पितृपक्ष प्रथेमागील कहाणी

   भाद्रपद कृष्ण पक्ष म्हणजेच पितृ पक्ष, पक्ष पंधरवडा अगदी बोली भाषेत पाहिलं तर पित्तर पाठ. स्वर्गस्थ पितरे या काळात पृथ्वीवर येतात.आपल्या वंशजांकडे राहतात. वंशजाकडून आदर, भोजन ,सत्कार घेऊन तृप्त होतात आणि सर्वपित्री अमावस्येनंतर वंशजांना आशीर्वाद देऊन, त्यांचे इष्ट चिंतून परततात .भारतीय हिंदूंमध्ये ही परंपरा श्रद्धेने पाळली जाते.आणि आपल्या पूर्वजांप्रती आदर व्यक्त करून त्यांच्या सद्गगतीसाठी श्राध्द, तर्पण इत्यादी विधी केले जातात.

   ही प्रथा केव्हा सुरु झाली आणि याच काळात हे सर्व श्राद्धादी विधी का केले जातात? यामागे एक दंतकथा सांगितली जाते.

   एका गावी एक वसिष्ठ गोत्री ब्राह्मण रहात असे. त्याच्या वृद्ध पित्याची प्रकृती अगदी तोळामासा होती. एका श्रावण महिन्यात तो अंथरुणाला खिळला. प्रकृती अत्यवस्थ झाली. देवावरील नितांत श्रद्धा आणि मानसिक बळाच्या जोरावर त्याने या पवित्र महिन्यात प्राण तगवून  ठेवले. परंतु श्रावणानंतरच्या पौर्णिमेला त्याचा देहांत झाला.

   पिता म्हणजेच सर्वस्व असणारा ब्राह्मण दुःखातिरेकाने वेडापिसा झाला. वडिलांना परत जिवंत करीन असा संकल्प सोडून त्याने ईर्ष्येने यज्ञ आरंभला. हे सर्व पाहून देवाने त्याच्या स्वप्नात जाऊन दृष्टांत दिला. व्यर्थ शोक करू नको. तुझ्या वडिलांचे आयुष्य तेवढेच होते. या नंतर त्याच्या शरीराचे होणारे हाल तुला बघवले नसते. तेव्हा शोकाचा त्याग कर. चुकीचा संकल्प सोडून चालू केलेला हा यज्ञ बंद कर आणि तुझ्या मृत पित्याच्या आत्म्यास सदगती मिळावी म्हणून त्यांचे श्राद्ध विधी कर. त्यांच्या आवडीच्या पदार्थांची पाकसिद्धी करून ब्राह्मण ,आप्त स्वकीय तसेच गरजूना भोजन घालून तृप्त कर. हा विधी केल्यानंतर तुझ्या वडिलांच्या आत्म्यास सद् गती तर प्राप्त होईलच परंतु त्यांच्या २१ कुळातील लोकांना देखील मोक्ष प्राप्त होईल. चुकीचा संकल्प ठेवून या काळात तू यज्ञ याग आरंभिलास त्यामुळे इथून पुढे या काळात कोणीही यज्ञ याग ,धार्मिक शुभकार्ये ,विवाहादि कर्मे करणार नाहीत. हा पंधरवडा फक्त दिवंगत पूर्वजांचे स्मरण ,श्राद्ध यासाठी यासाठी मान्यता पावेल.

   या सर्वावर विश्वास ठेवून ब्राह्मणाने श्राद्धादी विधी पार पाडले.आपल्या वडीलांना तसेच इतर पूर्वजांना मोक्ष प्राप्त करून दिला, त्यांचे आशीर्वाद घेतले.

   या प्रसंगानंतर पक्ष पंधरवड्याची प्रथा सुरु झाली असे मानले जाते.

   पाहायला गेले तर अत्यंत सामान्य आणि प्रातिनिधिक असणारी ही कथा. यामध्ये सत्याचा अंश किती हे देखील कोणाला माहित नाही. परंतु सामान्यजनामधील  आपल्या पूर्वजांविषयी कृतज्ञ भाव वाढीस लागावा. माझ्याकडे जे काही आहे ते माझे एकट्याचे नसून समाजतील घटकासाठी मी काहीतरी केले पाहिजे, असा विचार सर्वसामान्यांच्या मनात रुजविणे यासाठी आदर्श म्हणून कथेची निर्मिती होते. आपल्याआधी कोणीतरी ही गोष्ट केली आहे त्यामुळे त्याचा फायदा झाला आहे असे काही उदाहरण असेल तर ती प्रथा पुढे जाते. अनेक व्रते वैकल्ये यासाठी आदर्श म्हणून असणाऱ्या कथा आपल्यला सापडतात. श्रावण महिना तर अशा कथांनी खच्चून भरला आहे. परंतु या सर्व दंतकथा .यामधून घेण्याचे सार महत्त्वाचे. कथा खरी का खोटी, ब्राह्मणद्वेष्टेपणा, पुरोहित वर्गावर ओढले जाणारे ताशेरे हे याचे विकृत स्वरूप. या गोष्टी करण्यासाठी कोणीही कोणावर जबरदस्ती करू शकत नाही. जेव्हा आपण एखादे काम घेऊन जातो तेव्हाच पुरोहित तुम्हाला सर्व कल्पना देतात. ज्यांना पटेल त्याने श्रद्धेने करावे. या निमित्ताने अन्नदान दक्षिणादान आपल्या हातून घडते. श्रद्धा ठेऊन शांत चित्ताने या सर्व गोष्टी केल्यास मिळणारे समाधान आपण अनुभवतो. ज्यांना पटत नाही त्यानी सोडून द्यावे ,परंतु त्यासाठी विशिष्ट वर्गाला धारेवर धरून फक्त तोंडाची वाफ दवडणे केव्हाही असमर्थनीयच. असो.

   पुढील लेखात पाहूया याच विषया संदर्भात असणारी कर्णाची एक कथा.

Theme: Overlay by Kaira