भाद्रपद पौर्णिमेला अगस्त्य ऋषींचे पूजन केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून पितृपक्षास सुरवात होते. भाद्रपद कृष्ण पक्ष (मध्य प्रदेश सारख्या भागात जेथे पौर्णिमेनंतर महिन्याची सुरवात होते, तेथे आश्विन वद्य पक्ष) पितृपक्ष म्हणून पाळला जातो. याच पक्षाला महालय, बोली भाषेत ‘महाळ’ असे म्हणतात. महा म्हणजे मोठे आणि आलय म्हणजे घर, आपल्या भारतीय हिंदू परंपरेत दिवंगत पूर्वजांनां देवतास्वरूप मानले जाते. या पितृपक्षात वातावरणामध्ये रज आणि तमोगुणी लहरींचे प्राबल्य असते, यमलहरी अधिक प्रमाणात असतात, या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून रज आणि तम कोषांशी निगडित असणाऱ्या पितरांना सहज प्रवेश करता येतो. या पितृपक्षात पितरे पितृलोकातून पृथ्वीवर येतात अशी समजूत आहे आणि ते आपल्या कुटुंबियांच्या घरी वास्तव्य करतात. या देवतास्वरूप पितरांमध्ये देवतांप्रमाणेच वर अथवा शाप देण्याची क्षमता असते, असे गरुडपुराण तसेच कठोपनिषदांत उल्लेख आहेत. या पक्षामध्ये आपल्या दिवंगत पूर्वजांचे श्रद्धापूर्वक समरण केले जाते. आपल्या गोत्रातील ज्ञात-अज्ञात अशा सर्व व्यक्तीचे पिंडरूपाने पूजन केले जाते. तसेच अगदी आपल्या हातून नकळत मारले गेलेले किडा -मुंगी, पाडलेले वृक्ष, आपण पाळलेली पण मृत्यू पावलेली जनावरे, आपल्या घरी मदतनीस म्हणून असणाऱ्या परंतु आता हयात नसणाऱ्या व्यक्ती यांचे देखील श्रद्धापूर्वक स्मरणकेले जाते. काही श्राध्दविधी, अन्नदान या प्रित्यर्थ केले जाते.
या पितृपक्षात जवळपास १६ श्राद्धे घातली जातात. नातेवाईकाचा मृत्यू ज्या तिथीला झाला , त्या तिथीस त्या नातेवाईकाचे श्राद्ध केले जाते. या श्राद्धविधीमध्ये कृतज्ञता भाव आणि अन्नदान या दोन गोष्टी फार महत्वाच्या समजल्या जातात. पितरांना आदरपूर्वक जेवण दिले की त्यांची आपल्यावर कृपादृष्टी राहते अशी सरसकट समजूत आहे. इतर कोणतेही दान याचकाची तृप्ती करीत नाही,परंतु अन्नाने याचक संतुष्ट होतो आणि भोजन करणाऱ्या व्यक्तीचा आत्मा तृप्त होतो. फार पूर्वी सलग १५/१६ दिवस निरनिराळ्या नातलगांची श्राद्धे घातली जात. परंतु आजच्या काळात मात्र सर्व मिळून एकच श्राद्ध घातले जाते. प्रतिपदा, द्वितीया ,तृतीया या तिथींना मृत्यू पावलेल्याचे श्राद्ध त्या तिथींना घातले जाते. चतुर्थी आणि पंचमी या तिथींना घातल्या जाणाऱ्या श्राद्धाला ‘भरणी श्राद्ध’ म्हटले जाते. जे लोक अविवाहित मरण पावले, जगण्याची असोशी असताना देखील अचानक मृत्यू पावलेले लोक, अशा लोकांसाठी हे श्राद्ध आवर्जून केले जाते. षष्ठी आणि सप्तमीला त्या तिथीला मृत्यू पावलेल्याचे श्राद्ध घालतात. अष्टमी ही शुभ तिथी मानली जाते, या दिवशी तुरळक श्राद्धे असतात.
नवमीच्या श्राद्धाला ‘अहेव नवमी’ अविधवा नवमी असे म्हणतात. सवाष्ण असताना मृत्यू पावलेल्या स्त्रियांचे या दिवशी श्राद्ध केले जाते. गुजरातमध्ये या दिवसाला ‘डोशी’ नवमी असे म्हणतात. आईचे श्राद्ध देखील याच दिवशी घातले जाते, त्याला ‘मातृश्राद्ध’ असे म्हणतात. दशमी, एकादशी, द्वादशीला त्या तिथीवर मृत्यू पावल्याचे श्राद्ध घालण्याची रीत आहे. पितृपक्षातील एकादशीला ‘इंदिरा एकादशी’ असे म्हटले जाते. या दिवशी श्रध्द केल्याने पूर्वजांना पुण्य प्राप्ती होते असे मानले जाते. त्रयोदशीला चंद्र लग्नात मघा नक्षत्र असते, त्यामुळे त्याला ‘मघा श्राद्ध’ म्हटले जाते. मरणानंतर तेरा दिवसांनी मनुष्याचा मरणोत्तर प्रवास सुरु होत असल्याने त्रयोदशीला वेगळे महत्त्व आहे.
चतुर्दशी श्राद्धाला ‘चौदस श्राद्ध’ म्हणतात. अपघाती अथवा अनैसर्गिक मृत्यू झालेल्याचे श्राद्ध या दिवशी करतात.ज्यांची मृत्युतिथी चतुर्दशी आहे अशांचे देखील श्राद्ध याच दिवशी केले जाते. पितृपक्षातील अमावस्या सर्वात महत्त्वाची मानली जाते. या अमावास्येला ‘सर्वपित्री अमावास्या’ म्हणतात. ज्या लोकांची मृत्यूतिथी माहित नाही अथवा काही कारणाने ज्यांचे श्राद्ध करावयाचे राहून गेले असेल अशा सर्वांचे श्राद्ध या दिवशी केले जाते. सर्वपित्री अमावास्येस वाराणसी, गया, केदारनाथ, बद्रीनाथ, नाशिक, चाणोद यासारख्या तीर्थक्षेत्री पितृतर्पणासाठी लोक हजारोच्या संख्येने गर्दी करतात. याच पक्षामध्ये मृत गुरूस श्रद्धांजली वाहण्याची तसेच शिष्य मृत असेल तर गुरूला त्याचे स्मरण करण्याची अनुमती आहे.
या पक्षातील श्राद्धाच्या माध्यमातून आपण काही प्रमाणात मातृऋण, पितृऋण तसेच समाजऋणातून उतराई होऊ शकतो. पितरांना उद्देशून जे जे काही योग्य काळ, वेळ स्थळ पाहुन सत्पात्र व्यक्तीप्रती आणि ब्राह्मणाप्रती श्रद्धापूर्वक धर्मशास्त्रानुसार केले जाते ते श्राद्ध. या श्राद्धविधीद्वारे आपल्या पूर्वजांच्या ३ पिढ्यान आत्मिक सद्गगती प्राप्त होते. याज्ञवल्क्याने वसू, रुद्र आणि आदित्य अशा पितर श्राद्धदेवता सांगितल्या आहेत.
निसर्गातील तसेच आपल्या परिवारातील प्रत्येक घटक आपले जीवन समृद्ध करीत असतो. प्रत्येक क्षणी त्यांचे आपल्यावर काही उपकार असतात. या सर्व उपकाराची फेड काही अंशी या पक्षात करून त्यांच्या ऋणातून थोडे मुक्त होण्याचा तसेच त्यांना सद्गगती लाभावी म्हणून केलेला छोटासा प्रयत्न खूप सारे आत्मिक समाधान आणि शांती देऊन जातो. ८४ लक्ष योनिनंतर मिळणारा दुर्मिळ मनुष्यजन्म ज्यांच्यामुळे आपल्याला लाभला, अशा आपल्या अस्तित्वाचे कारण असणाऱ्या आपल्या पूर्वजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी धर्माने करून दिलेली खास सोय म्हणजे हा पितृ पक्ष.
प्राचीन काळी श्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवीन वर्षाची सुरवात होत असे. त्या आधीचे संपणाऱ्या वर्षाचे शेवटचे १५ दिवस दिवंगत पूर्वजांच्या स्मरणासाठी राखून ठेवले होते.नंतर शालिवाहन शक सुरु झाल्यानंतर नववर्ष दिन बदलला,परंतु हा पितृपक्ष तसाच राहिला.
श्राद्धविधीला हिंदू धर्मामध्ये महत्त्व आहेच परंतु जैन, मुस्लिम, ख्रिश्चन धर्मात देखील श्राद्धविधी करतात. अर्थात त्याचे स्वरूप वेगळे असते. जैनांमध्ये श्राद्धतिथीला तीर्थांकरांना अन्नदान करतात. ख्रिश्चन धर्मातील रोमन कॅथॉलिक चर्चमध्ये अन्नदान करतात. मुस्लिम धर्मीयांमध्ये कुराणपठणासहित फकिराना अन्नदान करतात. पारशी लोकांमध्ये देखील सरत्या वर्षातील शेवटचे १५ दिवस दिवंगत आप्तांच्या स्मृतीसाठी असतात. मुक्ताद अथवा डोसला करताना अध्यारुस घरी बोलावतात आणि भोजन आणि दक्षिणा देतात. ग्रीक आणि इजिप्शिअन लोकांमध्ये ममीसोबत मरणोत्तर प्रवासासाठी अनेक वस्तू ठेवलेल्या दिसून येतात.
मनूने सर्वात प्रथम श्राद्ध केले म्हणून तो श्राद्धदेव. रामायणात प्रभू श्रीरामांनी पिता दशरथ ,जटायूचे ,सुग्रीवाने वालीचे बिभिषणाने रावणाचे श्रध्द केल्याचे उल्लेख आहेत. महाभारतात देखील पांडवांनी पंडुराजाचे तसेच युद्धसमाप्तीनंतर सर्व आप्तेष्टांचे तसेच युद्धात कामी आलेल्यांचे श्राद्ध केले होते.
अन्नदान, जलदान या महा पुण्यप्रद गोष्टी आहेतच परंतु काळाचे बोट धरून चालताना अनाथाश्रमातील अनाथांना गरजेच्या वस्तू देणे, काही गरीब विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविणे, गरीब लोकांना वस्त्रदान करणे यासारखे उपक्रम देखील आपण करू शकतो. फक्त श्रद्धा मात्र असावी. श्रद्धापूर्वक अंतःकरणाने श्राद्ध केल्यास कीर्ती,बल ,आरोग्य ,लक्ष्मी , ऐश्वर्य यांची प्राप्ती होते. आपला चौफेर उत्कर्ष होतो. आपल्यावरील असणाऱ्या ऋणांमधून मुक्त होण्याची श्राद्ध ही गुरुकिल्ली मानावी.
याच पितृपक्षाविषयी अजून मनोरंजक पण उदबोधक माहिती पुढील लेखात !!!
Original content here is published under these license terms: | X | |
License Type: | Read Only | |
License Abstract: | You may read the original content in the context in which it is published (at this web address). No other copying or use is permitted without written agreement from the author. |