि इतर धर्मजागृतीचे काम करणाऱ्या मागत्यांना दान दिले की पुण्यप्राप्ती होते ही श्रद्धा सर्वसामान्य लोकांची असते. 

   डॉ. रा. चिं. ढेरे (लोकसंस्कृती उपासक – पृष्ठ क्र १५९) पांगुळासंबंधी लिहितात – पांगुळ आपल्या योगक्षेमासाठी याचना करतो आणि कोणी वस्त्रप्रावरण, पै-पैसे दिले की तो चक्रासारखा फिरून उड्या मारतो. 

“पाऊS पावले ।पाऊS पावले ।

जोगाईच्या अंबाबाईला पाऊS पावले ।”

असे म्हणून  पाऊS म्हणजे दान अथवा भेटवस्तू देवदेवतांना पोचविल्याची पावती देतो. पांगुळ अनेकदा झाडावर अथवा भिंतीवर बसून पहाटे रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्यांजवळ दान मागतो. पिंगळा (कुडमुड्या जोशी) आणि पांगुळ यांच्यात काही साम्यभेद आढळून  येत असले तरीही पांगुळ हाच ‘बुडबुक्कल वारू” म्हणून आंध्रात ओळखला जातो.

   पहाटे पिंगळा पक्षी जेव्हा ओरडतो तेव्हा तो भविष्यासंबंधी काही सुचवीत असतो अशी समजूत प्रचलित आहे. पिंगळा पक्ष्याची भाषा लोक्ज्योतिषांना समजते असे मानले जाते. यावर विश्वास ठेऊन लोक शकुन विचारतात आणि दान देतात. 

   या भटक्या समाजामध्ये जातपंचायतीचे वर्चस्व आजही टिकून आहे. गावच्या जत्रांमधून जातपंचायती बसून न्यायनिवाडा करतात. परंतु काळाच्या ओघात या पंचायती मवाळ भूमिका घेताना दिसतात. शिक्षेचे स्वरूप अमानवी नसून मानवतेला धरून असते. मांसाहार प्रिय असणारी ही जमात असून घरात नवागत बाळाचे स्वागत केले जाते. पाचवीच्या दिवशी जात बांधवाला मुलगी झाली असेल तर बकरीचे आणि मुलगा झाला असेल तर बोकडाचे जेवण दिले जाते. जात पंचायतीच्या माध्यमातून चालविली जाणारी भिशी हे एक मोठे वैशिष्ट्य या जमातीचे सांगतात. अक्षरशः लाखोंची उलाढाल अत्यंत नेकीने व सचोटीने होते. पूर्वी या समाजात विधवांचे पुनर्विवाह होत नसत. पण आता जातपंचायतीने ‘म्होतर’ लावण्याचा निर्णय दिला आहे.   

   पोटापाण्यासाठी गावोगाव भटंकती करणाऱ्या या समाजातील पुढची पिढी दान मागण्यास राजी नाही. तसेच आजच्या युगात शकुनावर कोणाचा विश्वासदेखील नाही. पारंपरिक शकुन भविष्याचा धंदा सोडून वेगवेगळ्या उद्योगधंद्यांच्या वाटा नवीन पिढी चोखाळत आहे. सैन्यात भरती होत आहेत. मिरवणुकीत घोडे नाचवण्याचे कसब दाखवित आहेत. आपल्यापुरती रोजीरोटी कमावून स्थिर आयुष्य जगण्याचे स्वप्न पाहत आहे. 

   खरंच! पिंगळ्यांच्या पालावर पहाट फुटतीये, पिंगळा पक्षी ओरडून त्यांनाच शुभशकुन सांगतो आहे. 

Theme: Overlay by Kaira