पितृपक्ष आणि कावळा

Kawla

   पितृपक्ष सुरु झाला की कावळ्याचा भाव एकदम वधारतो. एरव्ही अशुभ, अमंगल मानल्या जाणाऱ्या कावळ्याला अगदी अगत्याने अन्न भरविण्यात येते. जिकडे तिकडे कावळ्याची चर्चा होताना दिसते. का या कावळ्याचा मृत व्यक्तीच्या आत्म्याशी संबंध जोडला जातो? मनुष्याच्या मृत्यूनंतर काकबाळी, काकस्पर्श या सर्वामध्ये कावळ्याची नेमकी भूमिका काय? थोडा विचार केला तर यामागे काही पौराणिक कथा, काही समज, गैरसमज दिसून येतात, काही शास्त्रीय भूमिका देखील मांडलेल्या दिसतात. तरीदेखील गैरसमजाचे जाळे तोडून शास्त्रीय दृष्टीने अधिक संशोधन होणे गरजेचे आहे.

   कावळ्याचा जन्म वैवस्वत कुळात झाला असे मानले जाते. सध्याचे वैवस्वत मन्वंतर चालू असेपर्यंत कावळा यमाचा द्वारपाल आहे. मृताच्या पिंडाला काकस्पर्श झाल्याखेरीज त्याच्या आत्म्यास यमद्वारी प्रवेश मिळत नाही. गरुडपुराणानुसार कावळा हा यमराजाच्या संदेशवाहक आहे. हिंदू पुराणानुसार कावळा हा देवराज इंद्र याचा पुत्र जयंत याने प्रथम कावळ्याचे रूप धारण केले. या कावळ्याने वनवासात असणाऱ्या सीतेला जखमी केले. त्यावर सीतेने त्याला तुला अशुभ समजले जाईल तसेच तुला कोणी स्पर्श करणार नाही असा शाप दिला आणि मृगया करून परत आलेल्या श्रीरामचंद्रापाशी कावळ्याची तक्रार केली. श्रीरामचंद्रांनी जवळच पडलेली दर्भाची काडी फेकून कावळ्याला मारली. त्या काडीने कावळ्याच्या एका डोळ्याचा वेध घेतला. तेव्हापासून त्याला ‘एकाक्ष’ नाव पडले. यानंतर जयंताने आपण केलेल्या कृत्याबाबत श्रीरामाची माफी मागितली. तेव्हा श्रीरामांनी त्याला उ:शाप दिला. मनुष्य मृत झाल्यानंतर त्याच्या पिंडाला तू स्पर्श केल्याखेरीज त्याचा आत्मा मुक्त होणार नाही. याच वेळी हे दर्भाची काडी देखील महत्त्वाचे कार्य करेल. तेव्हापासून कावळ्याला गृहस्थ आणि पितृ यामध्ये दिलेल्या पिंड आणि पाण्याचे वाहक समजले जाते.

   हिंदू संस्कृतीमधील या कावळ्याला ग्रीक कथांमधून शुभसूचक मानले जाते. कावळ्याचे या संस्कृतीमधील नाव ‘रेवन ‘ असून नॉर्स, रेवन, हॅगिं, मुनीन यांची कथा सांगितली जाते. . या कावळ्याचे अस्तित्व ईश्वराजवळ असल्याचे मानले जाते. भारतामध्ये देखील लडाखसारख्या बर्फाळ प्रदेशात कावळा आढळतो. त्याचे स्वरूपआपल्याकडील कावळ्यापेक्षा थोडे वेगळे असते. स्थानिक भाषेत त्याला ‘कशांगुटी ‘ म्हणतात आणि या पक्ष्याच्या संदर्भात असणारे समज ,गैरसमज आपल्याकडील कावळ्या विषयीच्या समजुतीशी मिळते जुळते आहेत.

   खरे तर आपण आपल्या भोवती दररोज बरेच पक्षी पाहतो, कावळ्याबरोबरच चिमणी, कबुतर, घार अशासारखे पक्षी परिसरात दिसतात. परंतु कावळा सोडून इतर पक्षी कधीच पिंडाच्या भोवती घुटमळताना आपल्याला दिसत नाहीत. मोकळ्या जागेवर ठेवलेल्या पिंडाला खरे तर कोणताही पक्षी भक्षण करू शकतो, परंतु असे होताना दिसत नाही. कावळ्याला एक विशिष्ट दृष्टी असते. मान तिरकी करून, डोळा एका बाजूला फिरवून जेव्हा कावळा बघतो, तेव्हा त्याच्या दृष्टीस एक वेगळा आयाम प्राप्त होत असावा, ज्यामुळे त्याला मानवी नेत्रपेक्षा वेगळे आणि अधिक काही दिसते. कावळ्याला ‘वायस’ असेदेखील म्हणतात. पंचमहाभुतांमधील वायूचे तो प्रतीनिधित्व करतो. शास्त्रानुसार मनुष्य मृत्यू पावल्यानंतर त्याचा आत्मा वायुरूप असतो आणि खरी गोष्ट अशी आहे की मृत्यूनंतर मृत व्यक्तीचा वायुरूप आत्मा पिंडाला धरून बसतो,आणि त्याच्या इच्छापूर्तीचे वाचन मिळाल्याखेरीज तो कावळ्याला पिंडास स्पर्श करू देत नाही. प्रतिरोध करतो. इथे कावळ्याची वैशिष्टयपूर्ण दृष्टी, आत्म्याचे वायुस्वरूप, आणि कावळ्याचे ‘वायस’ नाव या सर्वांची संगती लागताना दिसते.

   मृत व्यक्तीचा आत्मा कावळ्याच्या स्वरूपात येऊन पिंड भक्षण करतो ही समजूत चुकीची असून, मृताच्या वायुरूप आत्म्याने पिंड सोडल्यानंतरच कावळा त्या पिंडाला स्पर्श करतो. दुर्दैवाने विज्ञानाने कावळ्याच्या डोळ्याप्रमाणे लेन्स तर बनविले, परंतु त्या लेन्स मधून पाहण्यासाठी आवश्यक असंणारी कावळ्याची चैतन्यमय दृष्टी कुठून आणायची?

   मृत मनुष्याचा आत्मा जेव्हा मोक्षासाठी तळमळतो तेव्हा कावळा त्याला स्वर्गाचा दरवाजा खुला करून देण्यासाठी मदत करतो. मृत्यूनंतरदेखील माणसाची अन्नावर वासना राहते, परंतु आता त्याच्याकडे अन्न भक्षण करण्यासाठी माध्यम नसते. त्यामुळे मनुष्यप्राण्याचे प्रतीक मानून पिंडदान विधी केला जातो. त्याद्वारे आत्म्याला शांती ,सद् गती मिळते असे म्हणतात. पूर्वी घरातील एखाद्या सदस्यांच्या मृत्यूनंतर घरात काही दिवस चूल पेटत नसे. तांदळाच्या पिठाचा दुधात भिजून केलेला गोळा पिंड म्हणून वापरला जात असे. आजकाल शिजवलेल्या भातामध्ये काळे तीळ, तूप मंत्रपूर्वक मिसळून त्याचे पिंड बनविले जातात.

   कावळ्याचा एक वैशिष्ट्यपूर्ण उल्लेख आपल्याला ज्ञानेश्वर माऊलीच्या ‘पैलतोगे काऊ कोकताहे’ या रचनेत सापडतो. ज्ञानेश्वरीचे अमृत मातेप्रमाणे भरविणाऱ्या माउलींनी कावळ्याचा उल्लेख ‘काऊ’ असा लहान मूल आणि आई यांच्याप्रमाणे करावा हे उचितच आहे. पंढरीनाथ आपल्या घरी येणार असल्याचा शकुन सांगतात असे ते म्हणतात. अगदी सध्या सोप्या दृष्टांतांनी ज्ञानेश्वरीमध्ये गीतेसारखा जातील विषय सोपा करून सांगणाऱ्या माउली हा प्रसंग फक्त एवढेच सांगण्यासाठी उभा करणार नाहीत हे पक्के. पैलतोगेचा अर्थ परलोक असावा आणि आत्मा परमेश्वराच्या भेटीसाठी आतुर झाला असून जेव्हा पांडुरंग भेटीला येतील. म्हणजेच आत्मा परमात्मा यांची गाठ पडेल हा क्षण त्यांच्या दृष्टीने सुखसोहोळाच!!

   असा हा यमलोकाशी संबंध असणारा कावळा उग्र आणि न्यायी असणाऱ्या शनिदेवाचे वाहन देखील आहे. कावळा या पक्ष्यविषयी खूप सारी नकारात्मकता आढळून येत असली तरी, त्याच्या ठायी चातुर्य, चाणाक्षपणा, धैर्य, आणि शहाणपणा हे गुण आढळतात. लहान बाळाला पक्षीजगताची ओळख काऊ पासून होते. कावळ्याच्या विशिष्ट दृष्टीला अनुसरून ‘कावळा डोळ्यासमोर डोकावत नाही’ ही म्हण सार्थच वाटते.

   मनुष्याने टाकून दिलेले अन्न ,खरकटे यावर गुजराण करणारा कावळा पर्यावरणाची स्वच्छता राखत असतो. पाण्याच्या जवळ त्याचे वसतिस्थानअसते. खेडेगावांमधून जुने जाणकार शेतकरी कावळ्याचे घरटे किती उंचावर आहे त्यावरून पावसाचे मान यंदा किती असेल याचा अंदाज लावतात.

   हाच कावळा आजकाल दुर्मिळ होत आहे. हवेमधील प्रदूषण, सगळीकडे होणारा कीटकनाशकांचा वापर, जागोजागी उभारले जाणारे मोबाईल टॉवर या गोष्टी त्यांच्या ऱ्हासास कारणीभूत ठरत आहेत. आपल्या ऋषीमुनींनी कावळा या मुबलक संख्येने आढळणाऱ्या पक्ष्याला पिंडदानादी विधीमध्ये स्थान देण्यात पौराणिक कथांचा, समजुतींचा भाग तर आहेच, परंतु त्यांचा वैज्ञानिक आणि दूरदृष्टीची देखील कमाल वाटते. भाद्रपद हा कावळ्यांच्या विणीचा काळ त्या काळात त्यांना अन्न खायला घातले तर त्यांचा वंश तर वाढेलच,पण पावसाळ्यात कुजणारे अन्न खरकटे खाऊन हे कावळे वातावरण स्वच्छ देखील राखतील. याच कावळ्याच्या विष्ठेतून वड ,पिंपळ यासारख्या उपयुक्त वृक्षांचा प्रसार होतो. जे बहुवर्षायू आणि औषधी आहेत. व्यंकटेश स्तोत्रात देखील ‘कागविष्ठेचे झाले पिंपळ’ असा उल्लेख आपल्याला दिसून येतो. मानवाने निसर्गावर केलेले अतिक्रमण पर्यावरणाचा ऱ्हास करत आहे.

   काही काळापूर्वी नाशिक या तीर्थक्षेत्री पितृपक्षामध्ये काही लोक कावळा मुद्दाम पाळतात. आणि श्राद्धविधी करण्यासाठी आलेले लोक त्यांना पिंड नेऊन भरवतात अशी मजेशीर बातमी वाचली. बातमी वाचताना जरी मजेशीर वाटली तरी मानवाने पर्यावरणाविषयी अजूनही आपली जबाबदारी ओळखली नाहीतर हे पण कावळे नष्ट होतील आणि मग मागे उरेल ती फक्त दर्भाची काडी!!

Theme: Overlay by Kaira